फुकटची गुंतवणूक. Investment with free capital

Investment with cashback
Image Source : Internet

भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करावी. बरं कुठे करावी तेही थोडंफार कळतं. पण मुळात खर्च भागवून काही उरतच नाही तर गुंतवणूक करायचीच कसली ? पण जास्त नाही पण थोडीफार अशी गुंतवणूक शक्य असेल आणि ती फुकटात गुंतवणूक करता येणार असेल तर ?  (Investment with free capital )  फार मोठी नाही पण हे शक्य आहे.

गुंतवणूक कशी करावी ? हा प्रश्न जितका सोप्पा वाटतो तितकं त्याचं उत्तर कठीण आहे.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने  प्रत्येकाचे  गुंतवणुकीचे आडाखे, त्यातील समस्या आणि त्या दूर करून पुढे जाण्याचे प्रयत्न वेगवेगळे असतात. काहीजणांना यातील बऱ्यापैकी कळत असतं पण मुळात रोजचा खर्च भागवून काही उरतच नाही मग गुंतवण्यासाठी पैसे आणायचा कुठून हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो म्हणजे आड्यातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार असा प्रकार.
तर आज आपण थोडा यावरच सांगणार आहोत. यातून तुम्ही अगदी ४-५ वर्षात कोट्याधीश व्हाल असं मुळीच नाही पण अशीही गुंतवणूक करता येते हे मात्र नक्की.
मित्रांनो एक काळ होता जेव्हा रोजची घरातील नियमित कामे करण्यात बराच वेळ जायचा म्हणजे उदाहरणार्थ विजेचे बिल. हे बिल भरण्यासाठी लांबच लांब रंग लावाव्या लागायच्या. आणि आज हे सगळं मोबाइलवर टॅपनिशी होऊन जातं.वीज बिल असो किंवा मोबाइल, डीटीएच रिचार्ज, गॅस बुकिंग, इन्शुरन्स प्रीमियम, हेच काय तर अगदी महिन्याचं वाणसामान पेमेंट सुद्धा युपीआय आणि त्या सारख्या इतर अनेक अँप्स मधून हे करता येतं.
हे आता का सांगतोय तर हे सगळं करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला कॅशबॅक नावाचा प्रकार मिळत असतो.मग कधी विचार केलाय का कि  हि कॅशबॅक म्हणून मिळणारी रक्कम सुद्धा गुंतवली तर ? त्या त्यावेळी हि रक्कम अगदीच किरकोळ वाटत असेल पण जेव्हा नियमित स्वरूपात तुम्ही हे कराल आणि त्याची वेळोवेळो होणारी वाढ लक्षात येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि गुंतवलेली हि छोटी अगदी फुकट  मिळणारी रक्कम सुद्धा बर्यापैकी परतावा देऊ शकते.
 
अनेक पेमेंट्स एप्स  दरमहिन्याला रिचार्ज , बिल पे आणि अशाच अनेक वारंवार किंवा दर महिन्याला कराव्या लागणाऱ्या व्यवहारांसाठी  कॅशबॅक देत असतात. अनेकदा छोट्या मोठ्या खरेदीचे पेमेंट सुद्धा त्या विशिष्ट खरेदीवर असलेल्या ऑफर, स्कीम पाहून केलं तर तिथेही कॅशबॅक मिळून जाते.
अर्थात सगळेच पेमेंट एप्स हि कॅशबॅक (Cashback) बँक खात्यात पाठवत नाहीत पण कॅशबॅक म्हणून  मिळणारे पैसे म्हणजे तसे फुकटचेच मिळणारे असतात म्हणजे रोजचे दर महिन्याचे  व्यवहार उदा. मोबाइल रिचार्ज किंवा वीज बिल वगैरे ज्याचा भरणा करणं तुम्हाला भागच आहे मग कॅशबॅक मिळो ना मिळो. म्हणजे यावर मिळालेले हे पैसे बोनस आणि अगदी तशी काही तरतूद नसताना मिळतात. मग हि रक्कम नाहीच आहे असं समजून गुंतवून टाकायला काय हरकत आहे ? 
 
काही एप्सवर तुम्हाला कॅशबॅक म्हणून मिळालेल्या रक्कमेत तुम्ही थेट डिजिटल सोने घेऊ शकता. अमेझॉनमध्ये कॅशबॅक तुम्ही पुन्हा पुढील बिल पे रिचार्ज किंवा इतर आवश्यक खरेदीसाठी वापरून त्यासाठीचे तुमच्या खिशातील पैसे गुंतवणूक म्हणून वापरू शकता.
म्हणजे समजा मला या महिन्यात २५० रुपये ऍमेझॉन पे वर कॅशबॅक मिळाले तर येणारं माझं नवीन बिल किंवा रिचार्ज मी त्या कॅशबॅकमधून करून त्यासाठीचे ठेवलेले माझ्या बँक खात्यातील पैसे गुंतवणूक करेन. मग ते एनपीए च्या टियर २ खात्यात जिथे कमाल किंवा किमान गुंतवणुकीची अट नाही अशा ठिकाणी गुंतवून टाकेन किंवा अगदीच वाटलेच तर येस बँकेच आजच्या दरानुसार  १५-१६ समभाग खरेदी करेन ( येस  बँक फक्त उदाहरणादाखल  सांगितलं आहे शिफारस नव्हे ) म्हणजे अगदीच नकारात्मक विचार  जरी केला म्हणजे उद्या समजा अगदीच ती कंपनी बुडाली तरी हे  पैसे मला फुकट मिळाले होते अशीही मनाची समजूत घालता येईल आणि जर उलट झालं तर मात्र मज्जाच मज्जा. म्हणजे ” विन-विन सिच्युएशन “
 
आता हे झालं कॅशबॅकप्रकाराबद्दल. असे अनेक मार्ग आहेत म्हणजे रद्दी पेपर , जुनं भंगार वगैरे मधून येणारी रक्कम वरकरणी फुटकळ वाटत असली तरी तिला अशा प्रकारे गुंतवून अगदी विसरून जायचं. कारण हि गुंतवणूक तुमच्या नियमित कमाईच्या पैशातून होतच नाहीये पण कोण जाणे हीच गुंतवणूक भविष्यात सुखद धक्का मात्र नक्की देऊ शकेल. 
 
हा विषय घेण्याचं कारण म्हणजे आयुष्यात ‘कंजूस’ नाही पण ‘मनी माईंडेड’ नक्की व्हा. 
 
छोटी मोठी त्या त्या वेळी  फुटकळ वाटणारी रक्कम गुंतवण्यात एक चांगली बाजू अशी आहे कि या गुंतवणुकीचं  मनावर ओझं होत नाही किंवा एखाद्या मोठ्या एकरकमी गुंतवणुकीप्रमाणे त्यावर वारंवार लक्ष देण्याची ना गरज भासत, ना त्याची सवय होत. कारण बरेचदा मोठी गुंतवणूक आपल्या ‘सबकॉन्शस  माइंड’ मध्ये जागा बनवून बसलेली असते. त्यामुळे अडी-अडचणीच्या वेळी सर्वात आधी सुरुंगसुद्धा तिला लागतो. 
 
म्हणूनच अशी छोटी वरचेवर होणारी फुकटची गुंतवणूक महत्वाची ठरू शकते.   
 
हाच विषय खाली  आमच्या या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पहा.
 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *