kailash katkar success story in marathikailash katkar success story in marathi

यशस्वी माणसांच्या संघर्षगाथा आपल्याला सुखावतात. आणि अशीच एखादी वाचनात येणारी संघर्षाची कथा जर मराठी माणसाची असेल तर सुखावणाऱ्या त्या मनाला अभिमानाची किनारही लाभते.

आज आपण पाहतो, सर्वसामान्यता करिअरची सुरवात इयत्ता दहावीनंतरच होते. म्हणजे आजच्या अल्ट्रा मॉडर्न युगाला ते तसं साजेसच, पण एक काळ असाही होता कि इयत्ता दहावी अनेकांसाठी शिक्षणाची इतिश्री समजली जायची.

अशी झाली सुरवात (kailash katkar success story in marathi)

कैलाशच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. दहावी उत्तीर्ण होऊनही औपचारिक शिक्षणात रस नसलेला कैलाश पुढे उच्च शिक्षण घेण्याऐवजी पुण्यात एका इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणाऱ्या रिपेअर शॉपमध्ये काम करू लागला. जिथे कैलाश कॅल्क्युलेटर आणि रेडिओ, टेपरेकॉर्डर सारख्या तेव्हा रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या या वस्तू दुरुस्त करायचा. ते वर्ष होतं 1985.

कैलाशला त्याकाळी महिन्याला पगार होता 400 रुपये. कैलाश यांचे वडील फिलिप्समध्ये मशीन सेटर म्हणून काम करायचे.या दरम्यान कैलाश यांनी आपल्या वडिलांना घरी रेडिओ दुरुस्त करताना पाहिले होते. त्यामुळे त्याचीही यात रुची निर्माण झाली होती.

दुकान मालकाने कैलाशला महिनाभरासाठी आपल्या मुंबईच्या दुकानात शिकण्यासाठी पाठवले. यावेळी कैलाशला पगार होता महिना 1500 रुपये. हळूहळू स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ रिपेअरिंग अशा कामातून त्याची कमाई महिन्याला 2000 पर्यंत होऊ लागली.

kailash katkar quickheal

1991 : स्वव्यवसायाचा श्रीगणेशा (kailash katkar biography)

कॅल्क्युलेटर दुरुस्तीच्या नोकरीमुळे कैलाशला या तांत्रिक क्षेत्राविषयी ज्ञान आणि पुरेसे कौशल्य मिळू शकलं. आणि यातूनच आता स्वतःचं काहीतरी सुरु करण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातूनच त्यांनी 1991 मध्ये पुण्यात स्वतःचे कॅल्क्युलेटर दुरुस्तीचे दुकान उघडले.

दुकान उघडण्यासाठी त्यांची स्वताची गुंतवणूक होती 15000 रुपयांची. पण त्यांनी हे फक्त कॅल्क्युलेटर दुरुस्ती पुरतं मर्यादित ठेवलं नाही. काही काळातच कैलाशनी इतर मशिन्सही दुरुस्त करायला सुरुवात केली. यातूनच लवकर त्यांना न्यू इंडिया इन्शुरन्ससाठी वार्षिक देखभाल करार अर्थात एएमसी मिळाला.

याच दरम्यान कैलाश यांचा लहान भाऊ संजय याने बारावीनंतर शिक्षण सोडायचे ठरवले होते, पण औपचारिक शिक्षण पूर्ण न केल्यामुळे व्यावसायिक आयुष्यातील कमतरता अनुभवलेल्या कैलाश यांनी संजयला शिक्षण न सोडता उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. संजयला संगणक शिक्षण घेण्यासाठी लागणारी फी तेव्हा 5000 रुपये इतकी होती, जी तेव्हा कैलाश यांच्या कुटुंबासाठी फार जास्त होती, यावेळी कैलाश यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

..आणि आलं ते संगणकीय वळण.

ऐंशी, नव्वदीच्या दशकात बालपण घालवलेल्या प्रत्येकाची सर्वात आधी संगणक कधी पहिला याबाबतची आठवणी असेलच. कैलाश यांची सुद्धा आहे. आपल्या व्यवसायानिमित्त अनेकदा त्यांचं बँकेत जाण व्हायचं.व्यवसायानिमित्त म्हणजे बँकेतील तेव्हाची अत्यंत महत्वाची वस्तू असलेल्या कॅल्क्युलेटर दुरुस्त करायला ते जायचे. आणि हीच ती वेळ जेव्हा त्यांनी पहिल्यांदा  संगणक पाहिला.

हि आज टीव्हीसदृश दिसणारी वस्तू येणारं भविष्य व्यापणार आहे हे कैलाश यांनी जाणलं.आपल्या दुरुस्तीच्या कामातून मिळणारा पैसा नवीन मशीनमध्ये गुंतवण्याचा कैलाशचा विचार होता. कोणत्याही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे कैलाश यांच्या आईला वाटत होते कि कैलाशनी घरात म्हणजे स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करावी, पण कैलाश यांनी त्यांच्या व्यवसायास प्राधान्य दिले. आणि आपल्या आयुष्यातील पहिला संगणक 50 हजार रुपयांना विकत घेतला, त्याचा वापर बिलिंगसाठी होऊ लागला. गंमत अशी कि त्यावेळी अनेकजण त्यांच्या दुकानात फक्त टीव्ही सारखा दिसणारा तो संगणक पाहण्यासाठी यायचे.

सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रवेश.

अमेरिकादी देशात संगणकीय व्यवहार जरी रुळू लागलेले असले तरी भारतात आताशा कुठे सुरवात होऊ लागली होती, संगणक आला म्हणजे त्यासाठी  लागणाऱ्या विविध प्रणाली अर्थात सॉफ्टवेअर लागणारच.त्यामुळे हा बाजार आपल्याकडेही हळूहळू बाळसे धरू लागला. आणि हा प्रभाव त्याकाळात संगणकाला आपलेसे करणाऱ्या कैलाशवरही होताच. यातूनच त्यांनी 1993 मध्ये CAT कॉम्प्युटर सर्विसेस सुरू केली. त्यांची ही कंपनी संगणक देखभाल सेवा देत असे.

यादरम्यान कैलाश यांना आढळून आले की, दुरुस्तीसाठी येणाऱ्या बहुतांश संगणकाच्या नादुरुस्तीचे कारण मशीन्सना झालेल्या विषाणूची लागण हे असायचं. हे पाहून कैलाश यांनी आपला भाऊ संजयला अँटी व्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. संजय त्यांच्या पदवीत्तर शिक्षणाच्या दिवसांत आपल्या भावाच्या दुकानात वारंवार येत असे. याच दरम्यान त्याने त्याच्या मास्टर्सच्या दुसर्‍या वर्षात ‘विषाणू संक्रमित’ मशीन दुरुस्त करण्यासाठी एक प्रोग्राम विकसित केला.त्यानंतर त्याने असे आणखी 2-4 प्रोग्रॅम्स विकसित केले, जे कैलाश यांनी आपल्या वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी येणाऱ्या कॉम्प्युटरसाठी वापरून पहिले. (Quick Heal Story in marathi )

आणि मग आलं ‘क्विकहिल’.. (Quick Heal Antivirus )

अँटीव्हायरस प्रोग्राम्सच्या भविष्यातील मागणीचा अंदाज घेऊन, काटकर बंधूंनी  हार्डवेअर दुरुस्ती बाजूला ठेवून आता ‘अँटी-व्हायरस’ सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. आणि मग 1995 मध्ये त्यांनी ‘Quickheal Antivirus’ हे त्यांचे पहिले उत्पादन लाँच केले जे DOS या संगणक प्रणालीसाठी होतं. 

त्यावेळी क्विक हील अँटीव्हायरसची किंमत होती 700 रुपये जी त्या काळात उपलब्ध असलेल्या अँटीव्हायरसच्या इतर पर्यायांच्या तुलनेत फारच स्वस्त होती.यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभला. आणि हि क्विकहिलची सुरवात होती ज्या नंतर बंधूंनी मागे वळून पाहिले नाही. 

1998 पर्यंत काटकर ब्रदर्सने हार्डवेअर दुरुस्ती पूर्णतः थांबवली आणि आपलं संपूर्ण लक्ष अँटीव्हायरसकडे वळवलं. कैलाश उत्पादनांचे मार्केटिंग करायचे, तर संजय संशोधन आणि विकासाचे म्हणजेच रिसर्च एंड डेवलपमेंटचे काम पाहत असे.

karkat brothers quickheal
व्यक्ती असो वा संस्था, बॅडपॅच येतोच

सुरुवातीची पहिली 5 वर्षे क्विक हीलचा व्यवसाय पुण्यापुरता मर्यादित होता आणि प्रतिसाद चांगला होता पण तो अद्याप यशस्वी म्हणता येईल अशा टप्प्यावर आला नव्हता.1999 च्या दरम्यान बँका आणि गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद कमी झाल्याने काटकर बंधूंवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती.

पण म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचा शेवट एका नवीन पर्वाची सुरवात असू शकते.

या कठीण काळात त्यांनी आपल्या मित्र परिवाराशी बोलून त्यांनी आपल्या उत्पादन जगाला ओरडून सांगण्याचं ठरवलं, अर्थात आपल्या उत्पादनाचं आक्रमक मार्केटिंग करण्याचे ठरवलं.त्यावेळी कैलाश यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात क्विकहिलची अर्ध्या पानाची जाहिरात केली. आणि आता आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

2003 : सिमोलंघन

यश मिळविण्यासाठी सिमोलंघन गरजेचं असतं. वर्ष 2002 मध्ये काटकर बंधूंनी व्यवसाय पुण्याबाहेर नेण्याचं ठरवलं. आणि वर्ष 2003 ला नाशिकमध्ये क्विकहीलची पहिली शाखा उघडण्यात आली. आणि कंपनीच्या सर्व हार्डवेअर विक्रेत्यांना क्विकहील सॉफ्टवेअर विकण्यास प्राधान्य द्यायला सांगण्यात आले.

2002 ते 2010 या काळादरम्यान क्विक हीलने पुण्याबाहेरील अनेक मोठ्या शहरांमध्ये विस्तार करण्यास सुरुवात केली. काटकर बंधूंनी 2011-12 मध्ये कंपन्यांना त्यांच्या समस्येनुसार सेवा द्यायचं ठरवल म्हणजे आता त्यांची कंपनीने ‘एंटरप्राइज सोल्युशन्स’ व्यवसायात प्रवेश केला. हे फार महत्वाचं होतं. कारण कंपनी आता हळूहळू एक जागतिक ब्रँड म्हणून नावारुपास येऊ लागली.

2007 : बदल गरजेचा असतो. ( Change is inevitable )

वर्ष 2007 मध्ये कंपनीने पुण्यात नवीन संशोधन आणि विकास केंद्र उघडल्यानंतर कंपनीचे नाव बदलून आता ते ‘क्विकहील टेक्नोलॉजीज लिमिटेड’ (Quickheal Technologies Limited) असे करण्यात आले.

2010 मध्ये कंपनीत Sequoia Capital कडून 60 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आली. या निधीचा वापर कंपनीच्या नवीन शाखा उघडण्यासाठी करण्यात आला.देशाभरात महत्वाच्या शहरात कंपनीच्या शाखा उघडण्यात आल्या.

तामिळनाडूनंतर दोन वर्षांत जपान, अमेरिका, आफ्रिका आणि यूएईमध्ये शाखा उघडून कंपनी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली. 2011 मध्ये क्विक हीलने एंटरप्राइझ ग्राहकांसाठी सुरक्षा सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली आणि पुढे मग 2013 पर्यंत कंपनीने संगणक आणि सर्व्हरसाठी आपले पहिले ‘एंटरप्राइझ अँड पॉइंट’ सुरक्षा सॉफ्टवेअर सादर केले

आज कंपनी रिटेल आणि एंटरप्राइझ या दोन्ही घटकांना उत्पादने पुरवते. कंपनी संगणक, सर्व्हर आणि सायबर सुरक्षा याबाबत आपली अद्ययावत उत्पादने वेळोवेळी बाजारात आणीत असते.

शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध : ( Quick Heal IPO)

कोणत्याही कंपनीचा व्यावसायिक प्रवास जेव्हा स्थिर आणि प्रगतीशील होतो तेव्हा तिला सार्वजनिक क्षेत्र खुणावू लागतं. प्रायव्हेट लिमिटेड ते पब्लिक लिमिटेड होणे हे कोणत्याही कंपनीसाठी महत्वाचा टप्पा असतो. क्विकहील बाबत असं झालं नसतं तरच नवल होतं.

अखेर 2016 मध्ये क्विक हीलचा आयपीओ आला आणि पहिल्या पिढीतील एका मराठी उद्योजकाची हि कंपनी बाजारात सूचीबद्ध झाली. (kailash katkar success story in marathi)

quick heal IPO

इंटेल या जगप्रसिद्ध कंपनीची टॅगलाईन आहे ‘इंटेल इनसाईड’. कंपनीची आपल्या क्षेत्रावरील पकड इतकी मजबूत कि जगातील जवळपास प्रत्येक संगणकात इंटेलचा एखादा तरी भाग असणारच असा आत्मविश्वास त्या टॅगलाईन मधून दिसतो.

हे सांगण्याचं कारण म्हणजे उद्या तुम्ही कदाचित जगातील एखाद्या परक्या देशात असताना तिकडे कुणाच्या लॅपटॉपची सुरक्षा ‘क्विकहील’ करत असल्याचं लक्षात आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. कारण क्विकहीलचीही टॅगलाईन काही अशीच आहे..

तुमच्या संगणकात कोण राहतं ? ‘क्विकहील’ कि व्हायरस ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *