गुंतवणुकीसाठी स्टॉक्सची निवड (how to chose stocks for investment in india in marathi) करताना कोणते निकष कसे वापरावेत हे आपण जाणून घेत आहोत. यातील काही मुद्दे आपण मागील भागात पहिले. ज्यांनी या दोन भागांच्या लेखमालेचा पहिला भाग वाचला नसेल ते तो इथे क्लिक करून वाचू शकतील. त्यापुढील महत्वाचे मुद्दे आपण आज पाहणार आहोत.
लाभांश : Dividend
अनेक कंपन्या लाभांश देतात, काही कमी देतात तर काही जास्त. सामान्यतः ज्या कंपन्यांचे लाभांशाचे प्रमाण चांगलं आहे त्यांच्या शेअर्सच्या किंमतीत होणारी वाढ (Growth) लाभांश न देणाऱ्या किंवा अगदीच कमी प्रमाणात देणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असते. यामध्ये सरकारी कंपन्यांचे प्रमाण जास्त आहे.
लाभांश हा नफ्यातील हिस्श्यातून दिला जातो. खाजगी कंपन्या उद्योग विस्ताराचं लक्ष्य बाळगून असतात आणि त्यामुळे नफ्यातील मोठा हिस्सा त्या उद्योगातील पुनर्गुंतवणूक म्हणून वापरतात. परिणामी त्यांची उद्योगवाढ निरंतर होत राहते. म्हणूनच त्यांच्या व्यवसायात व नफ्यात होणाऱ्या वृद्धीमुळे या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ होत असते.
जर लाभांश देणाऱ्या कंपन्या तुमची गुंतवणुकीची पसंती असेल तर अशा कंपन्यांचा लाभांश इतिहास तपासा. त्या कंपन्या अनेक वर्ष निरंतर लाभांश देतात का ? तसेच एकूण वर्षभरातील लाभांशाचं प्रमाण ( Dividend Yield ) लक्षात घ्या. लाभांश देणाऱ्या कंपन्यांबाबत प्रवर्तकांचा कंपनीतील हिस्सा (Promotors Holding in company) सुद्धा लक्षात घ्या. कारण प्रवर्तकांचा हिस्सा मोठा असणाऱ्या कंपन्यांमध्ये लाभांशाचे प्रमाण चांगले असते.
काही वेळेला असंही होतं कि काही कंपन्या मोठ्या प्रमाणात लाभांश जाहीर करतात पण अशा कंपन्यांचा लाभांशाचा यापूर्वीचा इतिहास तसा नसतो, पण आता मोठ्या प्रमाणात लाभांश जाहीर करण्यामागे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.
लक्षात ठेवण्याचे मुद्दे. ( Fundamental analysis for long-term investment in marathi )
◈ उत्पन्न व नफ्यातील निरंतर वाढ.
◈ समक्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत कामगिरी.
◈ उद्योगक्षेत्र लक्षात घेऊन ‘कर्ज-ते-इक्विटी’ (Debt to equity) गुणोत्तर
◈ किंमत – उत्पन्न गुणोत्तराच्या साह्याने कंपनी मुल्यांकन समजण्यास मदत.
◈ कंपनीचा लाभांश इतिहास आणि त्याची हाताळणी.
◈ कंपनीच्या नेतृत्वाची महत्वकांक्षा तसेच आतापर्यंत साधलेली औद्योगिक व व्यावसायिक कामिगिरी.
◈ कंपनीची स्थिरता, उद्योगक्षेत्रातील ताकद आणि बाजारातील पत.
कंपनीची उत्पादने किंवा सेवा नक्की कोणत्या आहेत आणि बदलत्या काळासोबत कंपनीने त्यामध्ये आद्ययावतता आणली आहे का ? आजपासून पुढील दहा ते पंधरा वर्षात कंपनीच्या उत्पादन आणि सेवांना किती मागणी असेल ? या सेवा आणि उत्पादने कालातीत आहेत का ? हे मुद्दे सुद्धा महत्वाचे ठरतात.
गुंतवणुकीसाठी विचाराधीन असलेल्या कंपन्या खालील निकषांवर कशा तपासाव्यात.
➤ कर्जाचे समभागाशी असलेले गुणोत्तर – Debt to equity : एकपेक्षा कमी अपेक्षित ( 0.4 पेक्षा कमी उत्तम )
➤ प्रती शेअर कमाई – Earnings Per Share (EPS) : मागील 5 वर्षांपासून वाढ असणे अपेक्षित.
➤ लाभांश – Dividend : मागील पाच वर्षे वाढ असणे उत्तम
➤ शेअरच्या किंमतीचे कंपनीच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर – Price to Earnings Ratio (PE) : समान उद्योगक्षेत्राती प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत कमी असणे अपेक्षित.
➤ शेअरच्या किंमतीचे कंपनीच्या निव्वळ मालमत्तेशी असलेले गुणोत्तर – Price to Book Ratio (PBV): समान उद्योगक्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत कमी असणे अपेक्षित.
➤ इक्विटीवरील परतावा – Return on Equity (ROE) : 15% पेक्षा जास्त असणे अपेक्षित (मागील किमान 3 वर्षांची सरासरी पहावी )
➤ किंमत ते विक्री गुणोत्तर – Price to Sales Ratio (P/S) – कमी असण्यास प्राधान्य
डोळे आणि कान उघडे असुद्या !
हे सर्वात महत्वाचे. शेअर मार्केटसारख्या क्षेत्रात एखादी महत्वाची बातमी-घडामोड माहित होण्यापेक्षा ती किती लवकर माहित पडते याला अनन्य साधारण महत्व आहे. सोशल मिडिया, भांडवली बाजार – उद्योग व्यवसाय क्षेत्रातील घडामोडींबद्दल माहिती देणाऱ्या वृत्त वाहिन्या, न्यूज पोर्टल्स यावर लक्ष असुद्या. आपल्या आसपास घडणारे औद्योगिक, व्यावसायिक बदल टिपण्याची क्षमता वाढवा. येणाऱ्या काळात होऊ शकणारे औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक बदल यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा.
भारत विकसनशील देश आहे. अनेक गावे शहरांमध्ये रुपांतरीत होत आहेत. आणि म्हणूनच पायाभूत सुविधांची उभारणी मोठ्या प्रमाणात होऊ घातली आहे ज्याचं प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. आणि यामध्ये सिमेंट, पोलाद सारख्या उत्पादनांचा वापर मोठा असतो. त्यामुळे साहजिकच या क्षेत्राला फार वाव असणार आहे. याच प्रमाणे इलेक्ट्रिक वाहने, आयटी, दूरसंचार हि क्षेत्रे सुद्धा मोठा पल्ला गाठणार आहे. अशा वेळी या क्षेत्रातील उत्पादन- निर्मितीशी थेट संबंधित असणाऱ्या कंपन्या तसेच त्यांना पूरक ठरणाऱ्या इतर उत्पादनांशी संबंधित कंपन्या तुम्हाला ओळखता यायला हव्यात.
पण मग या विविध निकषांवर कंपन्या निवडाव्यात कशा ? (Stock selection criteria in marathi)
निकष मग ते ‘तांत्रिक’ असो किंवा ‘मुलभूत’. म्हणजे ‘बेअरीश ट्रेंड’ मधून ‘बुलीश ट्रेंड’ मध्ये येणाऱ्या कंपन्या शोधणे असो किंवा अनेक कंपन्याच्या नफ्याचं मार्जीन, ईपीएस, कर्ज प्रमाण यांची तुलना करून त्यातील उत्तम कंपनी निवडणे असो. यासाठी उपयोगी पडतात “स्क्रीनर्स ” (Screeners ) अर्थातच स्कॅन्स ( Stock scans) ज्याचा वापर करून गुंतवणुकीसाठी योग्य कंपन्या शोधता येतील.
थोडीशी जोखीम !
‘प्रवाहा विरुद्ध पोहणे’ असा वाक्प्रचार अनेकदा ऐकला, वाचला असेल तसंच काहीसं इथेही करता येतं. शेअर मार्केटमध्ये अशा घटनांचा अंदाज लावून बाजारातील एकूण हवेच्या विरुद्ध व्यवहार करणाऱ्यांसाठी इथे इंग्रजीत एक चपलख शब्द वापरला जातो म्हणजे ‘कॉन्ट्रारीअन’. यामध्ये अनेकदा एखादा पेनी स्टॉक किंवा कंपनी जीच्याबद्दल प्रस्थापितांच्या अंदाजांच्या विरोधात आपण डाव खेळू शकतो. अर्थात हि जोखीम आहेच म्हणून आपल्या जोखीम पचविण्याच्या क्षमतेनुसार हे करावं.
आम्ही या दोन भागांच्या लेखमालेत सांगितलेले सर्व निकष कोणत्याही एका कंपनीकडून पूर्ण होणे शक्य नाही आणि तशी अपेक्षाही नसावी. त्यातही अनेकदा एखाद्या उद्योग क्षेत्रास काही निकष लागू पडतात तर दुसऱ्यास नाही, हेही भान असणे गरजेचे. त्याहीपलीकडे गुंतवणुकीसाठी कोणताही निकष एकमेव नसतो. त्यामुळे सरासरी कमाल निकषांना पात्र ठरणाऱ्या कंपन्यांचा विचार केला जात असतो.
वरील लेखात व्यक्त केलेली मते आमची वैयक्तिक असून गुंतवणुकीबाबत आपला वैयक्तिक निर्णय स्वतंत्ररित्या घ्यावा.
माहिती आवडली असेल तर इतरांशी शेअर नक्की करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.