दुबईच्या क्रिप्टोकॉईनची पहिल्याच दिवशी झेप.
Dubaicoin Cryptocurrency
दुबईतील क्रिप्टोचलन दुबईकॉईनचा ( DubaiCoin (DBIX ) काल क्रिप्टोबाजारात प्रवेश झाला आणि पहिल्याच दिवशी या क्रिप्टोकॉईनने धुमधडाका माजवला. काल म्हणजे 27 मे रोजी पहिल्याच दिवशी हा कॉईन आपली मूळ किंमत म्हणजे 0.17 डॉलर्स ( भारतीय चलनात 12 .32 रुपये ) पासून झेप घेत पुढील चोवीस तासात 1.13 डॉलर्स ( भारतीय चलनात जवळपास 82 रुपये ) पर्यंत मजल मारली.
crypto.com ने दिलेल्या वृत्तानुसार पब्लिक ब्लॉकचेनवर आधारित हे क्रिप्टोचलन काही निवडक क्रिप्टो एक्स्चेंजेसवर ट्रेड होतंय. पब्लिक ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे यात गुंतवणूकदार स्वतः आपले क्रिप्टोचलन निर्मिती करू शकतो.
कुठून आलं हे नवीन क्रिप्टोचलन ?
दुबईकॉईन (DubaiCoin (DBIX) अरेबियन चेन टेक्नोलॉजी ( Arabianchain Technology ) ने लॉन्च केलं आहे. या क्रिप्टोचलनाबद्दल तिथे दोन टोकाचे मतप्रवाह दिसून येत आहे , एका घटकाच्या मते म्हणजे जे या क्रिप्टोचलनाच्या निर्मितीशी निगडीत आहेत, त्यांच्यानुसार हे क्रिप्टोचलन दुबईतील मुख्य क्रिप्टोचलन म्हणून समोर येत आहे तर त्याच वेळी या विरोधातील म्हणजे दुबई इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीच्या ( Dubai Electronic Security Centre) मतप्रवाहानुसार अशी कोणतीही मान्यता या “अरेबियन चेन टेक्नोलॉजी कंपनीस” दिली गेलेली नसून हि एक बनवाबनवीची (Phishing ) योजना असून याबाबत तपास केला जात आहे.
अरेबियन चेन टेक्नोलॉजीचे म्हणणंं काय ?
या क्रिप्टोचलनाची सादरकर्ती अरेबियन चेन टेक्नोलॉजीने माध्यमांना दिलेले स्पष्टीकरणात असं सांगितलंय कि नेहमीच्या पारंपारिक चलनाऐवजी खरेदी-विक्री सारख्या विनिमय व्यवहाराकरिता यापुढे दुबई कॉईनचा ( DubaiCoin ) अधिकृत वापर केला जाईल तसेच यापुढे नवीन डिजिटल चलनांचे नियमन दुबई शहर प्रशासन आणि तेथील अधिकृत ब्रोकर्स यंत्रणांकडून केले जाईल.
क्रिप्टोचलन गुंतवणूकदारांसाठी दुबई तुलनेत सुरक्षित मानले जात असले तरी दुबई कॉईन ( DubaiCoin ) अजूनही जगातील आघाडीच्या आणि विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या Binance आणि त्यामुळेच भारतातील WazirX सारख्या क्रिप्टोएक्स्चेंजेस वर व्यवहारासाठी उपलब्ध झालेलं नाही.
तसंच संयुक्त अरब अमिरातीनेही (UAE) आपण यासंदर्भात अजून कोणतेही निवेदन जाहीर केले नाही आहे असं स्पष्ट करत सावध केले आहे.
सदर लेख हा फक्त माहितीपर असून याद्वारे कोणत्याही गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नये. गुंतवणूक करताना तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी.