Nifty bees information in marathiNifty bees information in marathi

(Nifty bees information in marathi ) आमच्या ट्विटर खात्यावर आम्ही अनेकदा निफ्टीबीज या ईटीएफबद्दल बोललोय, त्यावेळी अनेकांनी या ईटीएफसंदर्भात सविस्तर माहिती विचारली आहे. आमच्या अलीकडच्या ट्विटर पोस्ट संदर्भातही हाच अनुभव आलाय.

म्हणूनच आज आपण निफ्टी बीजबद्दल माहिती घेऊया.

काय आहे निफ्टी बीज. (What is Nifty Bees)

अनेकदा काय होतं.. आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी आवडतात आणि त्या हव्यासुद्धा असतात. पण ते शक्य नसतं. यामागे कधी आर्थिक कारणे असतात तर कधी इतर काही. उदाहरणादाखल काहीही असो.म्हणजे कपड्यांची निवड असेल तर त्यात कोणते घ्यायचे आणि कोणते नाकारायचे हे ठरवणं कठीण जातं. विम्याची निवड करतानाही दोन-तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या विमा पॉलिसीतील तरतुदी आवडतात. पण निवड फक्त एकाची करायची असते.

आता आपण शेअर मार्केटकडे वळूया. समजा तुम्हाला निफ्टीफिफ्टी या निर्देशांकातील अर्थात देशातील शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या आघाडीच्या 50 कंपन्यांत गुंतवणूक करायची आहे. अर्थात तेही तुमचं बजेट सांभाळून. आता इथे तुम्ही या निर्देशांकातील कंपन्यांचा प्रत्येकी एक शेअर जरी घ्यायचा ठरवलं तरी तुम्हाला किमान लाखभर रुपये गुंतवावे लागतील. आणि हि गुंतवणूक त्या- त्या वेळच्या बाजाराच्या स्थितीनुसार असेल, म्हणजे यानंतर बाजार पुन्हा खाली आलं तर त्यावेळच्या घसरलेल्या किंमतीचा फायदा उठवून पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा मोठी रक्कम तयार ठेवावी लागेल. म्हणजे इथे सोयीनुसार वरचेवर गुंतवणूक करणे सोप्पं नाही.

नेमकं इथेच निफ्टीबीज हा ईटीएफ आपल्याला हि सोय उपलब्ध करून देतो. (what is Nifty bees)

ईटीएफ हा काय प्रकार आहे ? (ETF information in marathi )

ईटीएफ म्हणजे ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ अर्थात असे फंड ज्यांचे व्यवहार थेट एक्स्चेंजवर होतात. म्हणजे अगदी सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी विक्री करतो तसेच हे. यांना म्युच्युअल फंड आणि इक्विटी यांचा संयोग समजायला हरकत नाही.

निफ्टीबीज हा भारतातील पहिला ईटीएफ निप्पॉन इंडिया एएमसीने ( म्युचुअल फंड कंपनी ) डिसेंबर 2001 मध्ये सुरु केला. निफ्टी ५० या निर्देशांकाप्रमाणेच परतावा देणे हे या फंडाचं उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य आहे.

म्हणजे आता बघा, निफ्टी ५० इंडेक्सने मागील दहा वर्षांत जवळपास १२ टक्क्यांनी परतावा दिला आहे. म्हणजे जर तुम्हाला निफ्टी ५० इंडेक्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या समोर उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय निफ्टीबीज हा आहे. तुम्ही ETF चे एक युनिट खरेदी करा किंवा अनेक, त्यातून तुम्हाला निफ्टीमधील विविध क्षेत्रातील 50 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक केल्याचा लाभ मिळतो.

कशी आणि कुठून करावी निफ्टीबीज ईटीएफमध्ये गुंतवणूक ? (How to invest in nifty bees in marathi )

nifty bees information in marathi

अगदी सोप्पं. अपस्टॉक्स, झीरोधा, एन्जेल ब्रोकिंग , एडेलवाईज किंवा एलिस ब्लू अशा कोणत्याही ब्रोकरकडे तुमचं खातं असेल तर त्यावर तुम्ही जसं एखाद्या कंपनीचा शेअर शोधता अगदी तसंच “Nifty Bees” शोधायचा आहे आणि शेअरचा खरेदी-विक्री व्यवहार करता तसाच इथे करायचा आहे. इतकं सोप्पं आहे हे. यात कोणतीही वेगळी प्रक्रिया नाही.

ईटीएफचे फायदे ( advantages of Nifty bees )

वाजवी : हा ईटीएफ निर्देशांकाला अनुसरत असल्याने, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकीय खर्च अत्यंत कमी असतो.

किमान व्यवस्थापन : या ईटीएफचे उद्दिष्ट निफ्टी या निर्देशांकाचे अनुकरण करणे हे असल्याने, फंड व्यवस्थापकाला केवळ बाजार निर्देशांकाशी सुसंगती राखण्यासाठी वेळोवेळी बदल करणे आवश्यक असतं. म्हणजे इतर म्युच्युअल फंडासारखं जिथे फंड मॅनेजरकडे विश्लेषणात्मक काम आणि बाजारापेक्षा उत्तम कामगिरीच्या अपेक्षेपोटी जास्त व्यवहाराची जबाबदारी नसते. ज्यामुळे जोखीम मर्यादित असते.

कमी व्यवस्थापकीय जोखीम:  ETFs खरंतर विशिष्ट निर्देशांकाशी जोडलेले असल्याने आणि त्यामुळेच स्वयंव्यवस्थापित असतात म्हणून त्यात संस्थात्मक त्रुटींचा कमी धोका असतो. येथे, गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडाप्रमाणे, सतत सर्वोत्तम ट्रेडिंग-गुंतवणूक कृतींसाठी फंड व्यवस्थापकाच्या निर्णयावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्याऐवजी, इथे गुंतवणूकदार केवळ स्व-स्थिर बाजारावर अवलंबून असतो.

विविधता : ETFs हे शेअर मार्केटमधील तुलनेत कमी जोखीमीची, आणि तरीही पोर्टफोलिओमध्ये विविधता राखून असणारी गुंतवणूक आहे.

तरलता: ईटीएफचा व्यवहार इतर कोणत्याही शेअर प्रमाणे स्टॉक एक्स्चेंजवर केला जाऊ शकतोच, पण यात आणखी एक महत्त्वाचा फरक असा आहे की ते दिवसाअखेर व्यापार-व्यवहार विचारात घेणाऱ्या सर्वसामान्य म्युच्युअल फंडांसारखे ते नसतात.कारण ते इंट्राडे ट्रेड केले जाऊ शकतात. हे अस्थिर बाजारात हे उपयुक्त ठरतं.

हे सुद्धा वाचा : स्मॉलकेस म्हणजे नेमकं काय ? गुंतवणूक गोष्ट.

पण इथे तुम्ही अगदी मल्टीबॅगर म्हणजे अगदी थोडक्या कालावधीत श्रीमंतीची अपेक्षा ठेवू नये, किंबहुना शेअर मार्केटमध्ये हि अपेक्षा ठेवून येणेच मूर्खपणाचं आहे. कारण जास्त परताव्याच्या अपेक्षेत चुकीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक होऊन मूळ भांडवलच शून्य होण्याची शक्यता इथे जास्त असते. अशा वेळी कमी जोखमीसह दीर्घकालावधीसाठी शिस्तबद्ध अशा निरंतर गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्ती निर्मिती शक्य आहे.आणि यासाठी निफ्टीबीजसारखे ईटीएफ चांगले पर्याय ठरू शकतात.

थांबा , एक सांगायचं राहून गेलं..

जगातील पहिला यशस्वी ETF कोणता असेल ?

तर तो आहे, ‘एसपीडीआर एसएन्डपी 500 ट्रस्ट ईटीएफ’ हा स्टँडर्ड अँड पुअर्स 500 (S&P 500) या अमेरिकन भांडवली बाजारातील निर्देशांकाचा मागोवा घेण्यासाठी अमेरिकेत 1993 मध्ये लाँच करण्यात आलेला ईटीएफ. जो आजपर्यंतच्या सर्वाधिक ट्रेड केलेल्या ETF पैकी एक आहे.

महत्वाचं : भांडवली बाजाराशी संबंधित कोणतीही गुंतवणूक हि जोखमीच्या अधीन असते. सदर लेख हा फक्त माहितीदाखल आहे, या लेखाद्वारे आम्ही कोणत्याही गुंतवणुकीची शिफारस करू इच्छित नाही. आपला गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *