बऱ्याच नवीन ट्रेडर्सचा एकच गोंधळ असतो, “ट्रेडिंग पद्धती किती आणि कशा आहेत? त्यात कोणती ट्रेडिंग पद्धत उत्तम?” हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. पण व्यक्ती तशा प्रवृत्ती या न्यायाने ट्रेडिंग पद्धतीसुद्धा आपल्याला अनुरूप अशी निवडावी. कारण प्रत्येकाची नोकरी, वेळ, स्वभाव, भांडवल वेगळे असते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये आल्यावर यांची अवस्था एका मोठ्या जत्रेत आलेल्या नवोदितासारखी असते. आणि यातून पुढे आपला स्वभाव, व्यवसाय आणि उपलब्ध वेळ लक्षात न घेता चुकीच्या ट्रेडिंग पद्धती जवळ केल्यामुळे अनेकजण बाजारात स्वतःचं नुकसान करून घेतात.

म्हणूनच आज आम्ही सर्व मुख्य पद्धती थोडक्यात पण अगदी सहजसोप्या मराठीत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत.

१. तांत्रिक विश्लेषणावर (Technical Analysis) आधारित पद्धती.

  • प्राईस एक्शन ट्रेडिंग (Price Action Trading)
    ही सध्या भारतात सर्वात वापरली जाणारी व लोकप्रिय पद्धत आहे. यात एकही इंडिकेटर लावायचा नाही, फक्त कँडल्स, आधार-प्रतिरोध, ट्रेंडलाइन आणि बाजाराची रचना पाहायची. जुन्या जाणत्यांच्या म्हणण्यानुसार, “बाजार जे दाखवतो ते खरे, बाकी सगळं फक्त सांगणं.” तीन-चार वर्ष सराव केला की ही पद्धत बऱ्यापैकी जमू शकते.
  • निर्देशांक आधारित ट्रेडिंग (Indicator-Based Trading)
    नवीन ट्रेडर्सना ही पद्धत सोपी वाटते कारण सगळे नियम ठरलेले असतात. आरएसआय ३० खाली गेले तर खरेदी, ७० वर गेले तर विक्री, एमएसीडी क्रॉस झाला तर ट्रेड – असा सेट नियम. पण इंडिकेटर्स उशिराने सिग्नल देतात, म्हणून त्यांचा एकत्र वापर (कॉन्फ्लुएन्स) करावा लागतो.
  • कल अनुसरण ट्रेडिंग (Trend Following)
    बाजारात तीनच स्थिती असतात, अपट्रेंड, डाउनट्रेंड आणि साइडवेज. कल ज्या दिशेने जोरदार असेल तर त्याच दिशेने जावे, “कल हाच मित्र अर्थात ट्रेंड इज़ फ्रेंड” ही म्हण याच पद्धतीची. २०० दिवसांची सरकती सरासरी (EMA) वर असेल तर फक्त लाँग ट्रेड, खाली असेल तर शॉर्ट असं सर्वसामान्य धोरण.
  • भेदन ट्रेडिंग (Breakout Trading)
    स्टॉक किंवा इंडेक्स बराच काळ एका चौकोनी पट्टीत अडकलेला असतो, त्यातून बाहेर पडल्यावर मोठी चाल येते. तिमाही निकाल, बजेट, बातम्या अशा वेळी ही पद्धत उत्तम चालते. फक्त खोटे भेदन (फेक ब्रेकआऊट) टाळण्यासाठी व्हॉल्यूम आणि कँडल कितीवर आणि कशी बंद होते हे पाहणे महत्त्वाचे.
  • स्कॅल्पिंग (Scalping)
    दिवसाला ३०-१०० ट्रेड, प्रत्येकी ५-२० रुपये नफा. पूर्णवेळ स्क्रीनसमोर बसावे लागते, स्प्रेड आणि कमिशन खाऊन टाकते म्हणून आजकाल फार कमी लोक करतात. पण लिक्विड स्टॉक्स आणि लो ब्रोकरेज असतील तर चांगले पैसे कमावता येतात.
  • स्विंग ट्रेडिंग (Swing Trading)
    ३ ते १० दिवसांचे ट्रेड. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम. रात्री शांतपणे चार्ट पाहा, ट्रेड घ्या, स्टॉप लॉस-टार्गेट लावा आणि झोपायला जा. तांत्रिक विश्लेषणासोबत थोड्या बातम्याही पाहाव्या लागतात.

२. संगणक आणि गणितावर चालणाऱ्या पद्धती,

  • अल्गोरिदम ट्रेडिंग (Algo Trading)
    तुमचे नियम कोडमध्ये लिहा, संगणक आपोआप ट्रेड करेल. भावना पूर्णपणे बाजूला, २४ तास ट्रेडिंग शक्य. आजकाल स्ट्रीमिंग, झेरोधा स्ट्रॅटेजी बिल्डर यामुळे सामान्य ट्रेडरही अल्गो करू शकतो.
  • संख्यात्मक ट्रेडिंग (Quant Trading)
    गणित आणि सांख्यिकीचे मॉडेल्स वापरून ट्रेडिंग. जोडी ट्रेडिंग (दोन स्टॉक्सचा सहसंबंध), सरासरीकडे परतणे अशा गुंतागुंतीच्या गोष्टी. भारतात अजून फार कमी लोक करतात, पण परदेशात प्रमाण अधिक.
  • उच्च-वारंवारता ट्रेडिंग (HFT)
    मिलिसेकंदात हजारो ट्रेड. बँका, मोठ्या संस्था आणि हेज फंड्स करतात. सर्वसामान्य ट्रेडर्ससाठी नाही.

3. कंपनीच्या मूलभूत गोष्टींवर आधारित पद्धती

  • मूलभूत गुंतवणूक (Fundamental Investing)
    कंपनीचा व्यवसाय समजून घ्या, नफा वाढतोय का, कर्ज कमी आहे का, पी/ई कमी आहे का असे पाहा. दीर्घकालीन गुंतवणूक यातून शक्य. ५-१० वर्ष धरून ठेवले तर चक्रवाढीची जादू दिसते.
  • घटना – घडामोडी आधारित ट्रेडिंग (Event Trading)
    तिमाही निकाल, बजेट, आरबीआयची बैठक, आयपीओ. जिथे मोठी हालचाल अपेक्षित असते तिथे आधीपासून पोझिशन घेऊन बसायचे. जोखीम जास्त, पण नफाही जास्त.
  • मूल्य आधारित गुंतवणूक (Value Investing)
    बाजारात भीती पसरली की चांगल्या कंपनीचे शेअर्स स्वस्त मिळतात. तेव्हा घ्यायचे आणि ३-५ वर्ष धरायचे. वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला यांची हीच शैली.
४. किती वेळ ट्रेड ठेवणार यावर आधारित
  • अंतर्दिवशीय ट्रेडिंग (Intraday)
    ज्या दिवशी ट्रेड घेतला त्याच दिवशी ट्रेड संपवला. रात्रीच्या बातम्या, जागतिक घडामोडी यांची चिंता नाही. पण दिवसभर तणाव आणि स्क्रीनवर फार वेळ द्यावा लागतो, नोकरी-व्यवसाय सांभाळून शक्य नाही.
  • स्थिती ट्रेडिंग (Positional Trading)
    आठवडे किंवा महिने. संयमाची खरी परीक्षा. पण कमी ट्रेड, कमी तणाव आणि चक्रवाढ नफा.नोकरी-व्यवसाय सांभाळून शक्य.
५. बाजाराच्या मानसिकतेला पकडणाऱ्या पद्धती
  • भावनात्मक विश्लेषण (Sentiment Analysis)
    एक्स सारख्या सोशल माध्यमावर, बिझनेस पोर्टलवर येणाऱ्या घडामोडी, बातम्या, पीसीआर, ओपन इंटरेस्ट, ऑप्शनमधील मॅक्स पेन हे सगळे पाहून समजते की बाजार खूप लोभी आहे की भीतीदायक. या प्रवाहानुसार आपला ट्रेड ठरवणे.
  • आकार आणि ऑर्डर प्रवाह (Volume & Order Flow)
    मोठे खेळाडू कुठे मोठ्या ऑर्डर्स टाकत आहेत हे पाहून त्यांच्याबरोबर चालायचे. फ्युचर्स-ऑप्शन्समध्ये प्रभावी, सदासर्वकाळ चौकस आणि चाणाक्षपणे बाजारावर लक्ष असावे लागते.
६. ऑप्शन्स पद्धती
  • ऑप्शन विक्री (Options Selling)
    दर गुरुवारी प्रीमियम गोळा करायचा. शांत बाजारात आयर्न कॉंडोर, स्ट्रँगल उत्तम चालतात. छोटा नफा पण सातत्याने. जोखीम जास्त असते म्हणून भांडवल जास्त हवे.
  • ऑप्शन खरेदी (Options Buying)
    मोठी चाल अपेक्षित असेल तरच. निकाल, बजेटच्या आठवड्यात चांगले पैसे. पण ८०% वेळा किंवा बहुतांशवेळा प्रीमियम बुडतो म्हणून स्टॉप लॉस पक्का.
  • गॅमा स्कॅल्पिंग (Gamma Scalping)
    डेल्टा तटस्थ राहून छोट्या-छोट्या हालचालीतून नफा. खूप प्रगत पद्धत, फक्त प्रो ट्रेडर्स करतात. नवोदितांनी दूर राहावे.

थोडं महत्त्वाचे : खरं तर ‘ट्रेडिंग करावी की नाही’ मुळात हा प्रश्नच गहन आहे, आणि हे ज्याचे त्याने ठरवावे. पण एखाद्याने ठरवलंच तर सुरुवात करताना फक्त एक पद्धत निवडणे उत्तम, ती पूर्ण आत्मसात करावी, डेमोवर ६-८ महिने सराव असावा, मग छोट्या भांडवलाने सुरू करा. आपला स्वभाव शांत असेल तर स्विंग किंवा पोझिशनल उत्तम, गणित-कोडिंग आवडत असेल तर अल्गोसारखा पर्याय आहे. अर्थात निर्णय तुमचा आहे.

लक्षात घ्या हा लेख केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशाने आहे. बाजारात गुंतवणूक ही जोखमीची असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या.

Types of trading in stock market in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *