Worst investments of Warren Buffett in marathi : असं समजू , जगात दोन प्रकारची माणसं आहेत, एक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे आणि दुसरे न करणारे. पण या दोन्ही गटातील लोकांना वॉरन बफे मात्र माहित असतो. आणि बफेसारखी श्रीमंती सर्वांनाच हवी असते.पण त्यासाठी बफेनी घेतलेले कष्ट, त्यांनी मोजलेली किंमत कुणाला धड माहितीही करून घ्यायची नसते. अर्थात यामागे काही प्रमाणात माध्यमांचा सुद्धा हात आहे जे कोणत्याही गोष्टीची फक्त एकच बाजू आपल्या समोर मांडत असतात. कारण तसं नसतं तर वॉरन बफे हे सुद्धा आपल्या सारखेच मर्त्यमानव आहेत. फरक इतकाच शेअर मार्केट आणि गुंतवणूक हा विषय त्यांनी आपल्या रोजच्या जगण्याचा- आयुष्याचा भाग बनवला हे सुद्धा आपल्याला आवर्जून सांगितलं गेलं असतं. असो..
बफे यांचाही सुरवातीचा मोठा काळ शेअर मार्केट शिकण्यात गेला. पैसा कमवायचा हे त्याचं मुख्य उद्दिष्ट कधीही नव्हतं. तर त्यांना हे विलक्षण आणि काहीसं वेगळं असं क्षेत्र कसं चालतं, कसं काम करतं हे शिकण्यात त्यांना अधिक रस होता. आणि जेव्हा तुम्ही एखादा विषय मनापासून अगदी आवडीने शिकता तेव्हा तो विषय तुमची ओळख बनून जातो.
पण हे बफेंबद्दल हे आपल्याला माहित आहे. मग ते असं काय आहे बफेंबद्दल जे आपल्याला माहित नाही किंवा कमी प्रमाणात माहित आहे. तर हाच मुद्दा पकडून आपण आज जाणून घेणार आहोत वॉरन बफेंचे कंपन्या आणि शेअर्समधील ते व्यवहार ज्यामध्ये त्यांना नुकसान झालं किंवा अपेक्षित नफा झाला नाही.
1) अमेझॉन आणि गुगल ( अल्फाबेट ) ( Buffett avoided Amazon and google )
2017 मध्ये आपल्या भागधारकांच्या सभेत बोलताना वॉरन बफे यांनी एक कबुली दिली कि संधी असतानाही अमेझॉन आणि गुगल ( अल्फाबेट ) च्या शेअर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली नाही.
म्हणजे लक्षात घ्या आजच्या या दोन अजस्त्र कंपन्याचे महत्व बफे यांना योग्यवेळी ओळखता आलं नाही.
2) वौम्बेक टेक्स्टाईल कंपनीचा फियास्को (Buffett purchased Waumbec Mills)
वौम्बेक टेक्स्टाईल या इंग्लंडमधील टेक्स्टाईल कंपनीची खरेदी हा एक अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे स्वतः बफे यांनीच 2014 मध्ये मान्य केलं आहे. या कंपनीची खरेदी व्यवहार हा कंपनीच्या मालमत्ता मुल्याआधारित असला तरी पुढे नंतर लवकरच त्यांना हा टेक्स्टाईल मिल व्यवसाय बंद करावा लागला.
3) टेस्कोचा धडा ( Tesco : Buffett’s one of the biggest Investing mistakes)
किराणा सामान दुकानाची शृंखला असणाऱ्या या कंपनीचे 415 मिलियन शेअर्स (साडे एकेचाळीस कोटी) बर्कशायर हाथवेने 2012 मध्ये खरेदी केले.त्यानंतर काही काळाने काही शेअर्स विकले, परंतु तरीही बर्कशायरची या कंपनीत मोठी गुंतवणूक कायम राहिली. झालं काय कि 2014 मध्ये कंपनीने आपल्या नफ्याचे आकडे फुगवून दाखविल्याचे उघड झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स गडगडले. त्यावेळी या कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी उभ्या राहिलेल्या या परिस्थितीमुळे बर्कशायरने आपले काही शेअर्स विकून टाकले आणि 43 मिलियन डॉलर्सचा नफा निश्चित केला.
पण अजूनही काही शेअर्सची गुंतवणूक बफेनी ठेवली होती आणि हीच चूक महागात पडली कारण यामुळे पुढे 444 मिलियन डॉलर्सचा करोत्तर तोटा बर्कशायरला हाथवेला सोसावा लागला.
मी आधीच माझी सगळी हिस्सेदारी विकली असती तर बरं झालं असतं, या गुंतवणुकीबाबत टंगळ-मंगळ करण्याचे धोरण मला महागात पडले. हे या संदर्भातील वॉरन बफे यांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.
4) डेक्सटर शू कंपनी मध्ये हात पोळले (Buffett’s loss in Dexter Shoe Co)
1993 मध्ये वॉरन बफेनी हि कंपनी 433 मिलियन डॉलर्सला खरेदी केली आणि पुढे जाऊन तो एक चुकीचा निर्णय म्हणून सिद्ध झाला. 2007 मधील आपल्या गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात बफेनी हे कबूल केलंय, ज्यात आपल्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना बसलेला हा फटका साडेतीन बिलियन डॉलर्स इतका असल्याचे सांगितले. हे मूल्य त्यावेळी बर्कशायर हाथवेच्या एकूण मालमत्तेच्या 1.6 % इतके होते.
या संदर्भातील वॉरन बफेचे गुंतवणूकदारांना उद्देशून वाक्य होते,
माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट सौदा होता , पण मी भविष्यात आणखी काही चुका करेन आणि तुम्ही त्यावर पैसे लावू शकता.
2014 मध्ये वॉरन बफे नि जाहीर केलं कि,
डेक्सटर शू कंपनी व्यवहाराच्या वेळी रोख रक्कम न वापरता हा व्यवहार बर्कशायर हाथवेचे शेअर्सद्वारे केला. ज्यांचं मूल्य 5.7 मूल्य डॉलर्स इतकं होतं आणि एक आर्थिक अरीष्ट्य म्हणून गिनीज बुकात या कृतीची नोंद करता येईल .
5) जनरल रीइन्श्युरन्सची खरेदी. (Buying of General Reinsurance)
1998 मध्ये जनरल रीइन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी बर्कशायर हाथवेचे दोन लाख बहात्तर हजार शेअर इश्यू करणे हि बफेंची एक मोठी चूक ठरली ज्यामुळे थकबाकी हिस्श्यात जवळपास 22 टक्क्यांची वाढ झाली. यावर बफेंनी स्वतः म्हटलंय कि,
“आमच्या या कृतीमुळे बर्कशायर हाथवेच्या गुंतवणूकदारांना जितकं मिळालं त्यापेक्षा जास्त त्यांना सोडावं लागलं”
6) कॉन्को फिलिप्सचा मोठा घास. ( Buffett buying large amount of ConocoPhillips stock)
आपले सहकारी चार्ली मुंगेर वगैरेंशी सल्लामसलत न करता 2008 मध्ये तेल आणि वायूंच्या किंमती अगदी शिखरावर असताना या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॉन्को फिलिप्स या कंपनीत साठे आठ कोटी शेअर्स, सात बिलियन डॉलर्सला खरेदी केले. पण या आपल्या चुकीची पत्राद्वारे गुंतवणूकदारांना कबुली देतेवेळी मात्र या गुंतवणुकीचे मूल्य साडेचार बिलियन डॉलर्स इतके झाले होते, यावरून हा निर्णय किती घाईचा होता याची कल्पना येते.
7) बर्कशायर हाथवे (Berkshire Hathaway)
धक्का बसला असेल ना ?
आज हि बफेंची यशस्वी गुंतवणूकदार कंपनी म्हणून प्रसिद्धीस असली तरी सुरवात अशी नव्हती. जेव्हा वर्ष 1962 मध्ये हि कंपनी बफेनी खरेदी केली, त्यावेळी ती एक बुडीत निघालेली कापड गिरणी कंपनी होती. आपण या परिस्थितीत योग्य नियोजन करून आपण नफा कमवू शकू असा समज करून विद्यमान व्यवस्थापन हटवून, कंपनीचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेऊन पुढील वीस वर्षे टेक्स्टाईल व्यवसाय चालू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न बफेनी केला. पण या सगळ्यात बफेंचे किती नुकसान झाले माहित आहे ?
तब्बल 200 बिलियन डॉलर्स !
तर बर्कशायर हाथवेची खरेदी बफेंची अगदी घोडचूक म्हटली तरी चालेल. अर्थात त्यानंतर या कंपनीचं एका गुंतवणूकदार कंपनीत रुपांतर केलं हि बाब वेगळीआणि त्याचं कौशल्य सिद्ध करणारी, पण त्यापूर्वी या कंपनीचा व्यवहार सपशेल चुकीचा ठरला होता हे नक्की.
तर मित्रांनो आजच्या लेखाद्वारे वॉरन बफे सारख्या सार्वकालिक उत्तम गुंतवणूकदार व्यक्तीचेही गुंतवणुकी बाबतचे व्यवहार कसे चुकीचे ठरले होते हे सांगायचा प्रयत्न केलाय. (Worst investments of Warren Buffett in marathi ) अर्थात यामधून त्यांचं सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार म्हणून असलेलं महत्व किंचीतही कमी करायचा प्रयत्न नाहीये किंबहुना एखादी व्यक्ती आपापल्या क्षेत्रात कितीही मोठी आणि महान असली तरी सरतेशेवटी तीही आपल्या सारखी माणूसच. तिच्याकडूनही चुका होऊ शकतात, फरक इतकाच त्या व्यक्ती आपल्या चुकांना, आपल्या अनुभवांना धडा मानतात आणि त्याचा उपयोग पुढील आयुष्यात करतात. जे आपण सर्वसामान्य मात्र विसरतो.
लक्षात घ्या सचिन तेंडूलकर , विराट कोहली कितीही महान फलंदाज असले तरी एखाद्या चेंडूवर ते सुद्धा शून्यावर बाद झालेले आहेत. असे कितीतरी फुटबॉल सामने असतील ज्यात लिओनेल मेस्सी किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डो अगदी निष्प्रभ ठरले असतील.पण म्हणून त्यांचं महानपण कमी होतं का ? अगदी तसंच वॉरन बफे सारख्या व्यक्तींचे उत्तम सौदे असो किंवा मग त्यांच्याकडून घडलेल्या चुका, आपल्या सारख्या सामान्यांसाठी त्याचं महत्व आर्थिक क्षेत्रातील एखाद्या अभ्यासक्रमा इतकंच मोठं आहे हे मात्र नक्की.
माहिती आवडली असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि इतरांनाही शेअर करा. आमचे इतर लेख इथे क्लिक करून वाचू शकता .