What is cryptocurrency in marathiWhat is cryptocurrency in marathi

बिटकॉइन / क्रीप्टोकरन्सी म्हणजे काय ?
what is cryptocurrency in Marathi 

बिटकॉइन / क्रीप्टोकरन्सी म्हणजे काय ? what is cryptocurrency in Marathi : मानव हि देवाची ( किंवा विश्वाची म्हणा हवं तर ) सर्वोत्कृष्ट निर्मिती समजली जाते, पण त्या मानवाची सर्वोत्कृष्ट निर्मिती कोणती असा प्रश्न पडल्यास त्याचं उत्तर “पैसा” हे असू शकतं.

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात विनिमय पद्धती आणि पुढे पैशाची निर्मिती तसेच त्याचा वापर हा फार महत्वाचा टप्पा समजला जातो. सुरवातीची वस्तू विनिमय पद्धत ( बार्टर सिस्टम ) अन् त्यानंतर इसवीसन पूर्व 9000 ते 5000 या काळात गुरं-ढोरांचा वापर विनिमयात होऊ लागला. पण या पद्धतीला मर्यादा होत्या कारण यामध्ये दोन्ही बाजूला असलेल्या व्यक्तींना एकमेकांकडे असलेल्या वस्तूंची गरज असेल तरच वस्तू विनिमय होऊ शकत होतं.

मग यातून गरज निर्माण झाली एका अशा गोष्टीची ज्याच्या सहाय्याने आपण हवी ती वस्तू मिळवू शकू. एक अशी गोष्ट जी सर्वांना मान्य असेल आणि तिला स्वतःचं मूल्य असेल. म्हणून जगातील सुरवातीचं चलन म्हणजेच पैसा म्हणता येईल अशा कवड्यांचा वापर सुरु झाला. पुढील काळात कवड्या हे चलन म्हणून बराच काळ रूढ झालं होतं. त्यानंतरच्या काळात आपापल्या साम्राज्यवाढीची इर्षा तसंच त्याची ओळख जनमानसात दृढ करण्यासाठी असो किंवा अर्थकारणात सहजता यावी म्हणून म्हणा पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी आपापलं अधिकृत चलन आणलं.

चलनात धातूचा वापर होण्यास आता बराच काळ लोटला आहे. अठराव्या शतकात सोन्यासारख्या धातूचा तर खुद्द चलन म्हणून वापरही झाला आहे पुढे त्यातील सुरक्षितता वगैरे मुद्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी चलन म्हणून त्याचा वापर थांबला असला तरी आजही मूल्य आणि संपत्ती म्हणून सोन्याचे स्थान बरेच वरचे आहे.पण चलनाचा विचार करायचं म्हटल्यास आधुनिक जगात आजही वापरात असलेलं सर्वात जुनं चलन म्हणावं तर ब्रिटीश पौंड ओळखलं जातं.   

आज व्यवहारात मुख्यता नाणी, पेपरमनी म्हणजे कागदी नोटा त्यापुढे मग प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे असले तरी हि व्यवहाराची माध्यमे आहेत चलनाची नव्हेत. म्हणजे त्याद्वारे तुम्ही व्यवहार करता ते मुळात डॉलर्स, पौंड, रुपया यासारख्या चलनातून होत असतं. बरं हे झालं चलन आणि विनिमयात आतापर्यंत काय झालं या बद्दल, इथून पुढे भविष्य इलेक्ट्रॉनिक मनी अर्थात क्रिप्टोचलन म्हणजेच बिटकॉइन सारख्या चलनाचं असू शकतं.

बिटकॉइन / क्रीप्टो करन्सी म्हणजे काय. (what is cryptocurrency)

आपण आजकाल अनेक व्यवहार करताना, खरेदी करताना डिजिटल पेमेंट करतो, उदाहरणार्थ गुगल पे, फोन पे, पेटीएम वगैरे. तर बिटकॉइन हा प्रकार सुद्धा असाच आहे पण हे साम्य इथेच संपतं कारण जेव्हा आपण पेटीएमने व्यवहार करतो तेव्हा त्यामधून पाठवले जाणारे चलन हा आपल्या रुपयामध्येच असतं म्हणजे माध्यम इथे डिजिटल असलं तरी करन्सी नेहमीचीच आहे. पण बिटकॉइन हे स्वतःच एक चलन आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर हे इलेक्ट्रॉनिक चलन आहे. रुपया , पौंड आणि डॉलर्समध्ये आणि बिटकॉइनमध्ये फरक हाच कि या आधीच्या पारंपारिक चलनाचं नियमन हे त्या त्या देशातील सरकारकडून होत असतं. म्हणजे पहा, आपल्याकडे चलन छापण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे आहेत.

पण जो पैसा आपण व्यवहारात वापरतो तो सरकारकडून कधीही रद्द होऊ शकतो किंवा त्यात बदल होऊ शकतो उदा. 2016 ची नोटबंदी.पण क्रिप्टोचलनाचं तसं नाही या चलनावर कोणत्याही सरकारचं नियंत्रण नाही. हेच या चलनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. म्हणजे या चलनात कोणतेही बदल किंवा ते रद्दबातल करणे हे कोणतेही सरकार करू शकत नाही. थोडक्यात कोणतीही बँक किंवा देशातील सरकारकडे याची मालकी नाही. हे पिअर टू पिअर नेटवर्कने काम करतं म्हणजे दोन व्यक्तींमध्ये होणार्या व्यवहारात कोणतीही बँक किंवा पेमेंट सिस्टम इथे सामील नसते. कारण त्यांची गरज नसते.  

बिटकॉइन मायनिंग म्हणजे काय. (what is cryptocurrency mining)

मायनिंग हा शब्द हा साधारणतः खनिज उत्पादन घेण्यासंदर्भात वापरला जातो. जसं सोन्याची खाण, कोळश्याची खाण वगैरे. कारण हि साधन संपती निसर्गात मर्यादित स्वरुपात उपलब्ध असते त्यामुळे तो शोधून काढावी लागते. बिटकॉइनसाठी  सुद्धा मायनिंग हा शब्द वापरला जातो.जसं मिटींग ( टांकसाळ ) हा शब्द पैसे छापण्यासाठी वापरला जातो आणि त्यात तसा विशेष फरक नसला तरी बिटकॉइनसाठी मायनिंग हा शब्द जास्त साजेसा आहे.

‘सातोशी नाकामोटो’ या नावाच्या व्यक्तीकडून बिटकॉइनची निर्मिती करण्यात आली. खरं तर हे नाव काल्पनिक असण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण यामागच्या खऱ्या व्यक्तीने किंवा अनेक व्यक्तींच्या समूहाने आपली खरी ओळख कधी जगासमोर आणली  नाही. बिटकॉइन हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यामध्ये मायनिंग होते म्हणजे नवीन बिटकॉइन चलनात येतात उदाहरणार्थ रिझर्व्ह बँकेकडून जशा नवीन नोटांची छपाई केली जाते तसंच काहीसं.

पण म्हणजे नेमकं काय होतं ?

तर सोप्या शब्दांत सांगायचं तर हे करताना गणितातील अगदीच क्लिष्ट अशा समीकरणांची उकल इथे करावी लागते. बिटकॉइनमध्ये होणारे व्यवहार व्हेरीफाय करणे म्हणजे त्यातील सत्यता सिद्ध करणे हे काम यात असतं आणि त्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला बक्षीस म्हणून बिटकॉइन मिळतं. हे सगळं करण्यासाठी इथे अत्यंत उच्च दर्जाची आणि ताकदीची  कॉम्पुटर सिस्टम इथे वापरली जाते ज्यामध्ये मायनिंग हार्डवेअर लावलेलं असतं आणि सांगायचं तर एकाच क्षणी जगभरात हजारोजण बिटकॉइन मायनिंगसाठी प्रयत्न करत असतात पण त्यातील एखाद्यालाच यश मिळतं. त्यामुळे बिटकॉइन छापणे म्हणजे प्रिंटरवर एखादी प्रिंट घेण्यासारखं नाही हे तुमच्या लक्षात येईल. हि मायनिंग प्रत्येक ब्लॉक पद्धतीने होत असते.               

किती वाढू शकते क्रीप्टोकरन्सीची किंमत ? How far can cryptocurrency prise go upto ? 

याचं काही थेट उत्तर देता येणार नाही, हा लेख लिहित असताना बिटकॉइनची असलेली किंमत तुम्ही वाचेपर्यंत कितीतरी लाखांनी कमी-जास्त झालेली असू शकते. एक मात्र खरंय कि 2009 पासून आतापर्यंत या चलनाने फार मोठी झेप घेतलेय. पण यापुढे तितकीच मोठी झेप घेईल का ? तर किंमत वाढू शकते पण तितकी मोठी झेप घेणे थोडं कठीण दिसतंय कारण रोज येणारे नवनवीन क्रिप्टोचलन अनेक देशांकडून चलनास मान्यता मिळणे न मिळणे या बाबीसुद्धा याबाबत विचारात घ्याव्या लागतील.         

बिटकॉइनची संख्या मर्यादित आहे का ? ( Are Bitcoins limited ? ) 

याचं उत्तर आज हो आणि नाही असं दोन्हीने देता येईल कारण आज नवीन बिटकॉइनची छपाई सुरु असली तरी नवीन येणाऱ्या बिटकॉइनच्या संख्येत उत्तरोत्तर घट होत जाणार आहे.कारण त्यामागील अल्गोरिदमच तसं आहे. जसं कि दर चार वर्षात रोज किती नव्याने छापल्या जाणाऱ्या बिटकॉइनची  संख्या अर्ध्याने कमी होत जाईल.

म्हणजे उदाहरणार्थ.

२०१६ ते २०२० दरम्यान रोज 1800 बिटकॉइन बनले जाऊ शकत होते. आता 2020 ते 2024 मध्ये हि संख्या 900 असेल त्यापुढील चार वर्षांनी ती रोजची संख्या 450 वर येईल असं करत करत वर्ष 2140 मध्ये नवीन बिटकॉइन बनणे बंद होईल तोपर्यंत बाजारातील एकूण बिटकॉइनची संख्या असेल 2,10,000,00 म्हणजे दोन कोटी दहा लाखाव्या बिटकॉइनच्या पलीकडे आणखी बिटकॉइन निर्मिती होणार नाही. 

क्रीप्टोकरन्सी कोठे सुरक्षित ठेवली जाते ? where is cryptocurrency stored ?

जेव्हा तुम्ही कंपन्यांचे शेअर्स घेता तेव्हा 2 दिवसानंतर ते शेअर्स तुमच्या डिमॅटमध्ये येतात जिथे ते सुरक्षित असतात. म्हणजे समजा उद्या तुमच्या ब्रोकरचं दिवाळं वाजलं तरी तुमची शेअर्स सीडीएसएल किंवा एनएसडीएल पैकी एका डिपीकडे सुरक्षित असतात. पण क्रीप्टोचं तसं नाहीये. इथे तुम्हालाच ते सुरक्षित ठेवावे लागतात कारण सोनं, पैशाप्रमाणेच हि सुद्धा एक संपत्ती आहे त्यामुळे तिचीही चोरी होऊ शकते व होतेही. तसंच क्रीप्टोकरन्सीचा माग काढला जाऊ शकत नाही म्हणून तुमच्या चोरीची उकल होणे जवळ जवळ अशक्य असते. मग जर तुमचा कॉम्युटर सुरक्षित असेल तर तुम्ही बिटकॉइन त्यामध्ये सुरक्षित ठेवू शकता पण बिटकॉइन ठेवण्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे हार्डवेअर वॉलेट.

लेझर , ट्रेझर, डिसेंट अशा अनेक ब्रँडचे हार्डवेअर वॉलेट बाजारात उपलब्ध आहेत.         

भारतात बिटकॉइन वर बंदी येऊ शकते का ? Will cryptocurrency be banned in india ?

अगदी थेट शब्दांत हो किंवा नाही सांगायचं तर हो नक्कीच बंदी येऊ शकते. नुकतंच क्रीप्टोकरन्सी संदर्भातील बिलाचा मसुदा केंद्र सरकारने बनवला असून लवकरच तो सादर होईल. पण नक्की काय आणि कसं असेल येणारा काळच हे स्पष्ट करू शकेल. सरकारने अगदीच बंदी घालायची ठरवली तर आणि क्रीप्टोकरन्सी बाळगणेच जर बेकायदेशीर ठरवलं तर मात्र आताच्या गुंतवणूकदारांना ते विकण्याखेरीज पर्याय नसेल पण अशा वेळी मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते आणि मग  किंमतीवर त्याचा परिणाम होणारच. अशा वेळेस सध्याच्या गुंतवणूकदारांना त्याची विक्री करू देण्याचा पर्याय सरकार देईल असं मानायला हरकत नाही. या खेरीज सरकार स्वतःची क्रीप्टोकरन्सी ( डिजिटल रुपया ) आणणार आहे ते वेगळं.

जगात किती क्रीप्टोकरन्सी आहेत आणि कोणत्या आघाडीच्या समजल्या जातात ? (types of cryptocurrency)

किती क्रीप्टोकरन्सी ? याचं आताचं उत्तर मी इथे लिहून तुम्ही वाचेपर्यंत शेकडो नवीन क्रीप्टोकरन्सी आल्या असतील आणि काही बंदही झालेल्या असतील. पण जानेवारी 2021 च्या आकडेवारीनुसार जगातील एकूण क्रीप्टोकरन्सीची संख्या होती सुमारे 4000 . महिन्या दर महिन्यास अनेक क्रीप्टोकरन्सी नव्याने येतात आणि बंदही होतात. 

क्रीप्टोकरन्सीच्या किंमतीही ( Cryptocurrency Prices )

यामध्ये अनेक क्रीप्टोकरन्सीच्या किंमतीही ( Cryptocurrency Prices ) अगदी शुल्लक वाटाव्या इतक्या आहेत. म्हणजे म्हटलं तर यांच्या किंमतीही उद्या बिटकॉइन ( Bitcoin ) प्रमाणे वधूही शकतात किंवा या करन्सी अगदी नामशेष सुद्धा होऊ शकतात या दोन्ही शक्यता विचारात घ्यायला हव्यात.

तरीही आजच्या संदर्भानुसार बिटकॉइननंतर खालील क्रीप्टोकरन्सी आघाडीच्या समजल्या जातात.

एदेरीअम  (Ethereum )
लाईटकॉइन ( Litecoin )
कार्दानो  ( Cardano )
स्टेलर  ( Stellar )
बिनान्स  ( Binance )
डॉग कॉइन ( DogeCoin )
रिपल ( XRP

क्रीप्टोकरन्सीमध्ये  गुंतवणुक करावी का ? ( Investment in Crypto ? )

या प्रकाराची तुलना अगदीच शेअर मार्केट सोबत करता येणार नाही. कारण तिथे नाही म्हटलं तरी कंपन्यांची कुंडली ( विविध आकडेवारी ) आपण हवं तेव्हा पाहू शकतो. याशिवाय सेबीसारखी नियमन करणारी संस्था तिथे आहे. क्रीप्टोकरन्सीबाबत तसं आजतरी म्हणता येणार नाही. म्हणून हा निर्णय म्हणा किंवा जोखीम म्हणा, ती गुंतवणूकदारांनी स्वतः घ्यायचेय. गेल्या 5 – 6 वर्षांत अनेकांनी यात कोट्यावधी रुपये कमावले आहेत आणि तसेच अनेकांनी घालवले सुद्धा आहेत.त्याच बरोबर सरकारचे निर्णय असो किंवा वाढणारी / घसरणारी किंमत असो. यातून होणारा फायदा-नुकसान फक्त तुमचा असणार आहे त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय पण तुमचा स्वतःचा  राहील.

सध्या WazirX वगैरे सारखे अनेक क्रीप्टो एक्स्चेंजेस आहेत जिथे त्याकरिता खाते उघडणं सद्या मोफत आहे. त्यातून आपण आपल्या भारतीय चलनाद्वारे क्रीप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करू शकतो. 

बरं जाता जाता ..

जसं एक रुपयात 100 पैसे असतात तसंच एका बिटकॉइनमध्ये असतात १० कोटी “सातोशी’..

म्हणजे बिटकॉइन घेताना तो एक किंवा त्या पटीत घ्यावा लागतो असं काही नाही ( सध्या आपल्या सारख्यांना ते शक्यही नाहीये ) तुम्ही अगदी किमान रक्कमेत “सातोशी” घेऊ शकता.

मित्रांनो या लेखाद्वारे क्रीप्टोकरन्सी म्हणजेच बिटकॉइनबद्दल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.  माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा.    

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *