Delisting of shares in marathiDelisting of shares

शेअर्स डीलिस्टिंग…का ? कसे ? पुढे काय ?
Delisting of shares in Marathi 

डीएचएफएल (DHFL) स्टॉक एक्स्चेंजमधून डीलीस्टिंग होणार असं जाहीर झाले त्यानंतर त्या शेअरमध्ये सट्टेबाजी झाली. आणि अर्धवट ज्ञान असणाऱ्या काही गुंतवणूकदारांनी ( यात गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या नवीन डीमॅट बॅचचे प्रमाण लक्षणीय असू शकते ) बऱ्याच प्रमाणात हे शेअर्स आपल्या गळ्यात मारून घेतले असण्याची शक्यता आहे. हे सगळं टाळण्यासाठी आधी शेअर डीलीस्ट होणे ( what is delisting of shares ) म्हणजे काय ? आणि हि संकल्पना मराठीत (Delisting of shares in Marathi)  समजून घेऊया.
 
एखादी कंपनी आयपीओ ( IPO) द्वारे स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध म्हणजे लिस्ट होत असते आणि डीलीस्टिंग हि त्याच्या अगदी उलट प्रक्रिया असते.म्हणजे डीलीस्टिंग नंतर या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी उपलब्ध नसतात.एखाद्या कंपनीस स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध म्हणजेच लिस्ट होण्यासाठी जसे स्टॉक एक्स्चेंज आणि सेबीचे निकष पूर्ण करावे लागतात त्याच प्रमाणे एखाद्या कंपनीस डीलिस्ट होण्याची प्रक्रिया पार पडण्यापूर्वी काही निकष पूर्ण करावे लागतात.
 

मुळात डीलीस्टिंग होण्याचेसुद्धा काही प्रकार ( Delisting Process ) आहेत,

 
कोणते ते खालील प्रमाणे.
 

ऐच्छिक डीलीस्टिंग (Voluntary Delisting of shares)  

या प्रकारात स्टॉक एक्स्चेंजमधून डीलीस्ट होण्याचा निर्णय कंपनीचा स्वतःचा असतो. अशा वेळी कंपनी आपल्या भागधारकांना म्हणजेच शेअर होल्डर्सना शेअरच्या बाजारातील किंमतीच्या वर काही प्रीमियम देऊ करून मार्केटमधून आपले शेअर्स पुनर्खरेदी करू पाहते म्हणजेच रिव्हर्स बुक बिल्डींगद्वारे बायबॅक करणे. याद्वारे कंपनीचे प्रवर्तकांना कंपनीमधील आपली हिस्सेदारी 90% वर न्यायची असते. यानुसार जेव्हा एखाद्या शेअर होल्डर आणि कंपनीत हा व्यवहार होतो तेव्हा त्या व्यवहारास स्टॉक एक्स्चेंजमधून वगळले जाते. अशा प्रकारे बाजारातून त्या कंपनीचे शेअर्स परत घेतले जातात. अर्थात यामध्ये सुद्धा कालावधीची मर्यादा असते म्हणजेच त्या मर्यादेत हि प्रक्रिया  पूर्ण होणे भाग असतं.
 

ऐच्छिक डीलीस्टिंग (Voluntary Delisting) पार पडली जाते ते पाहूया.

 
पण या प्रकारात भागधारकांना आपल्याकडील शेअर्स कोणत्या दराने या बायबॅकसाठी द्यायचे आहेत त्यासाठी बीड ( बोली ) लावायची असते. 
 
आपण हे उदाहरणाने पाहूया.
 
समजा ऐच्छिक डीलिस्टिंग आणू पाहणाऱ्या “अ” कंपनीचे ( Delisting stock ) तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत आणि त्या प्रत्येक शेअरची बाजारातील किंमत रु.100 आहे. कंपनीच्या बायबॅक ऑफरला प्रतिसाद देताना तुम्ही तुमच्याकडील शेअर्सची प्रती शेअर 110 दराने बोली लावली आहे. तुमच्यासारख्या अनेक शेअरधारकांनी आपापल्या शेअर्सची वेगवेगळी बोली लावली आहे.
 
आता या मध्ये कुणी रु. 120 कुणी रु.130 तर कुणी रु.150 अशा वेगवेगळ्या बोली लावलेल्या आहेत. मग यामध्ये सर्वाधिक बोली म्हणजेच सर्वात जास्त शेअर्स होल्डर्सनी लावलेली बोली रु.120 हि आहे या नियमाने तो दर बायबॅक साठी निश्चित होत असतो.पण अर्थात हि किंमत स्वीकारावी कि नाकारावी हा निर्णय पूर्णतः कंपनीच्या प्रवर्तकांचा असतो.
आणि जर तो दर प्रवर्तकांनी स्वीकारल्यास रु. 120 या दराने बायबॅक प्रक्रिया सुरु होते मग त्यासोबत त्या दराच्या आतमध्ये बोली लावणाऱ्यांचे सुद्धा शेअर्स प्रवर्तकांकडून खरेदी केले जातात. म्हणजे या उदाहरणात तुमची बोली रु.110 रुपयांची होती पण सर्वात जास्त संख्येने आलेला दर रु.120 जो प्रवर्तकांकडून स्वीकारलाही गेल्यामुळे तुम्हालाही रु.120 दराने तुमचे शेअर्स विकत येतील.
 

त्याचं काय ज्यांनी रु.120 च्या वर म्हणजेच रु.130, रु.150 अशी बोली लावली ?

 
तर अशा भागधारकांना संधी असते कि ते पुढील वर्षभरात लागू झालेल्या दराने (रु.120 ) आपले शेअर्स कंपनीस विकू शकतात. पण इतकं करूनही जर त्या कंपनीच्या प्रवर्तकांकडे 90 % वर शेअर्स नाही आले तर ?
 
तर मग हि डीलिस्टिंग प्रक्रिया अयश्वस्वी समजली जाते आणि कंपनीला काही काळाने पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतात. वेदान्ता (Vedanta Delisting) आठवतं ? त्यावेळी असंच झालं होतं, 90 % शेअर्सचा निकष पूर्ण न झाल्यामुळे कंपनीची डीलिस्टिंग प्रक्रिया यशस्वी झाली नाही.
 
बरं आता समजा कंपनीची डीलिस्टिंग प्रक्रिया यशस्वी झाली पण वर्षभराच्या वाढीव कालावधीतही ज्यांनी आपले शेअर्स कंपनीला नाही विकले तर मग त्याचं पुढे काय ?
 
तर अशा आळशी लोकांपुढे मग एकच मार्ग असतो तो म्हणजे OTC म्हणजेच “ओव्हर द काऊंटर” व्यवहार. म्हणजेच ते शेअर्स स्टॉक एक्स्चेंजद्वारे विकता येणे शक्य नसले तरी ते भागाधाराकाच्या डिमॅटमध्येच असतात.मग हे शेअर्स विकण्यासाठी मात्र आता त्याला बाहेर कुणीतरी खरेदीदार शोधावा लागतो.
OTC द्वारे व्यवहार करणे तसं अवघड असते कारण दर निश्चिती आणि त्यानंतरची प्रक्रिया भागधाराकास स्वतः करावी लागते.
 

अनैच्छिक डीलीस्टिंग ( Compulsory Delisting of shares )

अनैच्छिक डीलीस्टिंग म्हणजेच लादलेली डीलीस्टिंग.असं तेव्हाच होतं जेव्हा कंपनीकडून नियमांचं उल्लंघन होतं.किमान आर्थिक निकष पूर्ण करण्यात अयशस्वी होणे. शेअर्सची किंमत, आर्थिक गुणोत्तर, पुरेसे बाजारमूल्य राखू न शकणे कंपनी दिवाळखोरीत जाणे वगैरे कारणांसाठी सेबी व एक्सचेंजद्वारे कंपनीस तशी सूचना दिली जाते आणि त्यावर स्पष्टीकरण मागवले जाते.
यानंतर जर कंपनी यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असेल तसेच कंपनीकडून वारंवार नियमांचं उल्लंघन होत असेल तर मग सुरवातीस शेअर्सच्या व्यवहारांवर स्थगिती आणली जाते. आणि त्याहीनंतर जर कंपनीकडून परिस्थिती मध्ये सुधारणा होत नसेल तर मग अखेर तो शेअर स्टॉक एक्स्चेंजमधून डीलिस्ट केला जातो.
 

या प्रकारात शेअरधारकांचं काय होतं ?

 
खरं तर यामध्ये शेअरहोल्डर्सच्या हाती फारसं काही लागत नाही. अगदीच काहीवेळेला फेसव्हॅल्यु म्हणजेच दर्शनी मूल्य मग ते रु.1, रु. 2 जे काही असेल त्या नियमाने मिळू शकतात. पण बहुतांश प्रकरणांत कंपनीचे दुसऱ्या कंपनीकडून अधिग्रहण किंवा मर्जर होत असेल तर अशावेळी रिझॉल्युशन प्लानमध्ये डीलिस्ट होणाऱ्या कंपनीच्या सध्याच्या इक्विटी शेअर्सचे मूल्य शून्य होईल असे जाहीर केले जाते. मग अशा वेळी शेअरहोल्डर्सच्या नशीबीही फक्त नुकसानच असतं. कारण अशा कंपनीचे शेअर्स OTC द्वारे सुद्धा विक्री होत नाहीत.
आपल्याकडे असलेले शेअर्स डीलीस्ट तर नाही होणार ? (Delisting shares list)
जर तुमच्या डिमॅटमध्ये काही कंपन्यांचे शेअर्स असतील आणि काही कारणास्तव तुम्ही बाजाराचा आढावा नित्यनेमाने घेऊ शकत नसाल तर तुम्ही NSE च्या वेबसाईटवर डीलिस्ट झालेल्या आणि डीलिस्टिंगसाठी प्रस्तावित असणाऱ्या शेअर्सची यादी वेळोवेळी प्रकाशित केली जात असते.आपण हि यादी खालील लिंकवर पाहू शकता.
 
अनेकदा एखादी कंपनी डीलीस्ट होणार हे जाहीर होऊनही त्यात चढउतार पाहायला मिळतात कारण अशा शेअर्स मध्ये सट्टेबाजीला ऊत येत असतो पण यामध्ये शेअरमार्केटमध्ये नव्याने आलेले बळी पडतात.
 

अशावेळी बॉंड मार्केट मात्र काही संकेत आगाऊ देऊ शकतं.

 
म्हणजे पहाना, नुकताच डीलिस्टिंगच्या कड्यावर आलेल्या डीएचएफएलचे बॉंड्समध्ये 2018 च्या दरम्यान अगदी पतमानांकन AAA असूनही थेट डिस्काउंटमध्ये व्यवहार होत होते. तसंच येस बँकचं सुद्धा, रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालण्याआधीच येस बँकचे एटी बॉंड्स अगदी 30% घटीसह व्यवहार होत होते.
 
अर्थात हे सगळं पहायचं म्हणजे बाजारवर नजर रोज नसली तरी नियमितपणे असायला हवी.
 
मित्रांनो, शेअर मार्केटसारख्या क्षेत्रात अज्ञान हाच सर्वात मोठा शत्रू असतो, नेमकं हेच लक्षात घेऊन “डीलीस्टिंग ” हा विषय शक्य तेवढा सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा,  जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या विषयाबाबत माहिती मिळू शकेल.
 
 

– शशांक एच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *