(cryptocurrency terms in marathi) आजच्या अर्थसंकल्पात दरवर्षीप्रमाणे अनेक महत्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. त्यातील लक्षवेधी ठरलेल्या अनेक घोषणांपैकी एक म्हणजे रिझर्व्ह बँकेद्वारे भारताचे ब्लॉकचेन आधारित डिजिटल चलन वर्षभरात आणलं जाणार आहे आणि दुसरी ब्लॉकचेन आधारित डिजिटल एसेट्सवर कर आकारणी करणार असल्याची.
डिजिटल एसेट्स (Digital Assets) म्हणजेच ज्यात क्रीप्टोचलन, एनएफटी (NFT ) या गोष्टी येतात हे वेगळं सांगायची गरज नाहीच. आता वेगळ्या अर्थाने पाहिलं कि जेव्हा एखादी वस्तू, मालमत्ता करआकारणी संदर्भात विचारात घेतली जाते आणि त्याच बरोबर सरकारकडूनही देशाची अधिकृत डिजिटल चलन आणणार असल्याचं सुतोवाच केलं जातं तेव्हा याचा अर्थ हा सुद्धा होतो कि सरकारसाठी या बाबी स्वीकारार्ह होत आहेत. म्हणजेच सरकारकडून यास मान्यता मिळतेय का ? खरं तर थेट तसं सरकारने म्हटलेलं नाहीये पण संकेत नक्कीच दिलेत. किंवा थेट सांगायचं तर बंदी वगैरे घालणार या बाबी तर आता केव्हाच मागे ठरल्यात.
तर मग हाच विषय धरून क्रीप्टोचलन व्यवहारांमध्ये सामान्यता कोणत्या संज्ञा वापरल्या जातात आणि त्यांचे नेमके अर्थ आजच्या लेखातून सोप्या भाषेत, थोडक्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न करतोय.
ब्लॉकचेन (What is Blockchain in Marathi)
एक अत्याधुनिक गोळीबंद तंत्रज्ञान ज्यात माहिती डिजिटल रुपात अत्यंत सुरक्षित प्रकारे साठविली जाते. ब्लॉकचेनवर होणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण प्रकारांपैकी एक आहे क्रीप्टोचलन.
क्रीप्टोचलन (What is Crypto Currency in Marathi)
एक अशा प्रकारचे डिजिटल चलन ज्याचे व्यवहार कोणतीही बँक किंवा राष्ट्राकडून नियंत्रित न होता पिअर टू पिअर पद्धतीने होतात. जेव्हा तुम्ही क्रिप्टोकरन्सी फंड ट्रान्सफर करता, तेव्हा तो विशिष्ट व्यवहार सार्वजनिक लेजरमध्ये नोंदवला जातो. क्रीप्टोचलन हे डिजिटल पद्धतीने डिजिटल किंवा हार्डवेअर वॉलेटमध्ये साठवले जाते.
होड्ल (What is HODL )
नाही नाही .. चुकीने होल्ड ऐवजी होड्ल असं टाईप झालेलं नाही. क्रीप्टोचलन व्यवहारांत HODL (“hold on for dear life“) याचा अर्थ दीर्घकाळासाठी बाळगणे म्हणजे होल्ड याच अर्थाने आहे.
फूड (What is FUD in Crypto in marathi )
एखाद्या क्रीप्टोटोकन बद्दल नकारात्मकता पसरवायची असेल किंवा तशी परिस्थिती व्यक्त करायची असेल तर हि संज्ञा वापरली जाते. FUD म्हणजे “Fear, Uncertainty, and Doubt”
टोकन (What is crypto token in marathi )
ब्लॉकचेनवर असलेले विशिष्ट मूल्याचे एकक ज्यात सामान्यतः मूल्य हस्तांतरणाव्यतिरिक्त काही इतरही मूल्य प्रस्तावित असतात. उदाहरणार्थ टोकन :डॉह्ज कॉईन,(Dogecoin) शिबा इनू (Shiba Inu)
फीएट करन्सी ( What is Fiat currency in marathi )
अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर आपण जे नेहमी बाळगतो ते चलन. म्हणजे रुपये, डॉलर्स , पौंड. एखाद्या देशाकडून नियमन केली जाणारे चलन म्हणजेच फीएट करन्सी.
बिटकॉईन (What is Bitcoin in marathi )
सर्वात पाहिलं क्रीप्टोचलन इतकी ओळख खरंतर पुरेशी नाही. वर्ष 2008 मध्ये निर्मित आणि वर्ष 2009 पासून वापरात आलेल्या या क्रीप्टोचलनाने आता फार मोठा पल्ला गाठलाय.
सातोशी नाकामोतो. (who is satoshi nakamoto in marathi )
बिटकॉईनचा निर्माता. म्हणावं तर अज्ञात, आभासी असं हे व्यक्तिमत्व खरंच अस्तित्वात आहे कि हे नाव इतर कुणी व्यक्ती, संस्था किंवा व्यक्तींच्या समूहाने धारण केलंय हे समजण्यास वाव नाहीये. पण अगदी ‘फिनोमेनल’ ठरलंय हे नाव यात काही शंका नाही.
एथेरीअम ( what is ethereum in marathi )
बिटकॉईन नंतर सर्वात मोठी आणि महत्वाची क्रीप्टोप्रणाली म्हणजे एथेरीअम. विश्लेषकांच्या मते एथेरीअमचा विस्तार हा बिटकॉईनपेक्षा मोठा असेल. कारण एथेरीअम स्वतः एक स्वतंत्र विकेंद्रित ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे जे एक पीअर-टू-पीअर नेटवर्क स्थापित करतं.अनेक विविध क्रीप्टो प्रकल्प एथेरीअम तंत्रज्ञानावर उभारले जातात.
अल्टकॉईन (what is altcoin in marathi)
खरंतर बिटकॉईन आणि काही प्रमाणात एथेरीअम सोडून इतर सर्व क्रीप्टोचलनांना अल्टकॉईन म्हणजेच पर्यायी क्रीप्टोचलन म्हणून संबोधलं जातं. म्हणजे ती क्रीप्टोचलने जी स्वताची क्षमता वाढवून वेगळी ओळख निर्माण करतात.
शिटकॉईन (what is shitcoin in marathi)
नावातच सगळं आलं. जसं शेअर्समध्ये आपण पेनी स्टॉक्स म्हणतो तसंच काहीसं इथे क्रीप्टोकॉईनबाबत. अगदी कमी किंवा कोणतंही स्वतंत्र अस्तित्व नसलेले.काही कागदोपत्री बरेच प्रकल्प दिसणारे पण प्रत्यक्षात काहीच नाही. पण सट्टेबाजीसाठी जास्त पसंती असणारे असे हे शिटकॉईन्स. अर्थात असे असले तरी यातील काही थोड्या गुंतवणुकीत रांकाचे राव आणि मोठी गुंतवणुक असेल तर रावाचे रंक सुद्धा करण्याची क्षमता राखतात. त्यामुळे जरा जपूनच.
‘मूनींग’ किंवा ‘टू द मून’ ( To the moon )
एखाद्या क्रीप्टोचलनाचे मूल्य अगदी अत्त्युच्च शिखरावर जाणे या अर्थाने हि संज्ञा वापरली जाते.
व्हेल (whale in cryptocurrency )
ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये मोठे गुंतवणूकदार , बिग बुल , शार्क या संज्ञा ज्या अर्थाने वापरल्या जातात त्या अर्थाने इथे क्रीप्टोचलनांमध्ये मोठी गुंतवणूक बाळगून असणारयांसाठी हि संज्ञा आहे.
पंप (what is PUMP in cryptocurrency)
एखाद्या क्रीप्टोचलनाची किंमत (कृत्रिमरीत्या ) वाढणे किंवा वाढवत नेणे या अर्थाने हि संज्ञा वापरली जाते. जसं शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक ‘ऑपरेट करणे’ ज्या अर्थाने घेतात अगदी तसंच.
डम्प (what is DUMP in cryptocurrency )
पंपच्या अगदी उलट म्हणजे क्रीप्टोचलनाची किंमत (कृत्रिमरीत्या ) घटणे किंवा घटवणे या अर्थाने हि संज्ञा वापरली जाते.
‘सॅट’ अर्थात ‘सातोशी’ ( SAT )
बिटकॉईनचा निर्माता सातोशी नाकामोतो यावरून हे बेतलेलं आहे. जशी एक रुपयाचा छोटा हिस्सा पैसे आणि डॉलर्सचा सेंट्स मध्ये असतो तसंच बिटकॉईनचा किमान भाग (0.00000001) हा सातोशी म्हणून ओळखला जातो.
क्रीप्टो एक्स्चेंज (Top crypto exchanges in world)
हे अगदी जसं शेअर्सच्या व्यवहारांसाठी असलेल्या एक्स्चेंजसारखंच जिथे क्रीप्टोचलनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात. जगातील आघाडीचे क्रीप्टो एक्स्चेंजेस मध्ये बायनान्स, कॉईनबेस इत्यादी तसेच भारतात वझीरेक्स आणि इतर ओळखले जातात.
मित्रांनो या क्षेत्रात अशा अनेक संज्ञा आहेत ज्यांची माहिती आम्ही देत राहूच. पण आताची हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा. आणि हे फक्त आपल्यापर्यंत मर्यादित ठेवू नका, तुमच्या जवळच्या मित्र परिवाराशी शेअर नक्की करा. क्रीप्टोचलनासंदर्भात आमचे इतरही लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.