तुम्ही कधी स्वताला ‘पोस्ट-डेटेड चेक’ दिलाय ? तो सुद्धा काही वर्षे पुढील तारखेचा ?
आजच्या या लेखाची अशी सुरवात करण्यामागचं कारण म्हणजे आज आपण एका अशाच व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने आयुष्यातील संघर्षाच्या टप्प्यावर स्वतःला असाच पोस्ट डेटेड चेक दिला होता, तो सुद्धा दहा मिलियन म्हणजेच एक कोटी डॉलर्सचा.
हि गोष्ट आहे एका ख्यातनाम कलाकाराची जो आज हॉलीवूडमध्ये आघाडीचा अन् गुणी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. पण एक काळ होता जेव्हा तो केवळ एक धडपड्या कलाकार होता. जो एका अशा संधीच्या शोधात होता ज्याद्वारे तो स्वतःला सिद्ध करू शकेल. त्या तरुणाचे स्वप्न होते उत्तम कॉमेडियन आणि अभिनेता होण्याचे. अनेक अडथळे आणि संघर्ष नशिबी येऊनही त्याने आपले स्वप्न कधीच सोडले नाही.
त्याच्या उमेदवारीच्या काळात अशाच एके दिवशी, काहीतरी अचानक मनात आल्यासारखं त्याने आपल्या बँक खात्याचा चेकबुक शोधला, जवळच असलेलं पेन हाती घेतलं आणि त्याक्षणी त्याने स्वतःच्या नावे $10 दशलक्ष म्हणजेच एक कोटी डॉलर्सचा चेक लिहिला, पण त्या चेकवर त्याने लिहिलेली तारीख होती पुढील पाच वर्षांनंतरची.
बरं पण हा चेक कशासाठी ? कोणत्या कारणासाठी ? तर त्यासाठी त्याने मेमो लाइनमध्ये लिहिलं,
“अभिनय सेवा प्रदान केल्याबद्दल”
आता त्याने हा चेक स्वतःच्या पाकिटात ठेवून दिला आणि त्यानंतर तो जिथे-जिथे गेला तिथे तो चेक त्याने सोबत ठेवला.
वर्षे उलटून गेली, छोटं मोठं काम मिळत होतं पण त्याला अजूनही हवे ‘ते’ यश मिळत नव्हते. अशा काळात नकारात्मकता तुमच्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करते.पण स्वतःवर विश्वास असणाऱ्या त्या जातिवंत कलाकाराने स्वतःला कधीच नाउमेद होऊ दिले नाही. त्याने संधींचा शोध घेणे, भूमिकांसाठी ऑडिशन देणे हे सुरूच ठेवले.कारण कलाक्षेत्रावर अन् आपल्या कलागुणांवर त्याला पूर्णपणे विश्वास होता.
काळ पुढे सरकत होता. चेकवरील तारीख जवळ येऊ लागली होती. म्हणजे जवळपास पाच वर्षाचा काळ पूर्ण होता आला होता. पण संघर्ष अजूनही सुरूच होता.
अखेर अशाच एके दिवशी ऑडिशन दिलेल्या एका निर्मिती संस्थेकडून त्याला बोलावणे आले. संस्थेकडून त्याची चित्रपटासाठी निवड केली गेली होती. मानधन म्हणून त्याला चेक देण्यात आला. त्या चेकवर लिहिलेली मानधनपर लिहिलेली रक्कम होती..
’10 मिलियन डॉलर्स’
त्या कलाकाराने स्वताच्या नावे लिहिलेला तो धनादेश अर्थात चेक हा तुमच्या-आमच्यासाठी म्हणजेच उर्वरित जगासाठी असेल. पण त्याच्या स्वतःसाठी मात्र तो फक्त चेक नसून स्वताची कौशल्य, कलागुणांवर असलेला विश्वास आणि ते सिद्ध करण्यासाठी स्वतःला दिलेली कालमर्यादा होती.
अर्थात वरील घटना आपण जुळून आलेला एखादा योगायोग म्हणू शकतो किंवा मग काहींना अगदी आजच्या काळाच्या विचारसरणीनुसार ‘लॉ ऑफ एट्रॅक्शन’ सुद्धा वाटू शकेल. पण तरीही त्या कलाकाराची आपल्या कामाप्रती असलेली ‘समर्पित वृत्ती’ नक्कीच नाकारता येणार नाही.
समजा, पाच वर्षांचा तो काळ सरून जरी गेला असता तरीही त्याने यश मिळवलेच असते हि बाबही मान्य करावीच लागेल.
तो चेक त्याच्यासाठी एक ‘रिमायंडर’ होता त्याला रोज त्याच्या ‘धेय्याची’ आठवण करून देणारा.
आणि हो, त्या कलाकाराचे नाव आहे ,
जिम कॅरे
Story of Jim Carrey who wrote himself a 10 million cheque in marathi