असं क्वचितच घडलं असेल कि एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांनी रज्जा घ्यावी आणि तो काळ त्यांनी व्यावसायिक व्यत्ययाशिवाय उपभोगावा या साठी तरतूद करते किंबहुना तसा नियमाच बनवते. बरेचदा असं होतं कि तुम्ही सुट्टी घेता आणि त्या दरम्यान ऑफिसमधून काही तातडीच्या कामासाठी फोन येतो किंवा तातडीची मीटिंग लागते किंवा मग रजेवर असूनही काही कामाचे अपडेट नियमित द्यावे लागतात. पण या कंपनीत मात्र काहीसं उलट आहे.
म्हणजे तुम्ही या कंपनीतून काही काळ सुट्टी घेता पण त्यादरम्यान व्यावसायिक कारणांसाठी तुमच्या कंपनीतून तुम्हाला कोणीही संपर्क करत नाही. कारण तसे केल्यास तुम्हाला संपर्क करून तुमच्या सुट्टीत व्यत्यय आणणाऱ्यास मात्र आर्थिक दंड भरावा लागेल. अशी तरतूदच या कंपनीने केली आहे.
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या मुंबईतील ‘ड्रीम 11’ या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रजेवर असणाऱ्या आपल्या सहकाऱ्याशी संपर्क साधल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. असं नवीन धोरणच कंपनीने आखलं आहे.(new HR rule in dream11 )
कंपनीचे सह-संस्थापक भावित शेठ यांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल सांगितलंय. 2008 मध्ये स्थापन झालेल्या Dream11 या कंपनीने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून किमान एक आठवडा सुट्टी घेणे सुद्धा बंधनकारक केले आहे.
शेठ यांनी सांगितलंय , “वर्षातून एकदा, एका आठवड्यासाठी, तुम्ही कंपनीच्या सिस्टममधून लॉक आऊट आहात. कंपनीकडून तुम्हाला मेसेजेस, ईमेल आणि कॉल काहीही येणार नाहीत नाहीत. जेणेकरून तुम्हाला तुमची सुट्टी आरामात आणि मजेत घालवता येईल. आणि त्यामुळे खुद्द कंपनीलाही आपण कोणावर कितपत अवलंबून आहेत हे कळण्यास मदत होते.”
36 वर्षीय शेठ म्हणाले की, या प्रणालीने आतापर्यंत कंपनीला फायदाच झाला आहे. ‘ड्रीम 11’ च्या मते कर्मचार्यांना वर्षातून अशी हक्काची विश्रांती दिल्याने ते वैयक्तिक आयुष्यात रिचार्ज होऊन व्यावसायिक आयुष्यात अर्थात कामावर पुन्हा दाखल होतात आणि त्यात त्यांचे सर्वोत्तम योगदान देतात.