What is NFTNFT Explained
What is NFT
NFT Explained

एखाद्याने त्याचे डिजिटल पेंटिंग एनएफटी मार्केटप्लेसवर (NFT MarketPlace ) कोट्यावधींना विकलं. कुणी आपलं व्हर्च्युअल गेम मोठ्या रकमेवर विकलं. तर कुणी आपलं दहा -बारा वर्षा पूर्वीचं ट्वीट विकून भलीमोठी कोट्यावधीची रक्कम मिळवली. असं काय-काय ऐकायला वाचायला हल्ली मिळतं ? मग तुमच्या आमच्या सारख्या आजच्या हायब्रीड टेक्नो जगाच्या अध्यात न मध्यात नसणाऱ्या सर्वसामान्यांना प्रश्न पडतो कि हा एनएफटी म्हणजे नक्की प्रकार आहे ? ( What is NFT )

गम्मत काय आहे पहा, आपल्याकडे एका भल्या मोठ्या संख्येने असलेल्या सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या अवस्थेत वर्षानुवर्षे फारसा फरक पडलेला दिसत नसताना तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र दर आठवड्याला काहीतरी नवीन येऊन समोर उभं ठाकत असतं. बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सी हे प्रकार अजूनही लोक डोकं फोडून कसे तरी समजून घेत असताना आता हे एनएफटी आणि एनएफटी मार्केट प्लेस यांनी येऊन बिचाऱ्या आपल्या लोकांच्या डोक्यात आधीच झालेला गोंधळ आता केमिकल लोच्या मध्ये बदलण्याचा चंग बांधलेला दिसतोय.

पण फिकर नॉट, आम्ही आहोत.. या संकल्पना थोडक्यात आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा आज प्रयत्न करणार आहोत.

एनएफटी म्हणजे नक्की काय ? ( What is NFT in Marathi )

एनएफटी म्हणजे नॉन फन्जीबल टोकन (Non-fungible token), आता इथे टोकन का ? तर त्याकडे येऊच पण आधी संकल्पना समजून घेऊया. समजा तुम्ही एका दुकानातून काहीतरी खरेदी करताना तुमच्या कडील शंभराची नोट न देता एका दुसऱ्या कागदावर रु.100 असे लिहून आणि त्यावर तुमची सही करून दुकानदारास दिलीत तर काय होईल ? शक्यता आहे कि सर्वात आधी दुकानदार काहीक्षण तुमच्याकडे एकटक पाहत राहील आणि नंतर तुम्ही त्याची घेताय असं समजून तो दोन चार “भ” वर्गातील ठेवणीच्या शब्दातून तुमचे कौतुक वगैरे करेल. गंमतीचा भाग राहूदे पण सांगायचं काय तर खरी चलनी नोट सुद्धा कागदाची असते पण तिला बाजारात स्वीकारार्हता असते. का ? कारण त्यावर सरकारी निर्मितीची आणि मान्यतेची मोहोर उमटलेली असते.म्हणजे एखाद्या वस्तूची मग ते कागदही का असेना, त्याचं मूल्य सर्वमान्य असणे महत्वाचं असतं जे एनएफटी मध्ये डिजिटली होतंय.

आता थोडं पुढे जाऊन कल्पना करा कि तुमच्या मित्राने तुमच्या कडून रु.500 उसने घेतले आणि बरेच दिवस झाले पण त्याने तुमचे पैसे परत केलेलं नाहीत. मग न राहवून आधीच लॉकडाऊनची कडकी वगैरे मुळे म्हणा तुम्ही त्याला गाठता आणि म्हणता कि “मित्रा माझे पैसे परत कर” मित्र म्हणतो कि “अरे आता माझ्याकडे नाही आहेत” आणि वर तुम्हाला त्याचं पाकीट उघडूनही दाखवतो. पण तुम्हाला दिसतं कि त्या पाकिटात पाचशेची एक नोट आहे आणि तुम्ही त्याला तसं सांगता कि अरे “हि पाचशेची नोट आहे ती मला देऊन टाक”. तेव्हा मित्र म्हणतो कि “अरे बाबा हि नोट साधी सुधी नसून फारच मौल्यवान आहे जी मी तुला देऊ शकत नाही.” असं का ?” काय आहे त्या नोटेमध्ये इतकं ? तर तुमचा मित्र म्हणतो हि महाविद्यालयात असताना अमुक एका प्रसंगी फार मोठ्या नामांकित व्यक्तीकडून भेट स्वरूप मिळाली आहे आणि त्या व्यक्तीने या नोटेवर स्वाक्षरी देखील केलेली आहे. आणि त्यामुळे या नोटेचे मूल्य माझ्यासाठी फार आहे.

NFT : Uniquness defines Value : वेगळेपणात दडलंय मूल्य.

आता वर सांगितलेल्या प्रसंगातून तुमच्या काय लक्षात येतंय ? म्हणजे तुम्ही मित्राला दिलेली नोटसुद्धा पाचशेची आणि मित्राच्या पाकिटात असलेली सुद्धा पाचशेचीच, म्हणजे एकाच मूल्याच्या दोन चलनी नोटा पण त्यातील एका नोटेचं मूल्य तुमच्या लेखी जास्त. असं का ? कारण इतर समान मूल्यांच्या नोटांपेक्षा ती आता वेगळी ठरलेय त्यावर असलेल्या त्या महनीय व्यक्तीच्या स्वाक्षरीमुळे. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या त्या नोटेचं मूल्य समान पण अंगीभूत प्राप्त झालेल्या महत्वामुळे मात्र आता ते वधारलंय. तर मित्रांनो नेमकी हीच संकल्पना एनएफटी मध्ये आहे. तुमच्या जवळ असलेली एखादी वस्तू , तुमच्या अंगी असलेली कला आणि त्यातून निर्मिलेली एखादी कलाकृती असं काहीही ज्याची तुम्ही विक्री करू पाहता कारण तुमच्या मते ती वस्तू , कलाकृती एकमेवाद्वितीय असते, युनिक असते आणि त्यामुळे त्याचं तुमच्या मते काहीएक मूल्य असतं किंबहुना तुम्ही ते तसं ठरवता आणि ती वस्तू किंवा कलाकृती खरेदी करणारा ते मान्य करतं. यालाच म्हणतात नॉन फंजीबल टोकन (Non Fungible Token )

अरेच्चा ! पण यात “टोकन” कुठून आलं ? असं नक्कीच वाटलं असेल तुम्हाला ? तर इथे येतो क्रिप्टोकरन्सीचा ट्वीस्ट. या सर्व प्रकाराला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची फोडणी दिलेली आहे. आहे काय तर, या सर्व गोष्टी गोष्टी अशा विकण्याचं – खरेदी करण्याचं व्यासपीठ डिजिटल आहे. म्हणजे इथे तुमची वस्तू किंवा कलाकृतीची ( NFT Art ) ओळख फक्त तेवढ्या पुरती न राहता ते एक क्रिप्टोटोकन अशी त्याची ओळख बनते अर्थात असं असलं तरी ते क्रिप्टोकरन्सी पेक्षा वेगळं आहे. म्हणजेच क्रिप्टोकरन्सी हे फन्जीबल तर हे मात्र नॉन फन्जीबल वर्गात येतं. म्हणजे या मालमत्ता डिजिटल स्वरुपात आणून त्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी जोडल्या जातात.

फंजीबल आणि नॉन फंजिबल ( NFT Explained )

फंजीबल म्हणजे आपापसात बदलता येऊ शकणारे व त्याची विभागणी केली जाऊ शकते असे. म्हणजे समजा शंभराची एक नोट जी व्यवहारात वापरली जाऊ शकते किंवा ती नोट दहाच्या दहा नोटांमध्ये किंवा 50 दोन नोटांमध्ये विभागली जाऊ शकते पण नॉन-फंजिबल  याच्या अगदी उलट असतं. अशी गोष्ट जी आपापसात बदलता येणार नाही किंवा जीची विभागणी करता येणार नाही. उदाहरणार्थ, समजा एखादं चित्र आहे जे त्याच्या वैशिष्ट्यांमुळे युनिक आहे आणि त्याचे स्वामित्व कोणाकडे तरी असल्यामुळे त्याचे हक्क त्या व्यक्तीकडे सुरक्षित असतात ज्यामुळे त्याची कॉपी करता येणार नाही आणि समजा केली तरी ती अस्सल मानली जाणार नाही कारण प्रत्येक एनएफटी सोबत एक विशिष्ट माहिती जोडली गेलेली असते ज्यात कुणी त्या एनएफटीची कोणाला विक्री केली, आता तिचा मालक कोण आहे, कोण आहे मुळ निर्माता आहे या सगळ्याची वेळोवेळी नोंद होत असते आणि वेळोवेळी प्रत्येक व्यवहारागणिक हि माहीती अद्ययावत होत असतो. आणि यामुळेच खरतर या मालमत्तांच्या बनावटीकरणास मर्यादा येतात.

म्हणजेच लक्षात ठेवण्याजोगी साधी सोपी गोष्ट काय तर,

एनएफटी ही एक डिजिटल मालमत्ता आहे. जीच्या प्रत्येक व्यवहारादरम्यान उमटणारी डिजिटल स्वाक्षरी सदर मालमत्ताचे स्वामीत्व निर्धारित करते.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित. ( Blockchain Technology )

एनएफटी हे ब्लॉकचेन ( Ethereum ) तंत्रज्ञानाधारित आहे आणि त्याच्या सहाय्याने ते डिजिटली प्रमाणित केले जात असते त्यामुळे प्रत्येक कलाकृती किंवा वस्तू तिची स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख स्थापित झालेली असते. आणि यामुळेच म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी जोडले गेल्यामुळे त्यातील एक प्रकारे कॉपीराइट स्वामित्व हक्काचा मुद्दा बऱ्याच अंशी सोपा झालेला आहे.

What is NFT MarketPlace in Marathi : एनएफटी मार्केट प्लेस

इतर कोणत्याही बाजारपेठे प्रमाणेच या एनएफटीच्या खरेदीचे व्यासपीठ म्हणजे एनएफटी मार्केट प्लेस (NFT MarketPlace) अनेक देशांत क्रिप्टोएक्सेंजेसनी (बायनॅन्स, Opensea, Rarible भारतात wazirx नुकतेच सुरु केलं आहे ) किंवा त्यांच्या सहाय्याने असे एनएफटी मार्केट प्लेसेस उभारल्या आहेत. एनएफटी प्रत्येक व्यवहारामध्ये त्या एनएफटीच्या मूळ निर्मात्याला त्या व्यवहाराच्या रकमेच्या काही रक्कम मिळत असते. म्हणजे जसं ट्वीटरचे संस्थापक जॅक डोरसे यांनी आपलं पाहिलं वाहिलं ट्वीट ( आणि अर्थातच ट्वीटरचं सुद्धा ) एनएफटी करून 2.9 मिलियन डॉलर्सना ( सुमारे २२ कोटी रुपये ) विकलं. पण गोष्ट इथेच संपत नाहीये, ज्या कुणी हे ट्वीट आता विकत घेतलंय त्याने ते नंतर इतर कुणास विकलं तर त्यावेळच्या व्यवहाराच्या रकमेच्या काही हिस्सा जॅकला मूळ निर्माता ( Creator ) म्हणून मिळणार आणि इतकंच नाही तर पुढील प्रत्येक व्यवहाराच्या वेळी हिस्सेदारी मिळतच राहणार.

हेच ते 2006 मधील ट्वीटरचे संस्थापक जॅक डोरसे याचं आज एनएफटी असलेलं पाहिलं ट्वीट

अर्थात यामधून मिळालेली रक्कम जॅक यांनी बिटकॉईनच्या माध्यमातून चॅरीटीसाठी दिली हे सुद्धा नमूद करावंच लागेल.

Is NFT a bubble ? एनएफटी हा एक फुगा आहे का ?

असो, तर येत्या काळामध्ये हे तंत्रज्ञान किती पुढे वाढेल किंवा येत्या काळात याला किती वाव आहे हे स्पष्ट होईलच कारण काहींच्या मते एनएफटी एक प्रकारचा फुगा आहे जो फुटू शकतो आणि तसंही या तंत्रज्ञानासंदर्भात कार्बन फुटप्रिंट्सचा गंभीर प्रश्न उभा राहत आहेच पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूस काहींच्या मते येणारं भविष्य एनएफटीचे असणार आहे ज्यामुळे अनेक उदयोन्मुख कलाकार, प्रतिभावान व्यक्तींनाआपापल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू कलाकृती या व्यासपीठद्वारे जगासमोर आणण्याची संधी मिळणार आहे.

यावर आमचं मत म्हणाल तर येत्या काळात एनएफटी हा एक फुगा ठरो वा न ठरो, पण येऊ घातलेल्या नवनवीन संकल्पना, माहिती, तंत्रज्ञान समजून घेण्यात कोणतंही नुकसान नक्कीच नाही कारण..

ज्ञानाचा फुगा कधीच फुटत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *