शेअर मार्केटमधील आघाडीचे गुंतवणूकदार.
Top Stock Market Investors in India.
जगात वॉरेन बफे आणि भारतात राकेश झूनझूनवाला हि मार्केटची शब्दशः ब्रँडनेम्स वगळता अशीही काही नांवे आहेत ज्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून आपलं साम्राज्य उभं केलंय. अशा या मार्केटमधील आघाडीच्या गुंतवणूकदारांबद्दल ( Top stock market Investors in India ) आज आपण जाणून घेऊया.
शेअर मार्केटचा विषय निघाला कि हटकून एक नांव डोळ्यासमोर येतं , ते म्हणजे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं. त्याच बरोबर 1988 -89 मध्ये मधु दंडवते यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने कसे त्यांचे दिवस पालटले. तसंच सेसा गोवा मधील ती मल्टीबॅगर गुंतवणूक, अशा अनेक सुरस कथा अनेकदा ऐकून – चघळून झालेल्या आहेत. पण सर्वसामान्य किंवा शेअर मार्केटमध्ये नव्याने येणाऱ्या बऱ्याच जणांना माहित नसतं कि झुनझुनवाला यांच्या पलीकडेही अशी अनेक नांवे आहेत ज्यांना मार्केटने घडवलं आहे.
Richest Investors in India
आज आपण अशाच महत्वाच्या व्यक्ती माहित करून घेणार आहोत ज्यांना आज शेअर मार्केटमधील आघाडीचे गुंतवणूकदार अर्थात मार्केटचे महारथी समजलं जातं.
पोरीन्जू वेलीयथ ( Porinju Veliyath ) कोची मधील एका मध्यमवर्गीय परिवारातील तरुण, सर्वसामान्यांच्या आयुष्यात येणारा संघर्ष या तरुणाच्याही आयुष्यात होता. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण सुरु असतानाच अनेक प्रकारच्या नोकऱ्या केल्या आणि याच नोकरीत काही चांगली संधी शोधण्यासाठी 1990 मध्ये मुंबईत येणे झाले मुंबईत कोटक सिक्युरिटीज मध्ये फ्लोर ट्रेडर म्हणून काम सुरु केले.
पोरीन्जू साठी हे क्षेत्रच पूर्णतः नवीन होतं आणि त्यात शिकण्याची नैसर्गिक भूक असल्यामुळे अल्पावधीतच स्टॉक मार्केट मधील अनेक खाचा खोचा माहित करून करून घेतल्या. पोरीन्जुनी इथे जवळपास चार वर्षे काम केले. त्यानंतर मग काही वर्षे पराग पारीख सिक्युरिटीज रिसर्च एनालीस्ट आणि फंड मॅनेजर म्हणून काम केले. पुढे 1999 मध्ये कोचीला परत जाऊन स्वतःच या क्षेत्रात पूर्ण वेळ देवून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान जिओजित फायनान्शिअल सर्विसमध्ये पहिली मोठी गुंतवणूक, ती सुद्धा अशा वेळी जेव्हा हा शेअर अगदी खालील पातळीवर होता पण स्वतःच्या अभ्यासावर विश्वास असलेल्या पोरीन्जुनी सर्वांचे आडाखे चुकवत या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवला.
पुढे 2002 मध्ये त्यांनी स्वतःची पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनी सुरु केली जी आजच्या काळातील प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहे.
विजय केडिया ( Vijay Kedia ) 1978 पासून या क्षेत्रात, पण त्यामागे एक कारण आहे. परिवाराचाच स्टॉक ब्रोकिंगचा व्यवसाय आणि त्यात पुढे वडिलांचे निधन झाल्यामुळे व्यवसायाची धुरा विजय यांच्याकडे आली. सुरवातीला तसं काही ठीकठाक चालत नव्हतंच कारण डॉक्टर , वकील या इतर व्यावसायिकांसारखं इथे कोणत्याही कॉलेज, विद्यापीठातून शिकून पदवी मिळत नसते. त्यासाठी मुळातच तुमच्यात गोडी असावी लागते.
विजय यांनी त्या काळातील इतर यशस्वी गुंतवणूकदारांबद्दल वाचायला सुरवात केली. ब्रोकिंगवरून वळून आता गुंतवणूकदार म्हणून सिद्ध व्हायचं ठरवलं. अनेक कंपन्यांचा मुलभूत विश्लेषणाच्या सहाय्याने अभ्यास करायला सुरवात केली अन् यातून त्या काळात मिळवलेली सुमारे रु.35,000 रक्कम पंजाब ट्रॅक्टरमध्ये गुंतवली आणि तो शेअर जवळपास सहापटीने वाढून पस्तीस हजाराची ती गुंतवणूक २.१ लाख रुपये झाली. त्यानंतर मग ACC वगैरे अशा अनेक कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक फळफळली. आज पाचशे कोटींहून अधिक संपत्ती त्यांविजय यांनी शेअर मार्केटमधून उभारली आहे.
रामदेव अग्रवाल ( Raamdeo Agrawal ) : अगदी थेट ओळख करून द्यायचे म्हणजे मोतीलाल ओसवाल समूहाच्या संस्थापकांपैकी एक. अगदी सुरवातीस म्हणजे ऐंशीच्या दशकात शेअर्समध्ये गुंतवणुकीस सुरवात जी अगदी 1994 पर्यंत कायम होती. त्यातूनही त्यावेळी त्यांचा जवळपास 10 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ होता. त्यानंतर वॉरेन बफे यांचे चुकीचे शेअर्स साठवून ठेवण्यापेक्षा उत्तम शेअर्सच्या निवडी बाबतचे गुंतवणूक सूत्र त्यांच्या वाचण्यात आलं मग अगदी वर्षभराच्या काळात त्यांच्या पोर्टफोलिओचा आकार दुप्पट झाला. अग्रवाल यांची आज जवळपास रु.६५०० (Portfolio of top Investors in india 2021 ) कोटीच्या आसपास संपती आहे.
रमेश दमाणी ( Ramesh Damani ) : वॉरेन बफे यांचे गुंतवणूक सूत्र अनुसरणारा गुंतवणूकदार अशी रमेश यांची ओळख. म्हणजे काय तर, चांगली पत आणि उत्तम संचालक मंडळ असणाऱ्या प्रथितयश कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची आणि ती दीर्घ काळ ठेवायची, असं साधं सोप्पं वाटणारे पण उत्तम अभ्यासाची गरज लागणारे असं हे सूत्र. अनेक सूचीबद्ध तसेच असुचीबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना त्या त्या कंपन्यांची इत्यंभूत माहिती मिळवणे आणि त्यावर अभ्यास करून विश्लेषणाअंती गुंतवणुकीचा निर्णय घेणे यात रमेश दमाणी यांचा हातखंडा असल्याचे मानले जाते.
निमिष शहा ( Nemish Shah) : नामांकित गुंतवणूक सल्लागार कंपनी एनाम (ENAM ) चे सहसंस्थापक. यांच्याबद्दल तुम्ही फारच क्वचित ऐकलं वाचले असेल. कारण निमिष स्वतः प्रसिद्धी आणि माध्यमांपासून दूरच राहणे पसंत करतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि काळानुरूप सिद्ध होणाऱ्या गुंतवणूक युक्त्यांसाठी ते ओळखले जातात. असाही इंडिया ( Asahi India ) सारख्या कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक जी तीन वर्षांत साडेतीन पटीत वाढली. भारंभार शेअर्स घेण्यापेक्षा ते अगदी मोजक्याच आणि क्षेत्रास अनुसरून असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे ते पसंत करतात. आज निमिष यांची जवळपास रु. १३,००० कोटींची मालमत्ता असल्याचे म्हटले जाते.
डॉली खन्ना ( Dolly Khanna ) व्हॅल्यु इन्व्हेस्टर म्हणून ओळख असलेल्या डॉली खन्ना वर्ष 1996 पासून शेअर मार्केट क्षेत्रात आहेत. सुरवातीच्या काळातील फर्टिलायझर क्षेत्रातील तत्कालीन स्मॉल कॅप कंपनीत केलेली गुंतवणूक त्यांना भरभराट दाखवून गेली. एखादा भविष्यात मल्टीबॅगर ठरू शकणारा शेअर कसा निवडावा, गुंतवणुकीत वेळेवर नफा निश्चिती कशी करावी हि डॉली यांची शक्तीस्थळे. त्यांचे पती राजीव खन्ना डॉली यांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन पाहतात.
तर मित्रांनो हे आजच्या काळातील मार्केटचे महारथी, ज्यांचा आतापर्यंतचा प्रवास आपल्याला मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतो . पण लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये भूतकाळातील कामगिरी भविष्याची खात्री देत नाही त्यामुळे प्रत्येकवेळी नवनवीन अनुभव देणाऱ्या मार्केटसाठी नवनवीन तंत्र, अभ्यास पद्धतीचा शोध सुरूच ठेवला पाहिजे तरच दीर्घकालीन यशाबद्दल आपल्याला आशावादी राहता येईल.