क्रेडीट कार्ड कसं वापरावं ? (How to use Credit Card ?)
(How to use Credit Card ?) खरं तर अगदी सोपा वाटणारा प्रश्न पण प्रत्यक्षात आर्थिक हुशारी आणि कौश्यल्य याचं महत्व पटवून देणारा. आणि हे समजून घेण्यासाठी मुळात बँका क्रेडीट कार्ड देण्या मागची प्रक्रिया कशी हे थोडक्यात पाहूया.
जेव्हा बँक आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करून ती सुदृढ वाटल्यास ( किमान बँकेला तसं वाटायला हवं ) बँक आपल्याला क्रेडीट कार्ड देऊ करते. क्रेडीट म्हणजे पत, हे म्हणजे बँकेकडून एक ठराविक मर्यादेपर्यंत आपल्याला आगाऊ खर्च करण्यास आर्थिक सहाय्य केलं जाण्यासारखं. म्हणजे हे एक प्रकारचे “प्री अप्रूव्हड” कर्जासारखंच. अर्थात हि क्रेडीट तुम्हाला मिळते बकेच्या नियम अटींच्या अधीन राहूनच.
काय असतात हे नियम. ( Rules of credit card )
कोणत्याही खरेदीसाठी तुम्ही क्रेडीट कार्ड (Credit Card ) वापरता तेव्हा तुम्हाला तुम्ही त्यावेळी वापरलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी किमान १५ ते कमाल ५० दिवसांची मुदत मिळते ज्या दरम्यान तुम्हाला कोणतंही व्याज किंवा अतिरिक्त शुल्क वापरलं जात नाही. पण जर या मुदत्ती दरम्यान जर तुम्ही परतफेड केली नाही तर मात्र तुम्हाला विलंब शुल्क आणि व्याज द्यावं लागतं.
परतफेडीसाठी मिळणारं हे व्याजमुक्त आणि कोणतंही शुल्क नसणारा ( Credit Card Grace Period ) हा कालावधी तुम्हाला कसं मिळतो ?
तर इथे तुमच्या क्रेडीट कार्डची स्टेटमेंट डेट म्हणजे ज्यादिवशी तुमचे सरत्या महिन्याच्या कालावधीत केलेल्या व्यवहारांचा हिशेब होऊन तुम्ही परतफेड करण्याची रक्कम आणि त्याची अंतिम मुदत ठरते हि दर महिन्याची स्टेटमेंट डेट कायम असते म्हणजे महिन्याच्या त्याच दिवशी हा हिशेब होऊन त्या किंवा फारतर पुढील दिवशी तुम्हाला तुमच्या क्रेडीट कार्ड खात्याची स्टेटमेंट इमेलद्वारे प्राप्त होते.
आपण हे थोडं सोपं करण्यासाठी उदाहरण पाहू
समजा तुमच्याकडे एखाद्या बँकेचं क्रेडीट कार्ड आहे आणि त्या कार्डची स्टेटमेंट डेट दर महिन्याची 15 तारीख आहे. म्हणजे गेल्या महिन्याच्या 16 तारखेपासून या महिन्याच्या 14 तारखेपर्यंतचे व्यवहार यात विचारात घेतले जाणार आणि त्यानुसार त्याची परतफेड करण्याची मुदत जी साधारणतः १५-१६ दिवसानंतर असते. म्हणजे स्टेटमेंट डेट दर महिन्याची पंधरा असेल तर त्यानुसार त्या महिन्याची 30 तारीख ते पुढील महिन्याची 2 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या क्रेडीट कार्ड वर केलेल्या खरेदीच्या रकमेची परतफेड करणे अपेक्षित आहे जे न केल्यास तुम्हाला व्याज आणि विलंब शुल्क लागू शकतं.
नक्की काय करावं म्हणजे जास्त कालावधी मिळू शकेल ? ( How to use credit card smartly )
वरील उदाहरणानुसार जर तुम्ही तुमची खरेदी तुमच्या या महिन्याच्या स्टेटमेंट डेटच्या पुढील दिवशी म्हणजे 16 तारखेस केल्यास त्या खरेदीची स्टेटमेंट हि एक महिन्याने म्हणजे पुढील महिन्याच्या 15 तारखेस बनणार आणि परतफेड करण्यास त्याहि पुढे 15 दिवस मिळतात. उदाहरणार्थ , जर 16 एप्रिल रोजी मी महिन्याचे घरासाठीचे सामानाची खरेदी केली तर त्याची स्टेटमेंट 15 मे रोजी बनणार आणि परतफेड करण्यासाठी अंतिम मुदत जून 2 तारखेपर्यंत मिळू शकते, म्हणजे या हिशेबाने मला दीड महिना व्याजमुक्त कालावधी मिळतो.
1) महिन्याचं घराचं वाण सामान इत्यादी खरेदी जर तुम्ही सुपरमार्केटमधून करत असल तर ती खरेदी ‘स्टेटमेंट डेट’ नंतरच्या दिवशी म्हणजे वरील उदाहरणात 16 तारखेस करावी म्हणजे त्या खरेदीचा पैसा तुमच्या बचत खात्यात पुढील दीड महिना राहतो ज्यावरील व्याज तुम्हाला लागू होतं आणि ह्या कालावधीत कोणतंही व्याज किंवा शुल्क लागू नसल्याने अंतिम मुदतीपर्यंत तुम्ही त्याचा भरणा करू शकता.
2) रेफ्रिजरेटर , टिव्ही, एसी सारख्या वस्तूंची खरेदी करण्याची योजना असेल तर कर्ज काढून हफ्त्यावर वगैरे न घेता या वस्तू घेण्याची रोख रक्कम जमा होईपर्यंत थांबावे आणि तेवढी रक्कम जमा झाल्यानंतर वर सांगितल्या प्रमाणे स्टेटमेंट डेटच्या पुढील दिवशी क्रेडीट कार्ड वर खरेदी करावी अर्थात रोख रक्कम असल्याने अंतिम मुदतीच्या आसपास या खरेदीचे पेमेंट करून टाकावे. यावेळीही तेवढ्या रकमेचं व्याज तुम्हाला लागू होतं.
3) जर तुमच्या जवळ तीन चार वेगवेगळ्या बँकांचे क्रेडीट कार्ड्स असतील तर वरील खरेदीपुर्वी कोणत्या बँकेच्या कार्डवर कॅशबॅक सारख्या स्किम्स आहेत का हे पाहावं, शक्य असल्यास गूगल करून किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक स्टोर्स मध्ये खरेदी करणार तेथे विचारून पाहावं.
4) प्रत्यक्ष रोखीने व्यवहार होत नसल्याने ग्राहक मानसशास्त्रानुसार खिशातून रोख पैसे खर्च होत नसल्याने गरज नसलेल्या अतिरिक्त वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता असते, ती कटाक्षाने टाळावी.
5) क्रेडीट कार्ड बिल नेहमी पूर्ण भरावे , पार्ट पेमेंट शक्यतो टाळावे. “मिनीमम अमाऊंट ड्यू’ ( Minimum Amount Due ) म्हणजे भरण्याची किमान रक्कम च्या जाळ्यात कधीही फसू नका, कारण हि रक्कम साधारणता मूळ रकमेच्या 5 % असते आणि शिल्लक रकमेवर महिना 3 ते 4 % महिना व्याजदराने तुम्हाला व्याज आकारणी सुरु होते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक वेळी जर तुम्ही फक्त “मिनीमम अमाऊंट ड्यू’ पे करत राहिलात पुढे मूळ मुद्दल परतफेड होण्यास मोठा काळ लागतो ज्यात फक्त व्याजापोटी तुम्ही भलीमोठी रक्कम भरलेली असेल.तसेच जेव्हा तुम्ही “मिनीमम अमाऊंट ड्यू’ पे करता तेव्हा तुम्हाला व्याजमुक्त कालावधी मिळणं बंद होतं.
6) बँकेचे क्रेडीट कार्डसंदर्भातील वेळोवेळी बदलणारे नियम माहिती करून घ्या.
7) क्रेडीट कार्ड वर उपलब्ध असलेला आणखी एक पर्याय म्हणजे कॅश एडव्हान्स, या पर्यायात तुम्ही कोणत्याही बँकेच्या ATM मध्ये तुमचं कार्ड वापरून पैसे काढू शकता , पण लक्षात ठेवा , हा पर्याय अगदी आणीबाणीच्या परिस्थिती खेरीज कधीही वापरू नका कारण या प्रकारात तुम्ही जेव्हा पैसे काढता त्या क्षणापासून तुम्हाला व्याज आकारणी सुरूं होते आणि त्या व्यतिरिक्त या सेवेसाठी बँक तुम्हाला अतिरिक्त शुल्क आकारणी करते ते वेगळंच. आणि यातही गोम अशी कि इथे अशा पैसे काढण्याच्या प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारले जाते म्हणजे समजा या कॅश एडव्हान्ससाठी बँक प्रत्येक व्यवहारास रु.500 आकारत असेल आणि ATM मधून एकाच वेळी फक्त दहा हजार काढता येत असतील आणि तुम्हाला 30 हजाराची गरज असेल तर मग तुम्हाला तीन वेळा ATM मधून रक्कम काढावी लागेल आणि फक्त या साठी बँक तुमच्याकडून रु.1500 शुल्क आकारणार. थोडक्यात काय तर हा पर्याय नकोच.
8) रिवार्ड पॉईंट्च्या ( Reward Points ) मागे लागून क्रेडीट कार्ड वर उगाच फालतू खरेदी करणे टाळावे. कारण मुळात दर ठराविक रकमेच्या खरेदीवर मिळणारे रिवार्ड पॉईंट्स आणि त्यातही त्या बदल्यात व्हाऊचरचे गुणोत्तर काहीसं व्यस्त असतं. म्हणजे रु.500 च्या व्हाऊचरसाठी तुम्ही 1500 रिवार्ड पॉईंट्स वापरता ज्यासाठी तुम्हाला ( रु.150 च्या खरेदीमागे 2 रिवार्ड पॉईंट्सच्या हिशेबाने) साधारणता रु. 1,12,000 खर्च करावे लागतात आणि त्यावरही ह्या पाचशे रुपयाचं व्हाऊचर मिळविण्यासाठी प्रोसेसिंग चार्ज द्यावा लागतो तो वेगळा. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने मनीबॅक कार्डबाबत असते.
तर मित्रांनो,
‘मॉरल ऑफ स्टोरी’ सोप्या भाषेत सांगायची तर क्रेडीट कार्ड तसच वापरा जसं तुम्ही तुमच्या खिशातील रोख रक्कम वापरता, म्हणजे थोडं जपून आणि वाचवून. फक्त त्यात थोडं स्मार्टनेस आणा.
लेख आवडला असेल तर इतरांना शेअर नक्की करा. तसेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.