Credit card payment through credit card ? क्रेडीट कार्डचे बिल क्रेडीट कार्डने ?
Credit card payment through credit card ? क्रेडीट कार्डचे बिल क्रेडीट कार्डने करता येईल का ? तर याचं थेट उत्तर आहे ” नाही ” क्रेडीट कार्डचे पेमेंट करणे आता पूर्वीसारखं म्हणजे चेक ड्रॉप बॉक्स मध्ये टाका किंवा इंटरनेट बँकिंग लॉग इन करून नेफ्ट ( NEFT ) करा असं वेळ खाऊ नाही राहिलं. आज आपल्यासमोर CRED , Google Pay , Phonepe असे अनेक पर्याय आहेत ज्यांच्या सहाय्याने पेमेंट करताना पैसे तुमच्या बँक खात्यातून अगदी सेकंदात वळते होऊन क्रेडीट कार्ड बिल पेमंत होऊन जातं.
पण समजा सध्या खात्यात पैसेच नाहीयेत किंवा येण्यास काही दिवसांचा अवधी आहे आणि अशा वेळी क्रेडीट कार्डचे पेमेंट करण्याचा शेवटचा दिवस असेल तर ? खात्यात पैसे येईपर्यंत थांबायचं म्हटलं तर दंड आकाराला जाण्याची भीती.
मग अशा वेळी काय?
हे जाणून घेण्याआधी आजच्या या लेखाचा विषय क्रेडीट कार्ड असण्यामागील पार्श्वभूमी समजून घेऊ.
तर झालं काय, परवा 16 जून रोजी आम्ही एक ट्वीट केलं होतं.
क्रेडिट कार्डने क्रेडिट कार्डचे बिल जेव्हा पे करता येईल तेव्हा बऱ्याच जणांचे आर्थिक प्रश्न सुटतील.. 😂😂
— शेअ₹ बाजा₹ म₹1ठी (@marathistock) June 16, 2021
” क्रेडिट कार्डने क्रेडिट कार्डचे बिल जेव्हा पे करता येईल तेव्हा बऱ्याच जणांचे आर्थिक प्रश्न सुटतील..” असं खरंतर गम्मत म्हणून केलेलं ते ट्वीट होतं पण त्या ट्वीटने अनेकांची दुखरी नस पकडली कारण अनेकांनी हे ट्वीट लाईक केलं आणि त्यावर कॉमेंट केलं.
खरं सांगायचं तर क्रेडीट कार्डचे बिल क्रेडीट कार्डने भरता येईल अशी अपेक्षा करणे म्हणजे भाजीवाला, दुकानदार यांच्याकडे एखादी वस्तू त्यांना ती पडणाऱ्या खरेदी किंमतीत मागण्यासारखे. म्हणजे दुकानदाराला घाऊक खरेदीमध्ये साबणाची वडी रु.14 या किंमतीत मिळते आणि तिची विक्री किंमत रु.15 आहे. पण काय होईल जर ती त्याने पंधरा रुपयांत न विकत चौदा रुपयांना विकली ? त्याला लवकरच दुकान बंद करावं लागेल..
तर असंच काहीसं क्रेडीट कार्डच्या बाबतीत आहे जे बँकाचं एक लोकप्रिय आर्थिक उत्पादन आहे. क्रेडीट कार्डने तुम्ही बऱ्याच गोष्टीचं पेमेंट करू शकता पण काही बाबतीत तुम्ही क्रेडीट कार्ड नाही वापरू शकत. उदाहरणार्थ शेअर्स मध्ये गुंतवणूक, आयपीओ साठी अर्ज करताना करावे लागणारे पेमेंट आणि एका क्रेडीट कार्डद्वारे दुसर्या क्रेडीट कार्डचे पेमेंट.
काय झालं असतं जर एका क्रेडीट कार्डद्वारे दुसर्या क्रेडीट कार्डचे पेमेंट करता आलं असतं तर ?
Credit card payment through credit card ?
समजा तुमच्या क्रेडीट कार्डचे या महिन्याचे बिल आहे वीस हजार आणि स्टेटमेंट बनल्यापासून तुम्हाला ते साधारणता पंधरा दिवसात भरावं लागणार आहे. जर नाही भरलं तर तुम्हाला दंड आणि त्या रकमेवर साधारणता 3.5% ते 4% महिना दराने व्याज आकारले जाते. मग अशा वेळी तुमच्या समोर दोन पर्याय असतात.
1 ) क्रेडीट कार्डचे पूर्ण बिल भरू टाकणे, ना दंड ना व्याज.
2 ) किमान भरणा रक्कम ( Minimum Amount Due ) भरून दंडापासून सुटका करणे पण 3.5% ते 4% महिना दराने व्याज मात्र ओढवून घेणे. आणि यात आणखी एक तोटा म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण बिल रक्कम न भरता किमान भरणा रक्कम ( Minimum Amount Due ) हा पर्याय स्वीकारता तेव्हा तुम्हाला नवीन खरेदीवर मिळणारा व्याजमुक्त कालावधीचा लाभ मिळणे बंद होतो म्हणजेच खरेदी केल्यापासून तुम्हाला बँक व्याज आकारायला सुरवात करते.आणि मूळ रक्कम भरायला मोठा कालावधी लागतो त्याच बरोबर व्याजापोटी मोठी रक्कम तुम्ही बँकेला देता.
आणखी एक तिसरा पर्याय असतो जो रोगापेक्षा उपाय भयंकर म्हणजे म्हणजे क्रेडीट कार्ड द्वारे ATM मधून कॅश एडव्हान्स चा वापर करून पैसे काढणे पण हे फारच भयंकर असतं. याबाबत तुम्ही आमच्या आधीच्या लेखात इथे क्लिक करून सविस्तर वाचू शकाल.
पण कारणे काहीही असोत पण बऱ्याच जणांची अवस्था ” पहिला पर्याय शक्य ( सद्या ) नाही आणि इतर दोन स्वीकारायचे नाहीत अशी असते. आणि मग आपल्या डोक्यात “या क्रेडीट कार्डद्वारे दुसर्या क्रेडीट कार्डचे पेमेंट करता आलं असतं तर..” अशा रम्य कल्पना येतात ज्या शक्य नसतात.
मग अशा परिस्थितीत काय करता येईल ?
खरं सांगायचं तर अशी आर्थिक संकटाची वेळच आपल्यावर येणार नाही अशा प्रकारचे आर्थिक नियोजन असावे.पण एखाद्या वेळी आर्थिक चणचणीमुळे असं होतं असेल तर त्यावेळच्या सोयी साठी खालील पर्याय आजमावता येऊ शकतात. अर्थात तसं करावं कि नाही याचा निर्णय ज्याचा त्याने स्वतःहून घ्यावा.
मोबिक्विक ( MobiKwik ) : या एपने नुकतीच सेवा देऊ केलंय ज्याद्वारे आपण आपल्या क्रेडीट कार्डमधून आपल्या बँक खात्यात पैसे वळू शकतो. अर्थात या एपबद्दल सांगण्यामागे कोणतीही स्पॉन्सरशिप अथवा एन्डॉर्समेंट नाही हे आम्ही स्पष्ट करतो. इतर काही एप असतीलही पण आता आम्हाला महित असलेलं एप म्हणून या एपबद्दल सांगत आहोत.
तर या प्रकारात मोबिक्विक ( MobiKwik ) एपद्वारे तुमच्या क्रेडीट कार्डमधून रक्कम काढताना सुरवातीला एकदाच 1.7 % – 1.8% च्या दरम्यान प्रोसेसिंग चार्ज आकाराला जातो. म्हणजे जर तुम्ही दहा हजार रक्कम काढणार असेल तर तुम्हाला साधारणता रु.170 – 180 च्या आसपास शुल्क आकारले जाते.
काय फरक ?
हा व्यवहार तुमच्या क्रेडीट कार्डमध्ये नेहमीच्या खरेदी वगैरे प्रकारच्या व्यवहाराप्रमाणे नोंदला जातो. आता हा व्यवहार जर तुम्ही तुमच्या स्टेटमेट दिनांकानंतर दुसऱ्या दिवशी करत असाल तर तुम्हाला या एपद्वारे त्यावेळी एकदाच लागणारा 1.7 % शुल्क सोडल्यास पुढील जवळपास 50 दिवस व्याजविरहित कालावधी मिळतो.
थोडं उदाहरणाने पाहूया.
क्रेडीट कार्ड बिल : रु. 10,000
किमान भरणा रक्कम : 500 ( 5 % च्या हिशेबाने ) जी भरल्यावर तुम्हाला दंड आकाराला जाणार नाही पण उर्वरित रकमेवर ( रु.9500 ) महिना 3.5% ते 4% दराने व्याज आकारणी होणार.
आता यामध्ये तुम्ही वर सांगितलेला पर्याय आजमावणार असाल तर तुम्हाला आधी दोन्ही क्रेडीट कार्डच्या स्टेटमेंट तारखा सुनियोजित आहेत का पाहाव्या लागतील.जर नसतील तर काही बँका ग्राहकाच्या सोयीनुसार सेटमेंट तारखेत बदल करून देतात तसं करून घेता येत असेल तर उत्तम.
म्हणजे समजा तुमच्या सध्या बिल भरावयाच्या क्रेडीट कार्डची (क्रेडीट कार्ड “अ”) स्टेटमेंट तारीख दर महिन्याची आहे आणि बिलाचा भरणा करावयाची अंतिम तारीख 2 असेल तर मग तुम्ही दुसऱ्या क्रेडीट कार्डचा (क्रेडीट कार्ड “ब ” ) वापर 1 तारखेला करायला हवा आणि त्यासाठी तुमच्या या दुसऱ्या कार्डची ( ब ) स्टेटमेंट डेट महिना अखेरची 30, 31 असेल तर उत्तम, नसेल तर तशी बदलून घेता येते का पाहावे म्हणजे तुम्हाला त्या क्रेडीट कार्डचा जवळपास 50 दिवसांचा व्याजरहित कालावधी उपलब्ध होतो.
म्हणजे पहिल्या क्रेडीट कार्डचे बिल ( रु.10,000 ) तुम्ही एक रकमी भरू शकता आणि त्यासाठी पुढील 50 दिवस दुसर्या क्रेडीट कार्डचा व्याजरहित कालावधी मिळतो.अर्थात एपवर प्रत्येक व्यवहारावेळी आकाराला जाणारा 1.7% शुल्क लक्षात घेतलं तर दीड महिन्यासाठी असलेला हा व्याजदर वार्षिक हिशेबाने साधारणतः 9% इतका आकारला जातो.
क्रेडीट कार्डचा वापर शेअर्स, आयपीओ साठी करता येत नाही अशा वेळी हा पर्याय सोय वाटू शकते पण या पर्यायाचा वापर करण्याची वेळ येऊ न देणेच उत्तम.आणि अगदीच करायचं झालंच तर एखाद्या वेळी तात्पुरत्या कालावधीसाठी चालून जाईल पण जर ते वारंवार करावं लागत असेल तर तुम्ही आर्थिक चक्रव्युव्हात ( कि दृष्टचक्रात ?) फसू लागलेले आहात असं समजायला हरकत नाही.
अर्थात या एपमधील या सेवेत सुद्धा रोजच्या आणि एकूण व्यवहाराच्या रकमेला मर्यादा आहेतच त्यामुळे विहित रकमेतच हे केलं जाऊ शकतं.
महत्वाची सूचना : सदर लेखातील मते हि पूर्णपणे वैयक्तिक असून ती फक्त माहिती दाखल व्यक्त केलेली आहेत. तसेच याद्वारे कोणतीही शिफारस करण्यात आलेली नसून वाचकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन घ्यावा.
लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.