काही दिवसांपूर्वी अदानी समूहाशी संबंधित असलेला हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली होती. त्यानंतर दोन-चार दिवसांत एक बातमी आली. ती म्हणजे अदानी समूहाने आपलं 1.1 अब्ज डॉलर्सचे एक कर्ज एकरकमी फेडून टाकले.
आपल्याकडील अनेक ‘बिझनेस’ वृत्त वाहिन्यांनी या बातमीला अभिमानाची किनार वगैरे जोडत हे वृत्त दाखवले. पण या कर्ज परतफेडी मागे असणारी मार्जीन कॉलची पार्श्वभूमी मात्र फारच कमीजणांनी लक्षात घेतली.यामागचे कारण म्हणजे ‘न्यूजमध्ये फक्त मनोरंजन शोधणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी मनोरंजनाच्या शोधात असलेल्या आपल्या प्रेक्षकांची ओळखलेली नाडी’. त्यामुळे सर्वसामान्यांना या “मार्जिन कॉल” नावाच्या प्रकरणाशी काही देणेघेणे असण्याची शक्यता तशी कमीच. (Margin call explained in marathi)
पण तरीही हा प्रकार नक्की काय हे आपल्या ‘वित्तंबातमी’ मध्ये रस असणाऱ्या आणि त्यामागील ‘वित्तव्यवहार’ जाणून घेऊ पाहणाऱ्या वाचकांना समजायला हवे म्हणून आज आम्ही याबद्दल सांगणार आहोत.(margin call meaning marathi)
‘मार्जिन कॉल’ हि सामान्यत: भांडवली बाजाराशी संबंधित हि संज्ञा आहे. जेव्हा एखादा खातेधारक आपल्याला ब्रोकर कडून मिळालेली पत म्हणजेच क्रेडीट वापरून आपल्याकडे असलेल्या रकमेपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्सची खरेदी करतो. पण कालांतराने जेव्हा त्या शेअर्सचे मूल्य कमी होते तेव्हा आधीचे मूल्य आणि आताचे मूल्य यामुळे निर्माण झालेला फरक भरून काढण्यासाठी ब्रोकरकडून खातेधारकाला साधला गेलेला संपर्क म्हणजेच ‘मार्जिन कॉल’.( Margin call in marathi)
आपण एका उदाहरणाने पाहूया.
एखादा गुंतवणूकदार मार्जिनवर ₹20,000 किमतीचे स्टॉक्सची खरेदी करतो, आणि समजा या खरेदीसाठी खातेधारकास ब्रोकरकडून ₹10,000 ची क्रेडीट (उधार) दिली जाते आणि ₹10,000 मात्र खातेधारक स्वतःचे ठेवतो. इथे ब्रोकरला किमान 30% मार्जिन राखणे आवश्यक आहे असे समजूया.
पण काही काळाने या स्टॉक्सचे मूल्य आजच्या ₹20,000 वरून घसरून ₹12,000 वर येते. आता तुम्ही ब्रोकरकडून ₹10,000 कर्जाऊ घेतले असल्यामुळे या आजच्या ₹12,000 मूल्याच्या स्टॉक्समध्येही ₹10,000 ब्रोकरचे समजले जातात.म्हणजे इथे खातेधारकाचे भांडवली मूल्य आहे ₹2000, जे स्टॉक्सच्या आजच्या मुल्यानुसार आवश्यक असलेल्या मार्जिन म्हणजे 30% पेक्षा कमी आहे.
अशावेळी ब्रोकरकडून खातेधारकास ‘मार्जिन कॉल’ जनरेट होतो. म्हणजे आता खातेधारकास यामध्ये भर घालून पुन्हा मार्जिन 30% राखावे लागेल. म्हणजेच वरील उदाहरणांत 30 % मार्जिन राखण्यासाठी,
₹2,000 / ₹12,000 X 100 = 16.6% (सध्यस्थिती) जे आवश्यक असलेल्या 30% कमी आहे.
₹12,000 / 100 X 30 = ₹3600 ( आवश्यक असलेले मार्जिन)
म्हणजेच,
₹3600 – ₹2000 = ₹1600 → ‘मार्जिन कॉल’ ज्यास खातेधारक समोर जाईल. म्हणजेच इथे ₹1600 ची अतिरिक्त भर आता खातेधारकास घालावी लागेल. अर्थात इथे काही स्टॉक्स विकण्याचा पर्यायही खातेधारकासमोर उपलब्ध असतो पण तो काहीसा नकारात्मक समजला जातो.
इथे आणखी एक पर्याय उपलब्ध असतो. तो कोणता यासाठी आपण पुन्हा अदानी प्रकरणाकडे येऊया.
वरील उदाहरणांत आपण ब्रोकर आणि खातेधारक यांचे उदाहरण घेऊन ‘मार्जिन कॉल’ संकल्पना समजून घेतली. पण गरजेचं नाही कि समोर ब्रोकरच असावा. अदानी प्रकरणांत अदानी समूहाकडून आपले शेअर्स गहाण ठेवून वित्तसंस्थांकडून कर्ज घेतलं गेलं होतं. यात वावगं काहीच नाही अनेक उद्योग समूह, व्यावसायिक असे करतात. पण अदानी समूहाकडून सदर कर्ज घेताना त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव हे अत्युच्च पातळीवर होते. अन् हि शेअर्सच्या किंमतीत झालेली हि वाढ अगदी अल्पावधीत झाली होती. अर्थात ‘ती कशी आणि का’ हा काही या लेखाचा विषय नाहीये.
तर या उच्च भावात असलेले शेअर्स तारण ठेवून हे कर्ज घेतले गेले असल्याने पुढील परीस्थित बिकट झाली. म्हणजे इथे पुढे आलं हिंडेनबर्ग प्रकरण. आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व अशी घसरण होऊ लागली, जी 50% च्या पलीकडे गेली. आणि अर्थातच याचा परिणाम समूहाच्या कर्जावर झाला नसता तरच नवल होतं. असं म्हणतात कि अदानी समूहाच्या गौतम अदानींना या 1.1 अब्ज डॉलर्सच्या या कर्जासंदर्भात 500 कोटी डॉलर्स मूल्याच्या ‘मार्जिन कॉलला’ सामोरे जावं लागलं.
त्यामुळे मग या समूहाचे गुंतवणूकदार तसेच भांडवली बाजारातील कामगिरीवर होऊ शकणारे परिणाम लक्षात घेऊन नेहमीचे पर्याय न आजमावता समूहाने त्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला. मार्जिन कॉल संदर्भात असलेला हाच तो आणखी एक पर्याय.
बरं समजा खातेधारकाने वरीलपैकी कोणताही पर्याय आजमावला नाही तर ?
तर मग ब्रोकर अथवा धनको मार्जिन फरकानुसार आपल्या अधिकारातील स्टॉक्सची विक्री करू शकतो. आणि हा पर्याय खातेधाराकासाठी ‘रोगापेक्षा उपाय भयंकर” असा सिद्ध होऊ शकतो. म्हणजे जेव्हा अशा मोठ्या प्रमाणात स्टॉक्सची विक्री होऊ लागते तेव्हा त्या स्टॉक्सची किंमत झपाट्याने घसरू लागते. आणि मग भीतीपोटी रिटेल गुंतवणूकदार सुद्धा आपल्याकडील समभाग विकी लागतो. समभागांच्या घसरणाऱ्या किंमतीमुळे नव्याने निर्माण मार्जिन फरकापोटी ब्रोकर किंवा धनकोस वारंवार आपल्या स्टॉक्सची विक्री करावी लागते.
मित्रांनो, हि माहिती आवडली असेल तर ती तुमच्या पर्यंत मर्यादित ठेवू नका. इतरांनाही नक्कीच शेअर करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.