स्मॉलकेस म्हणजे नेमकं काय ?
Smallcase review in marathi
स्मॉलकेस म्हणजे नेमकं काय ? (Smallcase review in marathi ) या विषयावर लिहायचं ठरवलं आणि जसं या बाबतीत विचार करू लागलो तसं सर्वात आधी पुढील गोष्टी मनात येऊ लागल्या. काही वर्षे मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल कि तंत्रज्ञानाने अवघं जग कवेत घेतलंय. म्हणजे बघाना, पूर्वी अनेक बाबतीत आपल्या समोर जे उपलब्ध आहे त्यावर भागवावं लागायचं मग ती संपर्काची साधने असोत किंवा मनोरंजनाचे पर्याय. अगदी गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. फारच मर्यादित पर्याय समोर होते म्हणजे काही सरकारी योजना, मुदत ठेवी, दागिन्यांच्या रुपातले सोनं आणि काहींसाठी जमीन-जुमला.शेअर मार्केट होतंच पण त्यात प्राबल्य विशिष्ट समाजाचेच होतं, मराठी मन त्याकडे जुगार समजूनच दूर होता मग गुंतवणूक म्हणून पाहणे दूरच राहिलं.
आता आपण थेट येऊया आजच्या काळात, आज तुम्ही पाहाल तर गुंतवणुकीचे अनेकानेक पर्याय उपलब्ध आहेत . म्हणजे फक्त सोन्यापुरतं सांगायचं झालं तर सोन्यामध्येच आपण चार प्रकारे गुंतवणूक करू शकतो. तसंच शेअर मार्केटबद्दल. पण सुरवातीला ज्यांना शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करता येणे शक्य नाही, म्हणजे कंपन्यांचा, त्यांच्या कामगिरीचा अभ्यास, त्यांच्या क्षेत्राशी संबंधित धोरणे वगैरे लक्षात घेणे इत्यादी. हे तसं वेळखाऊच म्हणून मग म्युच्युअल फंड नावाचा प्रकार आला.म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये न पडता त्यात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड.
अर्थात म्युच्युअल फंड ( Mutual Fund ) हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे पण माझ्यासारख्या काहीजणांना तितका आकर्षक वाटत नाही, त्यामागे काही कारणे आहेत उदाहरणार्थ, थेट शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या तुलनेत फंडात करताना आपल्या गुंतवणुकीतील काही हिस्सा हा त्याच्या प्रशासकीय आणि खर्चाकरिता जात असतो.तसेच हि गुंतवणूक मोडते वेळी लागणारा एक्झिट लोडसुद्धा आपल्याला परत मिळणाऱ्या रकमेतून वजा होत असतो. बर फंडांचे प्रकार सुद्धा अनेक आहेत म्हणजे इक्विटी, मनीमार्केट, गिल्ट, डेब्ट, हायब्रीड वगैरे. पुन्हा वेगवेगळे डायव्हर्सीफाय्ड फंड्स.
मग आता विचार करा कि शेअर मार्केटमध्ये जास्त समजत नाही अशा व्यक्तीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी तर इथेही निवड करताना त्याला इतका विचार,अभ्यास वगैरे आहेच आणि इतकं सारं ती व्यक्ती करू शकत असेल तर मग त्याने थेट शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक का करू नये ? मग प्रश्न उभा राहातो गुंतवणूक निधीचा. निधी म्हणजे गुंतवणूक करण्याजोगी रक्कम किती किमान ठेवून त्यातही चांगल्यात चांगली गुंतवणूक कशी करता येईल. हे मुद्दे येतात.
मग अशावेळी स्मॉलकेसेस ( SmallCase ) हा एक उत्तम पर्याय सध्या उपलब्ध झालाय. 2016 मध्ये बंगळूरूमध्ये सुरु झालेलं एक असं फिन्टेक स्टार्टअप ज्याने गुंतवणुकीचं एक नवीन व्यासपीठ समोर आणलं आणि बघता बघता अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं लाडकं बनलं. आता तर जवळपास सर्व आघाडीच्या ब्रोकर्सनीही स्वतःला स्मॉलकेससोबत जोडून घेतलंय. असं नक्की कोणतं उत्पादन किंवा सेवा आहे स्मॉलकेसमध्ये ?
स्मॉलकेसेस म्हणजे काय ? ( What is Smallcase Investment? )
जेव्हा तुम्ही फळांचा ज्यूस किंवा सलाड खाण्याचा विचार करता तेव्हा तुमच्या समोर प्रश्न येतो, ज्यूस किंवा सलाड कोणत्या फळाचा ? कारण तसे पर्याय असतात पण त्याच वेळी तुम्हाला मिक्स फ्रुट सलाड किंवा ज्यूस हवं असेल तर तसंही तुम्ही मागवू शकता.नेमकं तेच स्मॉलकेसेस मध्ये आहे. तुम्हाला हवं तसं, हव्या त्या क्षेत्राशी निगडीत, अशा एक गुंतवणुकीच्या पोर्टफॉलिओमध्ये तुम्ही थेट गुंतवणूक करू शकता.म्हणजे देशातील आघाडीच्या शंभर कंपन्यांचा एक पोर्टफॉलिओ म्हणा किंवा मग लार्ज कॅप कंपन्यांचा, किंवा इक्विटी आणि सोने यांचा एकत्रित किंवा मग म्हणजे इक्विटी, सोने आणि डेब्ट अशा तिन्ही प्रकारांचा समावेश असणारा किंवा मग सुरवात करण्यासाठी बऱ्याच अंशी संतुलित समजला जाणारा “ऑल वेदर स्मॉलकेस” (All Weather Investing).
अगदीच वाटलं तर तुम्हीच बनवू शकता तुमची एक स्मॉलकेस (Smalcase).म्हणजे तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार, अभ्यासानुसार, भविष्याबाबत असणाऱ्या अपेक्षांनुसार, तुमच्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या प्रकारांचा समावेश करून तुम्ही तुमची स्वताची स्मॉलकेस ( Best Small Case Portfolio ) बनवू शकता ज्याचं नियमन आणि नियंत्रण तुमच्याकडे असेल. तुमच्या आवडत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करूनही त्याच्या गुंतवणूक संदर्भातील पसंतीचे निर्णय मात्र त्या फंडाचा फंड मॅनेजर घेत असतो तसे इथे नाही.
थोडक्यात काय तर स्मॉलकेसेस म्हणजे एक गुंतवणुकीचा पुष्पगुच्छच आणि तोही तुमच्या आवडीचा तुम्ही बनवलेला.आणि इथे तुम्ही अगदी थेट एका रकमेसह तसेच तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा किंवा मग नियमित असणारी एसआयपी ( SIP ) अशा तुम्हाला सोयीच्या वाटणाऱ्या प्रकारे गुंतवणूक करू शकता.
कसं कराल स्मॉलकेसेसमध्ये इन्व्हेस्ट ? ( How to invest in Smallcases )
खरं तर अत्यंत सोप्या प्रकारे. तुमचं आधीच एखाद्या Upstox, Zerodha (smallcase zerodha) सारख्या कोणत्याही ब्रोकरकडे खाते असेल तर थेट https://www.smallcase.com/ या संकेत स्थळाला भेट देऊन लॉग इन पर्यायावर क्लिक केल्यानंतर समोर असणाऱ्या ब्रोकर्समधून तुमचा ब्रोकरचा पर्याय निवडल्यावर तुमच्या ब्रोकरच्या एप्लीकेशन किंवा वेबसाईटसाठी असणाऱ्या तपशिलांसह लॉगइन केल्यावर हे स्मॉलकेस खाते तुमच्या ब्रोकरच्या खात्याशी जोडले जाते आणि त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार यामध्ये गुंतवणूक करू शकता.
मित्रांनो स्मॉलकेस हा नवीन गुंतवणूक प्रकार, याबाबत सांगणारं मराठीमध्ये सध्यातरी फारसं उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळेच आपल्या मराठी भाषिकांना या प्रकाराबद्दल माझ्या आर्थिक नजरेतून आणि वकुबाप्रमाणे सांगायचा हा एक प्रयत्न. या लेखात गुंतवणुकीबाबत व्यक्त केलेली मते माझी वैयक्तिक आहेत. अर्थात गुंतवणुकीबाबत प्रत्येकाची वेगवेगळी मते, योजना असू शकतात आणि त्यानुसार प्रत्येकाने आपापले निर्णय घ्यावेत.
लेख आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणे करून हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
धन्यवाद.
लेखन : शशांक एच.