inspirational story in marathiinspirational story in marathi

ते वर्ष होतं 1992, अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती, आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं. भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुल्या आर्थिक धोरण नामक रामबाण औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता. (inspirational story in marathi)

तसं बरच काही झालं होतं त्या वर्षी पण आपली आजची हि गोष्ट युक्रेनपासून सुरू होते.

होय तेच, आज जळत असलेलं युक्रेन..

तर झालं काय होतं, त्या वर्षी म्हणजे 1992 साली जॅन कौम नावाचा एक 16 वर्षांचा मुलगा युक्रेनमधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियातील माऊंटनव्ह्यू या गावी आला. येताना त्याने सोबत आपलं दारिद्र्य सुद्धा आणलं होतं.

पैशाची अन् म्हणूनच कामाची गरज असल्याने जॅनने एका ग्रोसरी स्टोअरमध्ये ‘झाडु मारण्याचं काम करायला सुरवात केली. त्याच्या आईनेही आसपासच्या छोट्या मुलांना सांभाळण्याचं म्हणजे ‘बेबी सिटर’ म्हणून काम करायला सुरवात केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होतीच. पण अमेरिकेत गरिबांसाठी असलेल्या “फूड स्टॅम्पसारख्या अनुदानित योजनांच्या आधारे हे कुटुंब कसबसं तग धरू शकलं .

दोन वर्षांनी जॅन 18 वर्षांचा झाला. तो आता कॉंप्युटर प्रोग्रॅमींग आणि नेटवर्कींगमध्ये रस घेऊ लागला. पण त्यासाठी लागणारी पुस्तके खरेदी करण्याइतके पैसे त्याच्याकडे नसायचे. मग तो जुन्या पुस्तकांच्या दुकानातून पुस्तके उधारीने आणून ती अभ्यासू लागला.अभ्यास झाला की तो आणलेली जुनी पुस्तके दुकानदाराला परत करायचा.

जॅन कौम

त्याचा या विषयातील इंटरेस्ट वाढू लागला.तेव्हा त्याने सॅनहौजे युनिव्हर्सिटींमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वेळी एका सॉफ्टवेअर कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम करायला सुरवात केली. आता दिवसभर कॉलेज व रात्री नोकरी असे त्याचे जीवनचक्र सुरू झाले. पण पुढे शिक्षणाला मध्यातच रामराम करीत तो विद्यापीठातून बाहेर पडला.

1997 साली त्याला याहूमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळी बहरू लागलेल्या अन् इंटरनेट क्षेत्रात सुरवातीलाच आघाडी घेतलेल्या कंपन्यांपैकी एक असलेली ‘याहू’ त्यावेळी जोरावर होती. त्याने तेथे 9 वर्षे नोकरी केली. त्याच दरम्यान त्याची ओळख ब्रायन ऍक्टन नावाच्य तरुणाशी झाली. काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या या दोघांची गट्टी चांगली जमली. 97 साली वडील आणि 2000 मध्ये आई कॅन्सरने गेल्यानंतर जॉन काहीसा एकटा पडला पण या काळात एक्टनने त्याला आधार दिला.

ब्रायन ऍक्टन

दोघांनी एकत्र काम सुरू केलं. याकाळात अनेक घटनांचे ते साक्षीदार राहिलेत. याहू ला सहन करावे लागलेले चढउतार, डॉटकॉम नामक बुडबुड्याचं फुगणं आणि फुटणं. या डॉटकॉम बुडबुड्यात हात धुवून घेण्याचा नादात ब्रायनने आपले हात पोळूनही घेतले.

याच काळात लोकांना उपयोगी पडेल असे एखादे कॉम्युटर ऍप्लिकेशन तयार करण्याची कल्पना जॅनच्या डोक्यात आली. आणि नक्की काय करावं हे ठरविण्याच्या दृष्टीने या दोघांनी याहुतील आपल्या नोकरीला रामराम केला. 

काहीतरी करायचंय, पण नक्की काय आणि कसं  हे उमगायला वर्ष 2009 यावं लागलं, जेव्हा जानेवारी 2009 मध्ये जॅनने आयफोन विकत घेतला.

एप स्टोर संकल्पनासुद्धा तेव्हा नवीनच होती. पण त्याच्या लक्षात आले की स्मार्टफोन उद्योगामुळे आता ऍप्लिकेशनची मोठी बाजारपेठ राहणार आहे.आणि हे एप्स लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग होऊ शकतील.या दरम्यान जॅनने आपल्या ड्रीम प्रोजेक्टसाठी ब्रायनला सोबत घेतले. जॉन आणि ब्रायन दोघांनी कॅलीफोर्नियातील माउंटन व्ह्यूमधील एक कॅफे पकडला. त्या कॅफेमधील एक कोपरा जणू त्यांचं स्टार्टअप हेडक्वार्टर होतं. त्यांचं तिथे नोट्स, कोडिंग असं सगळं सुरू असायचं.

दोघांनी काही दिवसातच स्मार्ट फोनसाठी एक ऍप्लिकेशन तयार केले व बाजारात आणले. ज्यात वापरकर्त्यांना आपल्या दैनंदिन कृती आपल्या एड्रेस बुकमधील मित्र परिवारातील लोकांना कळविण्याची सोय होती. तो वर्ष 2009 चा सुरवातीचा काळ होता. पण सुरवातीला हे एप अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हते. त्यामुळे त्याला लोकांचा प्रतिसाद अगदी शून्य म्हणावा इतका कमी होता. इतकं कि त्यांचे मित्रही ते एप वापरत नव्हते.

नोकरी नाही, व्यवसाय नीट चालत नाही त्यामुळे पैसेही नाहीत अशी पुन्हा अवस्था झाली. म्हणून आता हे सगळं बंद करून पुन्हा दोघांनीही परत नोकरी शोधायला सुरवात केली.

ब्रायनने त्याकाळात नाव होऊ लागलेल्या फेसबूकमध्ये अर्ज केला.त्याला मुलाखतीला बोलावणे सुद्धा आले पण इथेही त्याला ‘रिजेक्ट’ करून परत पाठवले गेले. ट्विटरमध्येही तिचं गत, “आम्ही तुला कळवू” असा ठेवणीतील निरोप.

पण म्हणतात ना कि तुमचे कष्ट  प्रामाणिक असतील तर इतर कुणी नाही तरी परिस्थिती त्याची दखल घेत असते,

आणि नेमकं असचं झालं.काही महिन्यांत एपलने पुश नोटिफिकेशन संदर्भातील आपले अपडेट रिलीज केलं. आणि सगळा खेळच बदलला. कारण यामुळे एपच्या रचनेत आणि संकल्पनेत मोठा बदल करण्यात आला. जॅनने आपल्या एपला सोशल मिडियाचं रुपडं देत नवीन अपडेट आणले.आणि ब्रायनने आपल्या याहू मधील सहकाऱ्यांकडून गुंतवणूक आणली.

आणि बघता-बघता अल्पावधीतच हे ऍप्लिकेशन लोकप्रिय झाले.

लोकप्रियता वाढत असली तरी हे एप चालवणे आजही तसं महाग होतं कारण वापरकर्त्यांच्या मोबाईल वेरीफिकेशनसाठी ओटीपी खर्चही महिन्याला हजारो डॉलर्समध्ये होता आणि  जाहिराती न घेण्याच्या धोरणामुळे उत्पन्न फारच कमी होतं. अशा या सुरवातीच्या काळात या दोघा संस्थापकांनी काही वर्षे वेतन न घेण्याचे धोरण स्वीकारलं. आणि काणत्याही जाहिरातीविना अत्यंत सोयीचं ठरलेल्या या एपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच राहिली.      

लवकरच फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गच्या कानावर याची माहीती पोचली. 2012 मध्ये त्याने जॉन आणि ब्रायन, दोघांना भेटीचं निमंत्रण धाडलं.
दरम्यानच्या काळात चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर फेब्रुवारी 2014 मध्ये फेसबूकने ही कंपनी साधारण 19 बिलीयन डॉलर्सला विकत घेतली. फेसबूकने ज्या ब्रायनला नोकरीसाठी ‘रिजेक्ट’ केले होते त्याच कंपनीने त्याला इथे संचालक मंडळामध्ये सहभागी करून घेतले. व  जॅनला या नव्या कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्त केले. पुढे 2018 मध्ये मात्र जॅन आपणच उभारलेल्या या कंपनीतून बाहेर पडला.

या कथेची सुरुवात जॅन पासून सुरु झाली असली तरी ही कथा जॅन आणि ब्रायन या दोघांची.. त्यांच्या मैत्रीची अन् त्यांनी निर्माण केलेल्या त्या ऍप्लिकेशनची आहे.

बरं सगळं सांगून झालं पण ज्याने हा इतिहास घडवला ते ऍप्लिकेशनचे कोणतं ?

तुम्ही सांगू शकाल का ? (whatsapp story in marathi)

भारताशी नातं ..

जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्ती अथवा घटनेचं भारताशी एखादं कनेक्शन असणं आपण भारतीयांना सुखावतं. इथेही आहे असं एक कनेक्शन.

व्हाट्सएपचा संस्थापक जॅन कौम मूळ युक्रेनचा. अमेरिकेला स्थलांतर करण्यापूर्वी लहानपणापासून भारतीय चित्रपट पाहणे हा त्यांच्यासाठी विरंगुळ्याच्या काही क्षणांपैकी एक असे. त्यातही ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय कलाकार राहिलेले मिथुन चक्रवर्ती यांचे कित्येक चित्रपट जॅन यांनी पाहिलेत. त्याकाळचा सुपर हिट ठरलेला डिस्को डान्सर हा चित्रपट पहातच जॅन मोठा झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण जॅन याने हा चित्रपट किमान वीस वेळा पाहिलाय असं खुद्द जॅन यानेच सांगितलंय. (WhatsApp co-founder Jan Koum’s India connection)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *