दृढनिश्चयी राजा विक्रमादित्य पुन्हा त्या झाडाकडे आला. फांदीवरील प्रेत उतरवून त्याने आपल्या खांद्यावर घेतलं आणि स्मशानाचा मार्ग आक्रमू लागला. तेव्हा त्या प्रेतात वास करणारा वेताळ त्याच्याशी बोलू लागला.(short stories in marathi)
राजा एका प्रांताचा महाराजा असूनही तुला अशा मध्यरात्रीच्या समयी या भेसूर जंगलात हे कष्ट घेताना पाहून मला तुझी दया येते. ज्या कशासाठी तू हे करतो आहेस त्या बदल्यात तुला मिळणाऱ्या फळाची तुला खात्री आहे का ? कारण मनुष्य स्वभाव अत्यंत विलक्षण असतो. त्याचा ठाव लागत नाही, आणि याचीच प्रचीती आणून देणारी एक गोष्ट तुला आज मी सांगतो.
आधुनिक मुंबापुरीत दोन मित्र राहत होते. विश्वास आणि विकास. दोघेही एकाच शाळेत शिकले, एकत्र कॉलेजला गेले, शिक्षण पूर्ण केलं. विश्वासने भांडवली बाजारात जम बसवला. तर विकासने स्पर्धा-परीक्षा देऊन छानपैकी सरकारी नोकरी मिळवली. दोघेही आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले.
दोघांचाही ‘कॉमन’ मित्रांचा गोतावळा होताच. शेअर मार्केटमध्ये आता काही वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या विश्वासने आपली सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी राखली होती. आणि दुसऱ्या बाजूला विकास सरकारी नोकरीत असल्याने त्यालाही तशी कसली तोशीस नव्हती.
मित्र मंडळीत अनेकजण विश्वासला गुंतवणूक, शेअर्स याबाबत सल्ले विचारत असत. मग शेअर्स, बॉंड्स, आयपीओ काहीही असो विश्वास हातचं काही राखून न ठेवता या क्षेत्रातील आपल्या वकुबानुसार त्यांना सल्ला देत असे. अर्थात माझे सल्ले म्हणजे शिफारस समजू नका असा ‘डिस्क्लोजर’ तो नेहमी जोडायचा. पण त्याने दिलेले हे सल्ले बव्हंशी उत्तम सिद्ध व्हायचे.
विकासला मात्र शेअर मार्केट या क्षेत्रात तितकासा रस नव्हता. नाही म्हणायला विश्वासच्या सांगण्यावरून त्याने डीमॅट खाते उघडले होते. पण शेअर्स घेणे वगैरेच्या फंदात तो कधी पडला नाही. आणि विश्वासनेही त्याला कधी अमुक कंपनीचा शेअर घेच असा आग्रहसुद्धा केला नाही. त्यात नोकरीच्या निमित्ताने विकासची बदली सुद्धा आता दुसऱ्या शहरात झाली होती. त्यामुळे नेहमी होणाऱ्या भेटीगाठी सुद्धा आता अगदीच नाहीच्या बरोबर होऊ लागल्या. पण फोनद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात होतेच.
अशातच एके दुपारी विश्वासचा मोबाईल वाजू लागला. फोन विकासचा होता. दुपारची वेळ म्हणजे विश्वासचं शेअर मार्केट व्यवहार सर्वोच्च बिंदू वर असण्याचा काळ. अशावेळी तो फोन घेणे टाळायचा, पण विकासाचा फोन असल्याने त्याने तो घेतला.
बोल भावा , कसा आहेस ?
मी मजेत, तू कसा आहेस ?
चाललंय तुमच्या कृपेने.. फोन सहजच की काही विशेष ?
विश्वास , अरे मला आता तातडीने २ लाख रुपये हवेत.. मिळतील ? पुढच्या आठवड्यात परत करतो.
तुला तातडीची गरज आहे ना .. मग मिळतील. मला आता नाही पण दीड – दोन महिन्यानंतर लागतील.
थँक्स यार..आठवड्यातच परत करतो तुला.
आत्ताच हवेत कि संध्याकाळपर्यंत पाठवू तुझ्या अकाऊंटला ?
नाही तू आता कामात असशील , संध्याकाळी पाठव. पण शक्यतो आजच बघ.
ओके बॉस .. पाठवतो संध्याकाळी.
आणि त्यानुसार विश्वासने त्याच दिवशी दुपारनंतर पैसे विकासच्या बँक खात्यावर पाठवले. आणि त्यावर ” पैसे मिळाले, थँक्स” असा मेसेज सुद्धा विकासकडून आला.
त्यानंतर अनेक दिवस गेले , दोन-तीन आठवडे झाले. पण विकासकडून पैसे काही परत आले नाहीत. नाही म्हणायला दोन दिवसांपूर्वी “पैशाचं लक्षात आहे , देतो काही दिवसांत” असा मेसेज आला त्याच्याकडून. अर्थात विश्वासला काही प्रॉब्लेम नव्हता. मित्रच आहे, कामाच्या तणावात असेल आज न उद्या देईलच. असा विचार करून तो विषय सोडून द्यायचा.
आता या गोष्टीला सहा महिने झाले, पण विकासकडून पैसे परत येणे नाहीच पण त्यानंतर कोणताही संपर्क सुद्धा केला गेला नाही. अनेकदा विश्वासने त्याच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तोही आता लागत नव्हता. अर्थात संपर्क करण्यामागे पैशापेक्षा किमान त्याची ख्याली खुशाली समजावी हा हेतू होता.
काही दिवसांनी त्यांच्याच एका ‘कॉमन’ मित्राकडून त्याला समजलं कि विकासने गावी प्रशस्त घर बांधलंय आणि नवीन चारचाकी गाडीही घेतलेय. आता मात्र विश्वासला खरंच वाईट वाटलं.आपल्या जवळच्या, अगदी बालपणीच्या मित्राकडून असं काही त्याला अपेक्षित नव्हतं. त्याने तो विषय कायम सोडून द्यायचं ठरवलं. त्यानंतरही विकासच्या प्रगतीपथावरच्या वाटचालीच्या विविध कथा विश्वासपर्यंत पोहोचत होत्याच. कधी नोकरीत मिळालेल्या मलईदार जागेबद्दल, तर कधी कुटुंबासोबत केलेली परदेशवारीबाबत.
आता त्या उधार-उसनवारी प्रकरणाला दिडेक वर्ष होऊन गेलं असेल. विश्वास आता शेअर ब्रोकिंग व्यवसायात जम बसवू लागला होता. अशाच एकेदिवशी दुपारनंतर मार्केट बंद झाल्यावर विश्वास आपल्या रिसर्च, एनालीसीस कामात असताना त्याचा फोन वाजला. आपल्या क्लाएंटपैकी कुणीतरी किंवा नेहमीचा मार्केटिंग ‘कोल्ड कॉल’ असं समजून त्याने फोन घेतला.
विश्वास भाऊ, कसा आहेस .. विकास बोलतोय
हे ऐकून विश्वास आता जागेवर उडायचाचा बाकी होता..पण तरीही सावरून त्याने प्रतिसाद दिला.
मी ठीक आहे भावा .. पण तू कुठे आहेस ? एकदम अंडरग्राउंड ? ना भेट, ना कॉन्टॅक्ट..
पण विकासला स्पष्टीकरण देण्यात काहीच इंटरेस्ट दिसत नव्हता. फक्त औपचारिकता म्हणून त्याने सुरवातीला ‘कसा आहेस’ असं विचारल्याचं विश्वासच्या लक्षात आलं. कारण विकासने लगेच आपल्या मुद्याला हात घातला.
अरे, तुझा सल्ला हवाय किंवा अगदी शिफारसच म्हण की.. दोनेक लाख गुंतवायचे आहेत. कशात टाकू ? कुठल्या कंपनीचे शेअर्स कि इतर कशात ? अगदी सात-आठ महिन्यांच्या मुदतीसाठी.
विकासने पैसे देण्याबद्दल चकार शब्द काढला नव्हता .. आणि विश्वासला आता तशी अपेक्षाही नव्हती.
भावा .. असं एखादा कालावधी ठरवून काही होत नसतं रे मार्केटमध्ये..
होरे .. पण तू सांग ..
ठीकेय.. दोन दिवसांनी एक आयपीओ लिस्ट होतोय.. लिस्ट झाल्या झाल्या घे..
अरे वा. . कोणता आयपीओ ?
पेटीएमचा ..
इतकं सांगून वेताळाने आपली गोष्ट संपवली आणि राजा विक्रमादित्याला म्हणाला..
राजा, विश्वासने असं का केलं असेल ? कि त्याने जुनं सगळं विसरून खरंच मित्राला नफा व्हावा म्हणून सल्ला दिला ?
कि मग जुनं उट्टं फेडण्यासाठी असं केलं ?
कि खुद्द विश्वासलासुद्धा शेअर मार्केट मधलं घंटा कळत नव्हतं ?
का केलं विश्वासने असं ?
राजा या प्रश्नाचं उत्तर माहित असूनही तू दिलं नाहीस तर तुझं डोकं शंभर भागांत ‘स्प्लिट’ होऊन तुझ्या पायाशी पडेल आणि जर उत्तर तुला माहीतच नसेल तर तुझं राजेपदच ‘डीलिस्ट’ होऊन जाईल ..
वेताळ धीरगंभीर आवाजात म्हणाला.
आतापर्यंत शांत असलेल्या राजा विक्रमादित्याला आता मात्र घाम फुटू लागला. कुठच्या कुठे हि ब्याद गळ्यात घेतली असा विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला. त्याचवेळी त्याच्या पाठीतसुद्धा एक कळ येऊन गेली..अन् क्षणाचाही विचार न करता वेताळाचं धूड तसंच मागच्या मागे फेकून देऊन विक्रमादित्याने आपल्या राजवाड्याच्या दिशेने धूम ठोकली.
अजूनही दुसऱ्या प्रहरातच असणाऱ्या त्या रात्रीच्या गर्द काळोखात आता फक्त आसपासच्या कुत्र्यांच्या ओरडण्याचा आणि वेताळाच्या विव्हळण्याचा आवाज भरून राहिला होता.
गोष्ट आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि जर तुम्ही ट्विटरवर असाल तर खालील ट्वीट रिट्वीट करायला विसरू नका.
Image : From Internet