मोरूला त्याचा मित्र बंड्या सांगत होता कि समोरच्या बिल्डींगमधला राजेश आता चांगला श्रीमंत झालाय.
म्हणजे असं का वाटतं तुला ?
मोरूचा मित्राला प्रश्न
अरे, गेल्याच आठवड्यात उपनगरात एक फ्लॅट घेतला त्याने, चारचाकी गाडी या आधीच घेतली आहे, गावाला जमीन, शिवाय पाचेक तोळं सोनं सुद्धा करून ठेवलंय.
बंड्याने एका दमात मोरूला सांगून टाकलं
तसं नसतं रे भावा, समोर दिसतं त्यावरून परीक्षा करू नये, आजच्या क्रेडीट कार्ड, पे-लेटर आणि ईएमआयच्या जगात तर मुळीच असं करू नये. मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा तर तू श्रीमंत आहेस.
आता हे सांगताना मोरू गाडी विश्लेषणाच्या मार्गावर आणू लागला.
काय , मी त्याच्यापेक्षा श्रीमंत ? हे कसं काय ?
बंड्या आता ऐकायला उतावीळ झाला होता.
तुला त्या राजेशची नेटवर्थ किती हे सांगता येईल ?
मोरूने बंड्याला हसत-हसत विचारलं .
नेटवर्थ ? ते काय असतं ? आणि त्याचा या श्रीमंती-गरिबीशी काय संबंध.
गोंधळलेल्या बंड्याचा मोरूला प्रतिप्रश्न .
थोडा वेळ असेल तर मग लक्ष देऊन ऐक,
हातावरच्या स्मार्टवॉचमध्ये वेळ पाहत मोरू मित्राला म्हणाला
एखादी व्यक्ती श्रीमंत आहे कि गरीब हे आपण कसं ठरवतो ? आपण ढोबळमानाने त्याच्याकडील संपत्ती मोजतो. त्याचं घर , गाडी, सोनं आणि जमीन जुमला वगैरे. आणि त्यानुसार त्याची श्रीमंत किंवा गरीब यातील वर्गात रवानगी करून टाकतो.
‘नेट-वर्थ’ म्हणजे काय ? (what is net worth in marathi )
पण हे करताना आपण फक्त बेरीज करतो आणि वजाबाकी मात्र विसरतो. कारण एखाद्याकडील संपत्तीचे मोजमाप करताना त्याची मालमत्ता वजा त्याचे दायित्व ( अर्थात कर्ज आणि इतर आर्थिक देणी) हि साधी-सोपी पद्धत नेट वर्थ शोधताना वापरतात.
नेट वर्थ ही एक आर्थिक संज्ञा आहे जी एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची वास्तविक सांपत्तिक स्थिती दर्शवते म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालमत्ता (त्याच्या मालकीच्या गोष्टी) वजा त्यांच्या दायित्वांचे (त्यांच्यावर असलेले कर्ज) एकूण मूल्य दर्शवते.
ही संकल्पना आणखी स्पष्ट करण्यात मदत करण्यासाठी, आपण राजेशचेच उदाहरण घेऊ. राजेशचे राहते घर सामाईक कुटुंबाचे आहे त्यामुळे ते इतक्यात त्याच्या संपत्तीत धरता येणार नाही, पण त्याने उपनगरात घेतलेल्या नव्या फ्लॅटची आजची किंमत ₹90 लाख इतकी आहे. त्याच्याकडे ₹1 लाखांची बचत आहे आणि कार घेताना जरी तिची किंमत ₹10 लाख असली तरी आता दीड वर्षानंतर मात्र तिचे मूल्य ८.५ लाख इतके असेल. पाच तोळे सोने ज्याची किंमत अडीच लाखांपर्यंत. तसेच गावाकडील जमिनीची आताचे मूल्य 6 लाखांच्या आसपास आहे. तर ही आहे त्याची मालमत्ता.
दुसरीकडे, आता त्याचे दायित्व अर्थात कर्ज-जबाबदारी पाहूयात, फ्लॅट घेताना त्याने गृहकर्ज काढले होते. ज्यातील ₹70 लाखांचे गृहकर्ज त्याला फेडायचे आहे. या व्यतिरिक्त कार घेताना घेतलेल्या वाहन कर्जातील ₹5 लाखांचे कर्ज फेडणे बाकी आहे. गावाकडे जमीन आहे पण ती नुकतीच गहाण ठेवून ४ लाखाचे कर्ज त्याने घेतले आहे.
होय त्याने काही दागिने नक्की केले आहेत पण त्यामधील जवळपास ३ तोळे दागिने त्याने क्रेडीट कार्डवर खरेदी केले होते आणि त्या क्रेडीट कार्ड थकबाकीचे त्याने कर्जात रुपांतर करून ईएमआय सुरु केले आहेत. हि कर्ज रक्कम आजच्या घडीला दीड लाखांपर्यंत आहे. या व्यतिरिक्त . 2 लाखांचे वैयक्तिक कर्ज त्याच्यावर आहे.
राजेशच्या निव्वळ संपत्तीचे (Net worth) मूल्य काढण्यासाठी आपण त्याच्या मालमत्तेमधून त्याच्या दायित्वे वजा करूया.
एकूण संपत्ती मूल्य ( Net Assets Value )
संपत्ती | मूल्य |
---|---|
घर | ₹90 लाख |
बचत | ₹1 लाख |
गावाची जमीन | ₹6 लाख |
सोने | ₹2.5 लाख |
गाडीचे आताचे मूल्य | ₹8.5 लाख |
एकूण संपत्ती | 1 कोटी आठ लाख |
आता राजेशचे एकूण दायित्व पाहूया,
दायित्व (Net liabilities)
दायित्व | मूल्य |
---|---|
गृहकर्ज | ₹70 लाख |
वाहन कर्ज | ₹5 लाख |
गहाणखत (कर्ज ) | ₹4 लाख |
क्रेडीट कार्ड कर्ज | ₹1.5 लाख |
वैयक्तिक कर्ज | ₹2 लाख |
एकूण मालमत्ता | 82 लाख पन्नास हजार. |
तर मग नेटवर्थ सूत्र, (Net worth formula )
नेटवर्थ = ‘एकूण मालमत्ता मूल्य’ उणे ‘एकूण दायित्व’
म्हणून 1,08,00,000 – 82,50,000 = 25,50,000
तर, राजेशच्या मालमत्तेचे निव्वळ मूल्य अर्थात नेटवर्थ आहे ₹25,50,000 (रुपये पंचवीस लाख पन्नास हजार)
हे सांगून झाल्यावर मोरू बंड्याला म्हणाला, “तुझं आपल्या इमारतीमधील घर स्वतःचं आहे, ज्याचं आताचं मूल्य 70 लाखांच्या आसपास आहे आणि त्यावर तू घेतलेले गृहकर्ज 40 लाखांच्या आसपास आहे.”
“म्हणजे इथे 70 लाख – 40 लाख = 30 लाखांची मालकी मूल्य तुझं आहे. याव्यतिरिक्त तुझं कोणतेही वेगळे कर्ज किंवा दायित्व नाहीये त्यामुळे तुझी दुचाकी, बचत खात्यात २५ हजारांची रक्कम, आणि दीड तोळ्याच्या आसपास असलेलं सोनं गृहीत धरून दीड लाखांच्या आसपास रक्कम तुझ्याकडे आहे.”
“आता हे सगळे विचारात घेता जवळपास 31 लाख पन्नास हजार तुझी नेट वर्थ आहे जी तुझ्यामते श्रीमंत वगैरे असणाऱ्या राजेशच्या साडे पंचवीस लाखांपेक्षा जास्तच आहे कि.”
आपण हे सांगितल्यानंतर बंड्याच्या चेहऱ्यावर आलेल्या समाधानाची नोंद घेत मोरू घराकडे निघाला.
अर्थात हे झालं बंड्या आणि राजेश बदल, तुम्हाला तुमची नेट वर्थ माहित आहे का ? नसेल माहित तर खालील ‘नेटवर्थ कॅलक्युलेटर’ (Net worth calculator) च्या सहाय्याने ती जाणून घेऊ शकता. यामध्ये मालमत्ता असो वा दायीत्वे, त्यांचे सध्याचे मूल्य प्रविष्ट करावे.
‘नेट वर्थ कॅलक्युलेटर’ (Net worth calculator)
श्रीमंती मूल्यमापनी गणक
संपत्ती (₹)
दायित्व (₹)
‘हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ ( What is HNI in marathi )
हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ अर्थात एचएनआय म्हणजे उत्तम सांपातिक स्थित असणाऱ्या अशा व्यक्ती ज्यांची निव्वळ मालमत्ता दहा लाख डॉलर्सपेक्षा ( भारतीय रुपयांत सध्या 8 कोटीहून अधिक) जास्त आहेत. आता गंमत अशी कि कर्जबाजारी, अयशस्वी उद्योगपती म्हणून अलीकडे ज्यांचा उल्लेख होतो त्या अनिल अंबानींची नेटवर्थ आजही 250 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच ‘हाय नेटवर्थ इंडीविज्युअल’ या वर्गात ते मोडतात.
मला आशा आहे की हे स्पष्टीकरण, तक्ता आणि ‘नेट वर्थ कॅलक्युलेटर’ च्या सहाय्याने तुम्हाला ‘नेट वर्थ’ हि संकल्पना समजली असेल.