NSE IFSC in MarathiNSE IFSC in Marathi

आतापर्यंत तुम्हाला अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक व्यवहार करण्यासाठी अमेरिकन एक्स्चेंजशी नोंदणीकृत असलेल्या भारतातील विनवेस्टा (WINVESTA ) किंवा वेस्टेड फायनान्स सारख्या ब्रोकरकडे खाते असणे गरजेचे होते. पण आता हि गुंतवणूक तुम्हाला अमेरिकेत नोंदणीकृत ब्रोकरमार्फत करायची गरज नाही.

कारण आता एनएसई आयएफएससी ( NSE IFSC in Marathi ) हे नवे एक्स्चेंज व्यासपीठ एनएसईकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

IFSC म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (International Financial Service Centre).  ही पूर्णतः NSE च्या मालकीची उपकंपनी असून आणि तिला गुजरातच्या ‘गिफ्ट’ (Gujarat International Finance Tec-City) शहरात आंतरराष्ट्रीय एक्सचेंज स्थापन करण्यास बाजार नियामकाकडून मान्यता मिळाली आहे.

NSE IFSC मध्ये कोणत्या आर्थिक उत्पादनांचे व्यवहार करता येतील ?

 यामध्ये खालील आर्थिक गुंतवणूक व्यवहार करता येतील.

 • भारताबाहेर स्थापित झालेल्या कंपन्यांचे इक्विटी शेअर्स
 • डिपॉझिटरी पावती
 • कर्ज रोखे
 • चलन
 • निर्देशांक
 • व्याज दर
 • बिगर कृषी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज.

अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल याचा अर्थ यूएस स्टॉक्स भारतात सूचीबद्ध होत आहेत का?

मुळीच नाही. यामध्ये अमेरिकन बाजारातील गुंतवणूक व्यवहार ‘NSE IFSC रिसीप्टस’ या आर्थिक उत्पादनांमुळे शक्य होणार आहे. या रिसीप्टस त्या -त्या संबंधित अमेरिकन कंपनीच्या शेअर्ससाठी NSE IFSC एक्सचेंजकडून भारतीय गुंतवणूकदारांना किमान मूल्यात ऑफर केल्या जातील .

NSE IFSC रिसीप्टस काय आहेत ? ( What is NSE IFSC Receipts )

यूएस म्हणजेच अमेरिकन स्टॉक्स भारतीयांसाठी गुंतवणूक करता येण्याजोगे करण्यासाठी पुढील प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.

यात अमेरिकेतील शेअर्सची खरेदी NSE IFSC सदस्य ब्रोकरकडून केली जाईल आणि त्या संदर्भातील पावत्या म्हणजेच या गुंतवणूक मूल्य असणाऱ्या रिसीप्टस इथल्या भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक मुल्यानुसार दिल्या जातील. या NSEIFSC रिसीप्टस म्हणून ओळखल्या जातील. हे थोडं फार आपल्या म्युच्युअल फंडासारखंच, जसं तिथे आपल्याला आपलं गुंतवणूक मूल्य एनएव्हीच्या रुपात युनिट्समध्ये दिलं जातं.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने स्टॉकची एक रिसीप्ट विकत घेतली, तर त्याच्याकडे त्या कंपनीचा हिस्सा असेल का?

नाही. NSE IFSC ने स्पष्ट केल्यानुसार गुंतवणूकदाराला त्या विशिष्ट शेअरच्या मूल्य आणि संख्येच्या गुणोत्तराच्या प्रमाणात रिसीप्टस दिल्या जातील. यात थेट हिस्सेदारी नसेल.

उदाहरणार्थ,
एपलचा 1 शेअर 100 NSE IFSC रिसीप्टसच्या समतुल्य,
तसेच अमेझॉनचा 1 शेअर 200 IFSC रिसीप्टसच्या समतुल्य असेल.

तर मग त्यानुसार आपल्या गुंतवणूक मुल्यानुसार आपल्याला रिसीप्टस प्राप्त होतील. म्हणजे इथे आपल्याला भांडवली बाजाराप्रमाणे त्या-त्या कंपनीत थेट हिस्सेदारी प्राप्त होत नाही हे लक्षात घ्या.

कसं कराल या रिसीप्टस मध्ये व्यवहार ? (How to trade in US Stocks through NSE IFSC in marathi)

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार यासाठी तुम्हाला NSE IFSC नोंदणीकृत ब्रोकर्ससोबत ट्रेडिंग आणि डीमॅट खाते उघडावे लागेल.

त्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्थानिक बँक खात्यातून NSE IFSC नोंदणीकृत ब्रोकर खात्यात निधी हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

याद्वारे अमेरिकन बाजारात व्यवहार करण्याची वेळ काय असेल? (US Stock market Hours )

अर्थातच अमेरिकन बाजाराच्या व्यवहाराचा कालावधी इथे पाळला जाईल. म्हणजे आपल्या भारतीय प्रमाण वेळेनुसार हे व्यवहार संध्याकाळी 8 ते पहाटे 2.30 पर्यंत सुरू राहतील.

करदायित्व कसे असेल ?

कळीचा मुद्दा. हि गुंतवणूक परदेशी मालमत्ता म्हणून गणली जाईल ज्यात अल्पकालीन नफ्यावर ( Short Term Capital Gain ) स्लॅब दराने कर आकारणी केली जाते तर दीर्घकालीन नफ्यावर ( Long term capital Gain ) 20% कर इंडेक्सेशनसह आकारला जातो.

कोणकोणत्या अमेरिकन कंपन्यांत करता येईल गुंतवणूक? ( Which US Stocks are available in NSEIFSC )

एनएसई आयएफएससी ( NSE IFSC in Marathi ) एक्स्चेंज एकूण 50 अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. पण सुरवातील यामध्ये अमेझॉन (amazon), टेस्ला (Tesla ), अल्फाबेट (गुगल Google) , मेटा ( फेसबुक Facebook ) मायक्रोसॉफ्ट (Microsoft), नेटफ्लिक्स (Netflix), एपल (Apple) आणि वालमार्ट (Wallmart) या आठ कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

एनएसई आयएफएससी नोंदणीकृत ब्रोकर कोणते ? ( NSE IFSC registered Member Brokers)

अमेरिकन शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेले NSE IFSC नोंदणीकृत ब्रोकर्स तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता.

मित्रांनो हे तर होतं अमेरिकन शेअर मार्केट मध्ये व्यवहार करण्याच्या NSE IFSC ने उपलब्ध करून दिलेल्या सेवेबद्दल.

पण समजा दर महिन्यास अशीच छोटीशी गुंतवणूक गुगल , एपल सारख्या अमेरिकन कंपन्यांत किंवा क्रिप्टोचलनात फुकट तुम्हाला करत आली ? म्हणजे तुमच्या खिशातून कोणतेही पैसे न जाता दर महिन्यास किरकोळ का होईना पण एसआयपी पद्धतीने तुमची अशी गुंतवणूक होत राहिली तर ? ज्यामध्ये तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसेल पण झाला तर फायदाच असणार.

आश्चर्य वाटतंय ना ? उत्सुकता असुद्या कारण याबद्दल आम्ही लवकरच सांगू, इथेच आमच्या वेबसाईटवर. तर मग आमच्या वेबसाईटचे अपडेट अलर्ट तुम्ही चालू केले नसतील तर आताच करून ठेवा.

धन्यवाद !

सदर लेख कोणताही गुंतवणूक सल्ला अथवा शिफारस नसून फक्त माहितीदाखल आहे याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *