आर्थिक नियोजन / व्यवस्थापन किती गांभीर्याने (Personal Finance in Marathi)
आर्थिक नियोजन (Financial Management in Marathi ) किंवा आर्थिक व्यवस्थापन ( Personal Finance in Marathi ) या गोष्टी अगदी अगणित वेळा वाचण्यात , ऐकण्यात आलेल्या असतात. बरेचदा अगदी गंभीर चर्चा वगैरे सुद्धा झडलेल्या असतात या विषयावर. कित्येकांच्या नववर्षाच्या संकल्पात हा विषय सालाबादप्रमाणे असल्यासारखा कारण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र तितक्या गांभीर्याने होत नाही.
खरं तर साधं-सोप्पं होऊ शकणारं नियोजन उगाचच किचकट आणि गंभीर करण्यात आपल्या लोकांचा हाथाखंडा आहे तसंच काहिसा इथे होतं. काय करू, कसं करू करत करत मग ‘ एक ना धड भाराभर चिंध्या ‘ असे आर्थिक उत्पादने आपल्या माथी मारून आपण घेत असतो. पण आज आम्ही तुम्हाला अगदी साधी-सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे स्वतःचं आर्थिक व्यवस्थापन आणि नियोजन तुम्हाला सहजपणे करता येईल.
चौरस आर्थिक व्यवस्थापन ( Financial Management in Marathi )
उत्तम आरोग्यासाठी चौरस आहार महत्वाचा असतो. हे अगदी शाळेत असल्यापासून आपण शिकत आलोय. मग अगदी हाच आधार घेऊन उत्तम आर्थिक आरोग्यासाठी साधं सोप्पं चौरस आर्थिक व्यवस्थापन उपयोगी ठरू शकतं. नक्की काय आहे हि पद्धत ? आपण समजून घेऊया.
खरं तर सर्वसामान्यांची वित्तसाक्षरता लक्षात घेऊन आर्थिक संकल्पना त्यांना सहजपणे समजतील अशा प्रकारे त्यांच्या समोर मांडणे आवश्यक आहे. जे होत नाही. अनेक क्लिष्ट संकल्पना आणि फाफट-पसारा त्यांच्या समोर मांडून त्यांना गोंधळात टाकून मग त्यांच्या गळ्यात चुकीची आर्थिक उत्पादने मारली जातात . म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा युलिप, एकल हफ्त्याची विमा योजना विकल्या जातात. अर्थात व्यक्तिपरत्वे बाब वेगळी असू शकते.
चौरस आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय ? ( What is financial management in Marathi )
हा प्रकार मांडताना सुटसुटीत आणि संकल्पना सोपी राखण्याचा प्रकार आम्ही केला आहे. व्यक्तीच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन आर्थिक बाजू भक्कम कशी राखता येईल या दृष्टीने आर्थिक जबाबदारी चार घटकांत विभागली. जे पुढील प्रकारे आहे.
सिप – SIP अर्थात सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमॆंट प्लान ( Systematic Investment Plan)
आताशा तसं बऱ्याच जणांना माहिती झालेला हा प्रकार, पण अनेक जण याचा संदर्भ फक्त म्युच्युअल फंड सारख्याच प्रकारांना लावत असतात.पण खरं म्हणजे बहुतांश गुंतवणूक हि SIP पद्धतीनेच होणे उत्तम. कारण जोखीमाचा फॅक्टर याद्वारे विभागाला जात असतो. SIP पद्धत बहुतांश गुंतवणूक प्रकारांत वापरली जाऊ शकते.
काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जिथे तुम्ही SIP पद्धतीने गुंतवणूक करू शकता ज्यामध्ये डायरेक्ट इक्विटी म्हणजेच थेट शेअर मार्केटमधील गुंतवणूक, पण प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक शक्य नसेल त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड आहे. त्यानंतर मग सोने ( सोन्यात जवळपास पाच पद्धतीने गुंतवणूक करता येते त्यापैकी काहीसं सांगणारा आमचा लेख इथे क्लिक करून वाचू शकता ) आहे किंवा मग एनपीएस ( National Pension System) आणि पीपीएफ असे पर्याय येतात.
हे आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय सांगण्याचा हेतू हाच कि यात केली जाणारी गुंतवणूक SIP पद्धतीने होणे दीर्घकालीन विचार करता फायद्याचे ठरते.
हिप – HIP म्हणजेच हेल्थ इन्श्योरन्स प्लान ( Health Insurance Plan )
तुम्ही नोकरदार असा, व्यावसायिक किंवा मग उद्योजक. आपापल्या व्यवसायात अर्थार्जनासाठी तुम्ही कष्ट उपसत असता. पण लक्षात घ्या कि तुम्ही तुम्ही सुपरहिरो नाही आहात. तुम्ही आजारी पडू शकता. तुमच्या कुटुंबातील इतरजण आजारी पडू शकतात. कारण आरोग्याच्या समस्या कुणाला चुकत नाहीत आणि अशावेळी पडणारा आर्थिक भार मोठा असू शकतो. हे आता कोरोना काळात अनेकांना उमगलं असेल. मग अशा वेळी आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्श्योरन्स असणे म्हणजे अगदी मस्ट आहे. नाहीतर अशावेळी पडणारा आर्थिक फटका तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काही वर्षे मागे नक्कीच ओढू शकतो.
टीप TIP म्हणजेच टर्म इन्श्योरन्स प्लान ( Term Insurance Plan )
आज तुम्ही सुखात असाल. व्यवसाय नोकरीत धडपडत असाल. अनेक योजना तुमच्या मनात आकार घेत असतील ज्यावर तुम्ही काम करत असाल. कुटुंबासाठी अनेक स्वप्नं मनात असतील. पण दोन मिनिटे बंद डोळे करून कधी तुमच्या शिवाय त्यांची कल्पना केलेय ? काय होईल जर हे सगळं एखाद्या दुर्दैवी घटनेने थांबवलं तर ? अशा काळासाठी काही नियोजन आहे ? असायलाच हवं.
अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनीही अफजल खानच्या भेटीस जाण्यापूर्वी जर भेटीमध्ये काही अनिष्ट, अप्रिय परिणाम झाल्यास अशा परिस्थितीत राज्य कारभार आणि पुढील योजनासंदर्भात सूचना संबंधितांना करून ठेवल्या होत्या. यावरून महाराजांच्या व्यवस्थापन आणि नियोजनकौशल्याची प्रचीती येते. महाराजांसारखं पराक्रमी युगपुरुष व्यक्तिमत्वसुद्धा काळाच्या अशाश्वत अशा गुणांना कमी लेखत नव्हतं तर मग आपण तर अगदी सामान्यजन. म्हणूनच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील आपली धडपण कोणत्याही चिंतेविना कायम राहू द्यायची असेल तर आपल्यामागे आपल्या कुटुंबाची आर्थिक परवड न होऊ देण्यासाठी मुदत विमा म्हणजेच टर्म प्लान असावाच.
टर्म प्लानमध्ये विमाधारकाचा मृत्यू ( काही योजनेत जायबंदी झाल्यासही ) ठरलेली रक्कम विमाधारकाच्या कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते. याव्यतिरिक्त यामध्ये कोणताही परतावा नसतो. आणि त्यामुळे मुदत विम्याची प्रीमिअम रक्कम कमी असते. खरंतर विम्याचं प्रयोजन गुंतवणूक नसतंच त्यामुळे कोणतीही विमा पॉलीसी घेताना परताव्याचा निकष लावू नका.
फिप – FIP (Financial Emergency Provision ) म्हणजेच आणीबाणी तरतूद
वेळ कधी सांगून येत नाही हे कोरोनाने सप्रमाण सिद्ध केलं आहेच. पण अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यातही असं बरेचदा होतं. अचानक नोकरी सुटणे, उद्योग – व्यवसायात नुकसान वगैरे सारख्या घटना तुम्हाला बॅकफुट नेऊ शकतात. अशावेळी जर तुमच्याकडे राखीव फंड नसेल तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. म्हणूनच फिप FIP (Financial Emergency Provision ) म्हणजेच आणीबाणीसाठी आर्थिक तरतूद महत्वाची ठरते.
सामान्यतः महिन्याच्या आर्थिक कमाईमधील दहा ते पंधरा टक्के रक्कम आर्थिक आणीबाणी करिता बाजूला काढावी असा संकेत आहे. आणि सदरची रक्कम इतर कोणत्याही उद्देशासाठी न वापरता फक्त आणि फक्त अशा आणीबाणीच्या काळासाठीच असावी. जेणे करून अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीशी तुम्ही सक्षमपणे दोन हात करू शकाल.
तर मित्रांनो हे होते चौरस आर्थिक व्यवस्थापनाचे चार कोन म्हणजेच सिप, हिप, टीप आणि फिप. या चार प्रकारे जरी तुम्ही आर्थिक नियोजन केलंत तरी तुमची आर्थिक बाजू बळकट होऊ शकते.
लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. आमचे इतर लेख वावाचण्यासाठी इथे क्लिक करा.
( लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )