‘गाडीतून पैसे निघाले, पण पोहोचलेच नाहीत.’
एखादी हॉलिवूड किंवा गेलाबाजार साऊथच्या चित्रपटात शोभेल अशी स्टोरीलाईन वाटते ना ? पण हे वास्तवात घडलंय, निदान सरकारी महितीमधून असाच काही निष्कर्ष निघतोय.
काय प्रकरण ?
ही विवादित, हरवलेली वगैरे रक्कम आहे तब्बल ₹88 हजार कोटींची.
सरकारने 500 रुपयांच्या 88106.5 लाख नोटा छापल्या होत्या, पण त्यापैकी रिझर्व्ह बँकेकडे फक्त 72600 लाख नोटा पोहोचल्याचं आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीतून उघड झालं आहे.
म्हणजे इथे 500 रुपयांच्या सुमारे 15500 लाख नोटा रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्याच नाहीत.
असंच काहीसं घडलं एप्रिल 2015 ते मार्च 2016 दरम्यान, जेव्हा नाशिकच्या करन्सी नोट प्रेसद्वारे 500 रुपयांच्या 2100 लाख नोटा छापण्यात आल्या, पण त्या रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचल्याच नाहीत.म्हणजे या दोन्ही घटना पाहता 500 रुपयांच्या एकूण 176 कोटी नोटा मधल्या मध्येच महामार्गातून गायब झाल्या का? आणि या सर्व नोटांची किंमत काढली तर ती सुमारे 88 हजार कोटी रुपये इतकी निघतेय.
माहिती कुठून आली समोर ?
सामाजिक कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून हि बाब समोर आली आहे. भारतात 3 सरकारी टांकसाळी आहेत, जिथे चलनी नोटा छापल्या जातात. यामध्ये पहिली, ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान लिमिटेड’, जी बंगळुरूमध्ये आहे. दुसरी ‘करन्सी नोट प्रेस’, जी नाशिकमध्ये आहे आणि तिसरी ‘बँक नोट प्रेस’ , जी देवासमध्ये आहे. चलनी नोटा येथे छापल्या जातात आणि नंतर भारतीय अर्थव्यवस्थेत वितरीत होण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठविल्या जातात.
अर्थात वरील घटनांमधून अघटीत निष्कर्ष निघत असला तरी संबंधित सरकारी खात्यांकडून यावर स्पष्टीकरण आल्यानंतरच अनेक बाबी स्पष्ट होतील. (rbi notes went missing.)