परवा 29 तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे ट्रेंडिंग स्टॉक्स पाहत असताना एका स्टॉक्सने लक्ष वेधून घेतले, ऑल टाइम हाय गाठणाऱ्या स्टॉक्सच्या कॅटेगरीमध्ये दिसणाऱ्या या स्टॉक्सने त्या एकाच दिवशी तब्बल 69 हजार पट वाढ नोंदवली होती. थोडं चक्रावूनच गेलो, पण त्यानंतर थोडं शोध घेतल्यावर एकंदरीत प्रकरण लक्षात आलं. कारण एव्हाना बातम्या, अलर्टस येऊ लागली होती.
‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid Investments) हे त्या कंपनीचे नाव आहे. पण असं नक्की काय झालं होतं की जवळपास ₹3.59 किंमत नोंदला गेलेला या कंपनीचा शेअर अगदी काही क्षणांत कोणत्याही मर्यादेविना ₹2,36,250.00 पर्यंत गेला. ज्यामुळे त्याने भारतीय स्टॉक मार्केटमधील सर्वात महागडा शेअर बिरुद असलेल्या MRF लाही मागे टाकलंय. त्यानंतर काल हा शेअर आणखी वर जाऊन ₹2,48,062 वर पोहोचलाय. पण गंमतीचा भाग म्हणजे, आजही पुस्तकी मूल्यानुसार हा शेअर स्वस्तच आहे. हो बरोबर वाचलंत तुम्ही, ‘स्वस्त!’ या उच्चांकी उसळीमागील कारणही या शेअरच्या नियमापेक्षा जास्त ‘स्वस्त’ असण्यामध्येच दडलेलं आहे.
हे झालं एका विशेष लिलावाच्या आयोजनामुळे,
अनेकदा असं होतं की एखाद्या शेअरची किंमत त्याच्या मुलभूत निकषांवर पाहिल्यास वाजवी नसते, या शेअरबाबतही असंच होतं. आधी या शेअरची किंमत 3.59 रुपये होती, तर पुस्तक मूल्य मात्र प्रति शेअर 4 लाख रुपयांपेक्षा अधिक दिसत होतं. म्हणजे पुस्तकी मूल्यानुसार पाहायला गेलं तर शेअरची किंमत योग्य गुणोत्तरात नव्हती.
असं का ?
‘एल्साइड इन्वेस्टमेंट्स’ (Elcid Investments) ही बाजारात एक सूचीबद्ध कंपनी असली तरी ती एक होल्डिंग कंपनी म्हणून वर्गीकृत आहे, जिची कमाई प्रामुख्याने गुंतवणुकीवरील व्याज आणि लाभांशातून येते. होल्डिंग कंपन्यांचे शेअर्स बहुतेक वेळा सवलतीच्या (डिस्काउंट) दरात व्यवहार करतात आणि अल्साइडच्या बाबतीतही असेच होते. अशा शेअरबाबत असणारी बाजारातील अत्यंत कमी तरलता आणि 5% दैनंदिन किमतीची मर्यादा या शेअर्सच्या किमती कमी राहतात. म्हणजेच भोवतालच्या नियम आणि परिस्थितीवश योग्य ती किंमत प्राप्त न होत नाही.
हे लक्षात घेऊन अशा कंपन्यांना त्यांचे वाजवी मूल्य प्राप्त होण्यासाठी काही पाऊले उचलणे आवश्यक होते, ज्याचा विचार करून सेबीने या कंपन्यांना एक विशेष लीलावाद्वारे आपले वाजवी मूल्य प्राप्त करू घेण्याची संधी दिली. म्हणजेच या लिलावाद्वारे या कंपन्यांच्या खऱ्या किंमतीचा शोध घेतला जातो.
काय आहे हा विशेष लिलाव?
SEBI ने जून 2024 मध्ये एक परिपत्रक काढले आहे ज्या अंतर्गत गुंतवणूक (होल्डिंग) कंपन्यांसाठी वाजवी मूल्य निश्चित करण्याच्या मार्गात सुधारणा करण्यासाठी विशेष लिलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. SEBI ने निरीक्षण केले की अशा अनेक कंपन्या त्यांच्या पुस्तकी मूल्यापेक्षा कमी व्यवहार करत आहेत, म्हणून त्यांच्यात गुंतवणुक वाढवण्यासाठी एका लिलावाची (ऑक्शन) योजना आणली. ज्यामध्ये शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणत्याही मर्यादेचा अडसर नसेल. यानुसारच 29 ऑक्टोबर रोजी हे लिलाव आयोजीत करण्यात आले होते, ज्यानुसार या शेअर्समध्ये उसळी दिसून आली. लक्षात घ्या ही अशा शेअर्ससाठी एकप्रकारे रिलिस्टिंग म्हणजे पुनर्सूचीबद्ध होण्याची प्रक्रिया असते.
पण विश्लेषकांच्या मते अल्साइडच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीनंतरही कंपनीचे शेअर्स अजूनही 0.38 च्या कमी प्राइस-टू-बुक रेशोवर व्यवहार करत आहेत. कारण कंपनीत प्रवर्तकांकडे 75% हिस्सा असून बाजारात अपेक्षित असणारे फ्री फ्लोट हिस्सेदारी कमी आहे, त्यामुळे योग्य मूल्यासाठी अधिक तरलता आवश्यक आहे. कारण तरलता नसल्याने अल्साइड इन्वेस्टमेंट च्या शेअर्समध्ये शेवटचे व्यवहार याआधी 21 जून 2024 रोजी झाले होते ज्यावेळी अवघे 500 शेअर्स मध्ये व्यवहार झाले होते.
फक्त एल्साइड इन्वेस्टमेंटसाठीच साठीच हा लिलाव आयोजित करण्यात आला होता का?
नाही, पिलानी इन्व्हेस्टमेंट्स, कल्याणी इन्व्हेस्टमेंट्स आणि महाराष्ट्र स्कूटर्ससारख्या इतर होल्डिंग कंपन्यादेखील यात सहभागी झाल्या, परंतु त्यांच्या किमतींमध्ये फारसा बदल झाला नाही.
विशेष लिलाव कसे कार्य करते?
हा लिलाव वर्षातून एकदा होतो, ज्यासाठी 14 दिवस अगोदर नोटीस दिली जाते. लिलावात शेअरची योग्य ती किंमत यशस्वीरित्या शोधण्यासाठी किमान पाच भिन्न खरेदीदार आणि विक्रेते असणे आवश्यक असते. पहिल्या दिवशी किंमत निश्चित न झाल्यास, योग्य किंमत मिळेपर्यंत दुसऱ्या दिवशीही हा लिलाव सुरू राहतो.
असो, जाता-जाता आणखी एक महत्वाचं, एक गुंतवणूकदार कंपनी असल्याने या एल्साइड इन्वेस्टमेंटची ‘Asian Paints’ मध्ये 1.28% हिस्सेदारी आहे, ज्याचे मूल्य रु. 3,616 कोटी आहे, जे ‘Elcid’ च्या स्वतःच्या एकूण बाजार भांडवलाच्या 80% आहे.