sumant moolgaokar tata sumosumant moolgaokar tata sumo

उद्योग क्षेत्रात बरेचदा पाहायला, अनुभवायला मिळतं कि एखाद्या कंपनीमुळे कोणी एखादी व्यक्ती मोठी झालेली, नावारूपास आलेली असते तर मग कधी मात्र एखाद्या व्यक्तीमुळे साक्षात एखादी कंपनी उभी राहिलेली असते. (TATA Motors story in marathi)

आता तुम्हाला वाटेल कि त्यात इतकं काय नवीन ? अनेक उद्योजकांनी स्वतःच्या कंपन्या उभारताना अविश्रांत कष्ट घेतलेले असतातच. म्हणून त्यांच्यामुळे एखादी कंपनी नावारूपास येते हि त्यांच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब. पण आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत जी व्यक्ती संबंधित कंपनीची तशी लौकिकार्थाने मालक नव्हती पण तरीही त्या कंपनीची सर्वेसर्वा होती. म्हणजे श्रीकृष्णाची जैविक आई देवकी असली तरी त्याची आई कोण असं विचारलं कि समोर येते ती यशोदाच.

तसंच काहीसं इथं म्हटलं जाऊ शकतं.

अर्थात तरीही इथे कंपनीच्या खऱ्या मालकाचं महत्व मुळीच कमी होत नाही किंबहुना त्यांच्या सारख्या दृष्ट्या उद्योजकामुळेच त्या कंपनीच्या शिल्पकाराला आपल्या हाती असलेली हि कंपनी अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे उभारता आली, वाढवता आली.

आम्ही बोलतोय टाटा मोटर्स बद्दल आणि अर्थातच सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल.  

तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. युद्ध ऐन मध्यावर होतं. या काळात दोस्त राष्ट्रांचा महत्वाचा भाग असलेल्या इंग्लंडच्या ब्रिटीश रॉयल आर्मीला स्टीलची गरज लागणार होती आणि त्याकाळी त्यांच्या म्हणजे ब्रिटीशांच्या वसाहतींमधील मुख्य वसाहत असणाऱ्या भारतात ब्रिटिशांना यावर पर्याय सापडला. ब्रिटीश रॉयल आर्मीला स्टीलचा पुरवठा करण्याचं काम टाटा स्टीलकडे लागलं. हे काम टाटा स्टीलकडून इतकं चोख झालं कि त्यामुळे खुश होऊन ब्रिटीशांनी टाटा स्टीलला ब्रिटीश रॉयल आर्मीसाठी खास सैन्यासाठी लागणाऱ्या गाड्या बनविण्याचं कंत्राट दिलं.

टेल्कोची स्थापना (Telco Founded )

आता गोष्ट अशी होती कि तोपर्यंत टाटा समूहाचं विशेष असं वाहन उत्पादन करण्याचं कोणतंही युनिट तेव्हा नव्हतं. पण आता मात्र आपला हा उद्योग मोठा होऊ शकतो हे टाटांच्या लक्षात आलं होतं.

आणि यातूनच मग 1945 मध्ये टेल्कोची अर्थात टाटा इंजिनिअरिंग एन्ड लोकोमोटिव्ह कंपनी म्हणजेच आजची टाटा मोटर्स अस्तित्वात आली. आणि या नवनिर्मित कंपनीचं नेतृत्व एका तरुण इंजिनीअरकडे सोपवण्यात आलं. त्या तरुणाचं नाव होतं सुमंत मुळगावकर. मुंबईत जन्मलेले सुमंत यांनी इंजिनिअरिंगची पदवी लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजमधून मिळवली होती.

ब्रिटीश रॉयल आर्मीसाठी लागणाऱ्या गाड्या बनविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपनीचा वाहन उद्योग आणखी वाढवायचं विस्तारायचं अशी योजना सुमंत यांच्या मनात तयार होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या टेल्कोच्या व्यावसायिक वाहन निर्मिती योजनेने वेग घेतला आणि मग रस्त्यावर दिसू लागले टाटा ट्रक. कारण याआधी भारतात वापरले जाणारे ट्रक आदी वाहने परदेशातून मागविले जायचे आणि त्यामुळे त्यावर लागणारे विविध कर, स्पेअर पार्टसची उपलब्धता, मेंटेनन्स खर्च इत्यादी ट्रक चालकांसाठी डोकेदुखीच होती.

पण आता टाटा ट्रक आल्यानंतर मात्र परिस्थिती पालटू लागली होती. यामुळे एकूणच देशातील दळणवळण वाढू लागले. उद्योग रोजगारास चालना मिळाली ज्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेस झाला. टेल्कोकडून नागरी वापरासाठी वाहन उत्पादन सुरु होणे हे सुमंत यांच्याच कष्टाचं फलित होतं. टेल्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा स्टीलचे व्हाईस चेअरमन अशा जेआरडी यांनी आपल्या या लाडक्या मित्राकडे दिलेल्या जबाबदाऱ्या सुमंत यांनी लीलया पेलल्या.

सुमंत आणि जेआरडी

टेल्कोतील त्या काळात सुमंत यांची आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल एक किस्सा नेहमी सांगितला जातो.

दुपारच्या जेवणाच्या वेळी जेव्हा कंपनीतील अगदी व्यवस्थापनातील उच्चपदास्थांपासून सर्वसामान्य कामगार कंपनीमध्येच आपले जेवण करत असत तेव्हा सुमंत मात्र जेवणा करण्याऐवजी आपली गाडी घेऊन कुठेतरी बाहेर निघून जात असत. सुरवातीला यात विशेष काही वाटलं नाही पण जेव्हा हि गोष्ट बरेचदा घडू लागली तेव्हा अनेक व्यवस्थापनातील अनेक उच्चपदस्थांच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. सुमंत कदाचित वाहनांच्या डीलर्ससह पंचतारांकित हॉटेल्समध्ये जेवण करण्यास जात असावेत आणि त्यादरम्यान त्यात त्यांचे स्वताचे काही हितसंबंध गुंतले असण्याची शक्यता त्यांना वाटू लागली. म्हणूनच मग एक दिवशी सुमंत यांचा पाठलाग करण्याचे यातील काहीजणांनी ठरवले.

नेहमीप्रमाणे जेवणाच्या वेळी सुमंत यांची गाडी कंपनीच्या आवारातून बाहेर पडली आणि त्या मागोमाग पाठलाग करीत या संशयी अधिकाऱ्यांची गाडीही निघाली. सुमंतयांची गाडी नक्कीच कोणत्या तरी पंचतारांकित हॉटेल बाहेर लागेल अशा अपेक्षेत असतानाच त्यांनी पाहिलं कि सुमंत यांची गाडी महामार्गावर असलेल्या एका ढाब्याच्या बाजूला थांबली. आश्चर्याचा धक्का बसलेले मागील गाडीतील अधिकारी गाडीतून उतरून ढाब्यामध्ये प्रवेश करते झाले आणि पाहतात काय तर सुमंत तेथील काही ट्रक चालकांसह तिथे जेवण करत बसले होते. आपल्या कंपनीच्या ग्राहकांचा आपल्या उत्पादनाबाबत असलेला प्रतिसाद, आवडलेली रचना तसेच त्यांना अपेक्षित असलेले बदल, याबद्दल थेट त्यांच्यात जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा हा प्रकार त्या ट्रक चालकांना जितका सुखावणारा तितकाच टेल्को मधील उच्चपदस्थांना चकीत करणारा होता.

इतकच नव्हे तर जेव्हा कधी व्यावसायिक निमित्ताने सुमंत याचं देशातील विविध भागात दौरे व्हायचे तेव्हाही महामार्गावरील एखाद्या ढाब्याजवळ थांबून जेवण घेणे सुमंत पसंत करायचे कारण इथे मिळणारा ग्राहकांचा ‘फीडबॅक’ त्यांच्यासाठी अस्सल असायचा. आणि याच गोष्ठी पुढे संचालक बैठकीत मांडल्या जाणून ग्राहकांच्या म्हणजेच ट्रक चालकांच्या समस्या, त्यांच्या आपल्या उत्पादनाकडून असलेल्या अपेक्षांवर खल होत असे. जेणेकरून पुढे आपली उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख राखणे टेल्कोला शक्य झालं. अर्थात वरील घटनांमधील तपशील वेगळा असू शकतो पण हे असं घडलंय हे मात्र नक्की.

कारखान्यात उत्पादित झालेला एक लाखावा ट्रक ग्राहक कर्तार सिंग यांना देताना सुमंत मुळगावकर, गंमत अशी कि टाटा ट्रकच्या पहिल्या ट्रकचे ग्राहक सुद्धा कर्तार सिंग हेच होते.

टाटा सुमोमधील ‘सुमो’ म्हणजेच सुमंत मुळगावकर ( sumant moolgaokar tata sumo )   

सुमंत यांना टेल्कोचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातच पण त्याच बरोबर टाटा स्टील मध्येही त्यांचं योगदान राहिलं आहे स्टीलच्याही संचालक मंडळात होते. रतन टाटा यांच्यासाठी सुमंत गुरुस्थानी होते आणि म्हणूनच १९94 मध्ये जेव्हा आपली पहिली मल्टीयुटीलीटी व्हेइकल श्रेणीतील गाडी आणली तेव्हा त्या गाडीस सुमंत याचं नाव दिलं. ‘टाटा सुमो’ (TATA SUMO) हीच ती गाडी जिच्या नावातील सुमो हे नाव सुमंत मुळगावकर यांच्या इंग्रजी लिपीतील नाव आणि आडनावातील ( SUmant MOolgaokar ) पहिल्या दोन आद्याक्षरांनी म्हणजेच ‘SUMO’ असं बेतलेलं आहे.

पुढे वर्ष 2003 मध्ये टेल्कोने टाटा मोटर्स हे नवीन नाव धारण केले, अर्थात काळानुरूप व्यापक व्यावसायिक दृष्टीकोनातून नाव बदलले असले तरी सुमंत मुळगावकर यांच्यासारख्या दृष्ट्या शिल्पकाराचा वारसा मात्र आजही कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *