Babu George ValaviBabu George Valavi

बरेचदा वाचायला-ऐकायला मिळतं कि अमुक एखाद्या कंपनीच्या शेअर्समधील तमुक गुंतवणूक आज इतकी झाली असती. पण हे तसं प्रतीकात्मक असतं. कारण अशी गुंतवणूक केलेली आणि आज खरच इतक्या संपत्तीचा मालक आहे असं काही दाखवायला कोणी व्यक्ती समोर नसते. पण आज मात्र आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जिने खरच शेअर्समध्ये काही वर्षापूर्वी (खरंतर दशकांपूर्वी ) केलेली गुंतवणूक तब्बल 1448 कोटींची झालेय. पण यातही एक ट्वीस्ट आहे. ( Babu George Valavi a Small-time Kochi investor to reclaim Rs 1,448.5 crore)

हि व्यक्ती आहे केरळातील कोचीमधील बाबू जॉर्ज वालवी (Babu George Valavi) ज्यांनी १९७८ मध्ये केलेली गुंतवणूक आज तब्बल रुपये 1448 कोटींची झालेय. पण सदर गुंतवणूक मिळविण्यासाठी मात्र 74 वर्षीय वालवी यांना संघर्ष करावा लागत आहे.

काय आहे प्रकरण ( Babu George Valavi to recliam 1448 crore )

या सगळ्याची सुरवात झाली वर्ष 1978 मध्ये, जेव्हा वालवी आणि त्यांच्या कुटुंबातील चार नातेवाईकांनी मेवाड ओईल्स आणि जनरल मिल्सचे ३,५०० शेअर्स खरेदी केले. उदयपुरमधील हि कंपनी तेव्हा बाजारात सूचीबद्ध नव्हती. आणि वालवी हे या कंपनीच्या वितरकांपैकी एक होते. तेव्हा वालवी यांची हि गुंतवणूक तेव्हा ती कंपनीच्या एकूण २.8% हिस्सेदारी इतकी होती. म्हणजे वालवी यांची कंपनीत 2.8 % मालकीच होती म्हणाना. पण कंपनी सूचीबद्ध नव्हती आणि लाभांशसुद्धा देणारी नसल्याने (अर्थात तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता ) वालवी आणि त्यांचे कुटुंबीय हि गुंतवणूक जवळपास विसरूनच गेले.

त्यानंतर पुढे वर्ष २०१५ मध्ये घरातील जुने कागदपत्रे चाळत असताना वालवी यांच्या नजरेत पुन्हा हे कागदोपत्री शेअर्स ( फिजिकल शेअर्स ) आले. त्यांनी उत्सुकतेतून या गुंतवणुकीची सध्याची अवस्था काय आहे हे पहायचं ठरवलं आणि त्यातून समोर आलं आश्चर्य चकित करणारं वास्तव.

वालवीना समजलं कि मेवाड ओईल्स आणि जनरल मिल्स कंपनीने आता आपलं नाव बदलून पी आय इंडस्ट्रीज ( PI Industries ) हे नाव धारण केलंय. आणि कंपनीचा कारभार उत्तम चालला असून ती फायद्यात सुद्धा आहे. म्हणून आपल्याकडील फिजिकल इलेक्ट्रोनिक स्वरुपात रुपांतरीत करून शेअर्स डिमॅट वळते करून घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी शेअर ब्रोकरला संपर्क केला. अर्थात प्रकरण जुनं आणि तेव्हाच होतं जेव्हा कंपनी सूचीबद्ध नव्हती, म्हणून ब्रोकरने या संदर्भात वालवींना थेट कंपनीला संपर्क करण्यास सांगितलं.

त्यानुसार वालवीं आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क केल्यावर त्यांना बसलेला धक्का मोठा होता. कारण कंपनीचं यावर उत्तर होतं.

“तुम्ही आता कंपनीचे भागधारक नाही आहात ”

कारण त्यांची शेअर्स स्वरूपातील हि हिस्सेदारी १९८९ मध्येच इतरांना विकली गेली होती.

कंपनीच्या काखा वर केल्यानंतर वालवीं आणि कुटुंबीयांनी कंपनीवर आरोप केला कि बनावट शेअर्सच्या माध्यमातून त्यांची हिस्सेदारी इतरांना विकली आहे कारण हि किचकट प्रक्रिया खरंतर मूळ शेअर धाराकांशिवाय शक्यच नाही.

यामुळे भविष्यातील अडचणींची चाहूल लागल्याने कंपनीने वर्ष २०१६ मध्ये वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीला आमंत्रित केले ज्यास वालवींनी नकार दिला. त्यानंतर कंपनीने आपले दोन उच्च अधिकारी केरळला वालवींच्या घरी त्यांची शेअर्स कागदपत्रांची अस्सलता तपासण्यास पाठविले. ज्यातून सदर कागदपत्रे अस्सल असल्याची खात्री झाल्यानंतरही कंपनीकडून पुढे मात्र कोणताही पाठपुरावा झाला नाही.

वालवींच्या स्थानिक मध्यामांना सांगताना वालवींनी सांगितलंय कि त्यांच्याकडे असलेल्या शेअर्स कागदपत्रांनुसार त्यांच्या शेअर्सची संख्या आज ४२.८ लाख इतकी असून ज्याचे सध्याचे बाजार मूल्य जवळपास रु. १४४८ कोटी इतकं झालंय.

वालवींचं दावा असाही आहे कि ज्या १३ जणांनी १९८९ मध्ये त्यांची हिस्सेदारी घेतली ते इनसायडर म्हणजेच आतल्याच गोटातील आहेत. तसेच तत्कालीन कंपनी सेक्रेटरी जीसी जैन या सगळ्या शेअर्स हस्तांतरण प्रकरणामागे असू शकतात तसेच जैन यांचे स्वताचे नातेवाईक सुद्धा या शेअर्स हिस्सेदारांपैकी एक असावेत.

मग आता पुढे काय ?

सध्या वालवींनी प्रकरण बाजार नियामक म्हणजेच सेबीकडे नेलं असून कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळत असल्याची व्यथा आपल्या तक्रारीत मांडली आहे.

तर मित्रांनो हि होती वालवींची कथा आणि व्यथा, तुम्ही सुद्धा तुमचे वडिलधारे म्हणजे बाबा, काका यांना विचारून पहा कि त्यांनी वयाच्या एखाद्या टप्प्यावर अशी एखादी गुंतवणूक केलेय का ? काय सांगता येतंय , कदाचित एखादं घबाड यातूनही मिळून जाईल.

गंमतीचा भाग सोडा. माहिती आवडली असेल तर शेअर नक्कीच करा. आमचे इतर लेख इथे वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *