अत्यंत महत्वाचा आणि बरेचदा चुकीच्या पद्धतीने हाताळलेला असा हा मुद्दा. कारण मुळात आपलं लक्ष्य काय हेच माहित नसेल तर मग त्यासाठी केलेल्या प्रयत्नांनाच अर्थ नसतो. आणि जेव्हा हा मुद्दा गुंतवणुकीचा असतो तेव्हा आपलं त्याबाबतीत असलेलं धोरण स्पष्टच असावं. म्हणजेच गुंतवणुकीसाठी स्टॉक्सची निवड कशी करावी हा प्रश्न तुम्हाला पडण्याआधी आपल्या या नियोजित गुंतवणुकीचं प्रयोजन आणि त्याचा कालावधी, याबाबत आपली भूमिका निश्चित असली पाहिजे.(how to select stocks for investment in india in marathi)
सर्वात आधी..
म्हणजे आपलं वय, उत्पन्न, सध्या असणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि त्यानुसार ठरणारी बचतीची आणि गुंतवणुकीची क्षमता तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्यावी. एकदा हे नक्की झालं कि मग तुमचं गुंतवणुकीतून अपेक्षित असणारं आर्थिक लक्ष्य ठरवण्यास मदत होते. म्हणजे वयाच्या तिशीत असणाऱ्याने गृह कर्जाचा हफ्ता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय तसेच मुदत विमा, आणीबाणी निधी या सगळ्यांचा विचार करून निवृत्तीची तरतूद म्हणून उत्पन्नातील काही हिस्सा पंधरा – वीस वर्षांचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून भांडवली बाजारात म्हणजेच कंपन्यांच्या शेअर्समध्ये नियमितपणे गुंतविण्याचे ठरवणे. उत्पन्नातील गुंतवणुकीसाठी हा ‘काही हिस्सा ‘ प्रत्येकाने आपापल्या क्षमता आणि सोयीनुसार ठरवावा.
तर मग आता ‘गुंतवणूक ‘का आणि किती ?’ वगैरे नक्की झाल्यावर ‘ती कशी ?’ या प्रश्नाकडे वळता येतं. गुंतवणूक करताना कंपन्यांची निवड करताना सर्वसामान्यपणे खालील निकष वापरले जातात.
पेनी स्टॉक्सना भुलू नका : Don’t fall for penny stocks
बरेचजण स्टॉक्सची निवड करताना शेअरची किंमत या बाबीला नको तितकं महत्व देतात. खरं तर शेअर स्वस्त कि महाग हे ठरवण्यात इथे किंमत हा मुद्दाच नसतो. त्यासाठी पीई गुणोत्तर (PE Ratio) आणि इतर निकष आहेतच. थोडक्यात सांगायचं तर पेनीस्टॉक्समध्ये गुंतवणूक करायचीच झाली तर ती अगदी अपवादात्मकम्हणजे ठोस कारण आणि तर्क असेल तरच. त्यातही त्याचे प्रमाण अगदी किरकोळ इतकं मर्यादित ठेवावं.
प्रवर्तकांचा कंपनीतील हिस्सा आणि समभाग गहाण असण्याचे प्रमाण : Promotor’s Holding in company & Pledged Shares
व्यक्ती असो वा संस्था किंवा मग देश , त्यांनी आपल्याकडील बहुमूल्य चीझवस्तू गहाण ठेवणे हि काही अगदीच भूषणावह मानली जाणारी बाब नाही. आणि म्हणूनच एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा गहाण असणे हि बाब त्या कंपनीबाबत नकारात्मकता वाढविण्यासाठी पुरेशी असते. त्याच बरोबर प्रवर्तकांची आपल्या कंपनीत किती हिस्सेदारी आहे यावरून ते आपल्या कंपनीच्या व्यापार धोरणाबाबत किती गंभीर आहे याचा अंदाज बांधता येतो.
पारदर्शकता : Transparency in governance of the company
अनेकदा बऱ्याच कंपन्या फंडामेंटली अगदी चोख वाटतात. पण खरं चित्रं वेगळं असू शकतं. आपल्या समोर येणारी आकडेवारी , निर्णय , धोरणे फसवे असू शकतात. आणि म्हणूनच कंपन्यांच्या व्यवहारातील पारदर्शकता महत्वाची असते. अगदी अलीकडील कार्वीचे (karvy demat scam) उदाहरण या साठी पुरेसे आहे.
गुंतवणूक असलेले स्टॉक्स चक्रीय अर्थात सायक्लीकल स्वरूपाचे ? : Cyclical or Non-cyclical
जसं सुरवातीला सांगितलंय कि गुंतवणुकीसाठी तुम्ही कालावधी निश्चित करा. कारण लघु – मध्यम कालावधी असेल तर ऑटो, सिमेंट, साखर उत्पादना सारख्या म्हणजे चक्रीय अर्थात सायक्लीकल क्षेत्रातील स्टॉक्स असतील तर त्यामधील तुमच्या गुंतवणुकीतील तुमची एन्ट्री आणि एक्झिट महत्वाची असते. कारण अनेकदा सरकारी धोरणांचा या क्षेत्रावर परिणाम होत असतो. आणि जर तुम्ही अशा एखाद्या क्षेत्रातील शेअर त्याच्या अत्त्युच्च पातळीवर असताना खरेदी केलात तर कदाचित त्यानंतर नफ्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ वाट पहावी लागू शकते किंवा मग तोटाही सहन करावा लागू शकतो.
कमी आरओई (रिटर्न ऑन इक्विटी) असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक : Low ROE Stocks ?
मुळात गुंतवणूक का करतो आपण ? तर परताव्यासाठी. तर मग अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावीच का ज्यांचा इतिहासच कमी ROE चा आहे ? कारण ROE मधील बदल दोन चार दिवसांमध्ये घडत नसतो. म्हणून वर्षानुवर्षे उत्तम ROE राखून असलेले समभाग विचारात घ्यावेत. अर्थात याच वेळी कंपनीवर कर्ज आहे कि नाही हा मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो.
कंपनी काळासोबत बदलणारी आहे का ? Does the company update itself time to time ?
ब्लॅकबेरी, कोडॅक, नोकिया आणि याहू !
एकेकाळी आपापल्या क्षेत्रात राज्य करणाऱ्या या कंपन्या आज कुठे आहेत ? त्यांच्या अपयशाचं कारण म्हणजे त्यांनी काळासोबत बदल स्वीकारले नाहीत. आणि म्हणूनच तुमच्या पोर्टफोलिओमध्येसुद्धा काळानुरूप बदल हवाच. कंपन्यांची निवड करताना कंपनी आधुनिकतेची कास धरणारी आहे का ? हे नक्की तपासा. कंपनीने मागील काही वर्षांत कोणते नवीन औद्योगिक – व्यावसायिक बदल आणि उपक्रम राबवले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न असावा.
नाव, मालमत्ता आणि जबाबदाऱ्या : Blue chip, Large Caps Assets & Liabilities info in marathi
कंपन्यांची निवड करताना हा एक महत्वाचा निकष. कंपनीचे आपल्या उद्योग क्षेत्रात असलेलं नाव, उद्योगाचे आकारमान, तिची मालमत्ता- जबाबदाऱ्या यांचे समतोल प्रमाण, किमान कर्ज तसेच आपापल्या क्षेत्रात नाव कमावून स्थिरस्थावर झालेल्या कंपन्यांना इतर कंपन्यांपेक्षा वाव जास्त असतो. अर्थात हि काही काळ्या दगडावरची रेघ नाही पण बहुतांश करून ब्लूचीप असलेल्या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जोखीम तुलनेत कमी असते. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये यांचा हिस्सा बऱ्यापैकी असणे उत्तम.
कर्ज प्रमाण आणि त्यानुसार निवड करण्यासाठी ‘डेब्ट टू इक्विटी’ गुणोत्तर तपासावे. अर्थात यामध्ये सुद्धा उद्योगक्षेत्र हा मुद्दा महत्वाचा असतो. पण सर्वसामान्यपणे 0.4 पेक्षा कमी ‘डेब्ट टू इक्विटी’ गुणोत्तर (Debt to equity) चांगलं मानलं जातं.
या विषयावरील पुढील माहिती आपण दुसऱ्या भागात इथे क्लिक करून वाचू शकाल.(how to select stocks for investment in india in marathi) आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.