stock market facts in marathistock market facts in marathi

परिस्थिती आता पूर्वीसारखी नक्कीच राहिलेली नाहीयेय. शेअर मार्केट नामक क्षेत्रात आता अनेक मराठी नावे दिसतात. ‘हे क्षेत्र म्हणजे जुगार’ असा समजही आता बराच मागे पडलाय.हि बाब नक्कीच सुखावणारी.पण तरीही ‘ काहीतरी कुठेतरी चुकतंय’ असं वाटंत राहतंय. ( stock market facts in marathi)

याचं उत्तर या क्षेत्राबद्दलच्या ‘अपेक्षा आणि वास्तव’ या मध्ये दडलेलं असावं.

म्हणजे एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलास मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचं असेल आणि त्यानुसार त्याने पूर्ण तयारी केली. म्हणजे नक्की काय केलं ? तर, एखाद्या डॉक्टरकडे ‘कंपाऊंडर’ ( राजकीय अर्थ काढू नका रे ) म्हणून काम केलं. त्यानंतर स्वतःचा दवाखाना टाकला; डॉक्टर म्हणून स्वताच्या नावाचा छान पैकी बोर्ड बाहेर लावून.

आता या अशा डॉक्टरकडे पेशंट म्हणून जाणाऱ्यांचं आणि नंतर या डॉक्टरचं स्वतःचं काय होईल याचा अंदाज लावणं तेवढं कठीण नाही.

हे असं उदाहरण देण्याचं कारण म्हणजे या क्षेत्रात रस घेणारा, ट्रेडिंग करणारा मराठी टक्का नक्कीच वाढलाय. पण यातील किती जण मी एक यशस्वी ट्रेडर – गुंतवणूकदार आहे, असं छातीठोकपणे सांगू शकतील ? कोरोना काळात विक्रमी संख्येने डीमॅट खाती उघडली गेली. या क्षेत्रात यायचं तर डीमॅट खाते उघडणे आलंच, त्यात वावगं असं काहीच नाही. कारण अंतर राखून दूरस्थ पद्धतीने शिकण्यासारखं हे क्षेत्र नाहीच. पण मग या उघडल्या गेलेल्या किती खातेधारकांपैकी कितीजणांनी नफा कमावला ? उत्तर नकारात्मकच असेल.

असं का होतंय ? याचं उत्तर आहे , ‘शेअर मार्केटमधून उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सहज निर्माण होतो’ या निर्माण झालेल्या किंबहुना जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या गैरसमजामध्ये.

‘शेअर खरेदी करायचा आणि किंमत वर गेली कि विकायचा’.तसंच ‘आयपीओसाठी अर्ज करायचा’, इश्यू मिळाल्यास लिस्टिंगच्या दिवशी नफा ‘बुक’ करायचा. हे असं ठरवण्यास, लिहिण्यास, जितकं सोप्पं प्रत्यक्षात येण्यास मात्र अनेक शक्यतांचा मेळ बसावा लागतो हे अनेक नवख्यांच्या गावीही नसतं.

कुणीतरी सांगतो कि अमक्याच्या स्टॉक टिप्स भारी असतात, टार्गेट हिट होतोच. एखादी 100 % सक्सेस रेट असलेली जबरदस्त स्ट्रॅटेजी. या अशा गोष्टी या क्षेत्राबद्दल वेगळं, खरंतर चुकीचं चित्र उभे करतात. कारण पुढे हेच नवखे जेव्हा आपलं आहे ते गमावून वर कर्जबाजारी होतात तेव्हा त्यांचा राग असतो शेअर मार्केट नावाच्या या क्षेत्रावर.

म्हणूनच या क्षत्रात नव्याने येणाऱ्यांनी लक्षात घ्यावे असे काही मुद्दे आम्ही देत आहोत.

शॉर्टकट नाहीच !

आयटी , मेडिकल , कायदा , इंजिनिअरिंग या सारख्या कोणत्याही क्षत्रात तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्यासाठी काही वर्ष कष्ट हे करावेच लागतात. मग शेअर मार्केट मधून अगदी काही दिवसांत, महिन्यात श्रीमंतीची अपेक्षा का ? इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे इथेही शॉर्टकट नाहीच.

मोठे मासे – छोटे मासे

इतर कोणत्याही क्षत्रात जसे प्रस्थापित आणि प्रभावशाली व्यक्ती असतात तसेच इथेही असतात. आपल्या या स्थितीचा यथोचित वापर या व्यक्ती आपल्या फायद्यासाठी करतात. आणि यामध्ये मग योग्य ज्ञान आणि कौशल्याशिवाय ट्रेडिंग करणाऱ्या नवख्यांना फटका पडतो. हाच मुद्दा ‘आला आयपीओ कि कर एप्लाय’ या नवगुंतवणूकदारांच्या पैसे दुप्पट करण्याच्या मानसिकतेला सुद्धा लागू होतो. यासाठी इथल्या संधी आणि सापळे ओळखण्याचं कौशल्य तुम्हाला आत्मसात करावंच लागेल अन्यथा मोठ्या माशांचं भक्ष्य असणारे छोटे मासे एवढंच अस्तित्व आपलं राहतं.

टिप्स (Stock Tips )

केवळ टिप्सनुसार ट्रेडिंग करून शेअर मार्केटमधून आयुष्यभराची सोय करण्याइतपत श्रीमंत झालेली एखादी तरी व्यक्ती सापडतेय का पहा. हो टिप्स विकणारे मात्र श्रीमंत होतात स्वतः ट्रेडिंग न करताही.

पैसा मिळवणं इतकं सोप्पं असतं तर जगाच्या गरिबीचा प्रश्न केव्हाच सुटला असता.

स्ट्रॅटेजी (Trading Strategy)

ट्रेडिंगमध्ये एखादी वेळोवेळी सिद्ध झालेली स्ट्रॅटेजी नक्कीच फायदेशीर ठरते. पण लक्षात घ्या कोणतीही स्ट्रॅटेजी सर्वकाळ यशस्वी ठरेल याची खात्री नसते. बाजारातील घडामोडी, त्यासाठीची कारणे, गुंतवणूकदारांची भावना – मानसिकता बदलत असते. आणि म्हणूनच एखादी स्ट्रॅटेजी सदासर्वकाळ फायदेशीर ठरेलच असं नाही.

यासाठी आपण मॉर्गन हाऊजेल लिखित ‘पैशाचे मानसशास्त्र’ अर्थात ‘सायकोलॉजी ऑफ मनी’ (Psychology of Money in marathi ) या पुस्तकातील एक उदाहरण पाहूया,

सार्वकालिक बेस्टसेलर्स यादीत वरच्या स्थानावर असलेल्या गुंतवणूकदारांचा धर्मग्रंथ मानला जाणाऱ्या बेन्जामिन ग्राहम लिखित “दि इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’ (Intelligent Investor in marathi) या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1949 साली प्रकाशित झाली. ज्यामध्ये देण्यात आलेली गुंतवणूक सूत्रे 1954 मधील आवृतीत नव्या सूत्रांनी बदलली गेली त्यानंतर पुन्हा १९६५, १९७२ अशी वेळोवेळी गुंतवणूक सूत्रे बदलण्यात आली. ग्राहमचा मृत्यू 1976 साली झाला. तत्पूर्वी काही महिने आधी त्याला त्याच्या स्टॉकच्या विश्लेषणाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने सांगितलं..

पुस्तक ज्यावेळी लिहिलं त्यावेळची तत्कालीन आर्थिक, सामाजिक परिस्थिती वेगळी होती त्यामुळे त्यामुळे तत्कालीन गुंतवणूक सूत्रे – पद्धती आताच्या काळात लागू होण्याची शक्यता कमीच.

म्हणजेच इथे कोणतीही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी / गुंतवणूक पद्धती अंतिम आणि शाश्वत नाही. तुम्हाला त्यात वेळोवेळी बदल किंवा नव्याने शोध घ्यावाच लागतो. थोडक्यात सांगायचं तर अपडेट राहावं लागतं आणि अपग्रेड व्हावंच लागतं.

ट्रेडिंग आणि करिअर (Trading is Trending ?)

अनेकजण ‘फुलटाईम ट्रेडर’ (Fulltime Trader) या प्रोफेशनला दिसणारं ग्लॅमर, सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या किंवा फिरवल्या जाणाऱ्या अनेकांच्या श्रीमंतीच्या खऱ्य-खोट्या गोष्टी पाहून वाचून या क्षेत्रात येतात. काळानुरूप सुरवातीचा उत्साह मावळतो. पैसा कमविण्याच्या नादात स्वतः जवळचा पैसा जातो. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेतलं जातं. पण आपण घेतलेलेच ट्रेड्स अयशस्वी का होतात हे कधी लक्षात येत नाही. कारण ते लक्षात येण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य मनापासून कधी शिकण्याचा प्रयत्नच आपण केलेला नसतो.

तर अशा लोकांना थेट आणि स्पष्ट सांगणं इतकंच कि दीड -दोन वर्ष या क्षेत्रात राहूनही जर तुम्ही हे क्षेत्र समजून घेण्यात कमी पडत असाल. फक्त कुणाला तरी दाखविण्यासाठी, मिरविण्यासाठी हवा असलेला ‘प्रॉफीट स्क्रीनशॉट’ तुमचं ध्येय असेल तर हे क्षेत्र तुमचं नाही. ट्रेडिंग तुमच्यासाठी नाहीच.असा विचार करून भविष्यात होऊ शकणारा तोटा तुम्ही टाळू शकता या क्षेत्राला इथेच राम-राम करून. कारण कुणीतरी म्हटलं आहेच..

ट्रेडिंग हा सोप्या रीतीने पैसे कमविण्याचा सर्वात कठीण मार्ग आहे.

Trading is the hardest way to make easy money.

या लेखाद्वारे आमचा या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना परावृत्त किंवा नाउमेद करण्याचा हेतू मुळीच नाही. इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे इथेही शिकण्याची आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तरच इथे करिअर होऊ शकतं.हि वस्तुस्थिती निदर्शनास आणण्याचा उद्देश या लेखाचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *