Dogecoin priceDogecoin price

पॅरोडी म्हणून सुरु झालेल्या या क्रिप्टोचलनाने घातलाय धुमाकूळ. Dogecoin Price zooms.

अर्थात डॉहज् ( हो नावात श्वान म्हणजे डॉग असला तरी या चलनाच्या निर्माता / संस्थापकाच्या नुसार असाच उच्चार आहे त्याचा ) या क्रिप्टोचलनाने सध्या धुमाकूळ घातलाय. (Dogecoin Price zooms) बिली मार्कुस आणि जॅक्सन पामर या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी 2013 मध्ये बिटकॉइनची खिल्ली उडवताना सहज एक खट्याळपणा म्हणून सुरु केलेलं हे क्रिप्टोचलन आणि पुढे त्याला असं व्यापक  स्वरूप येईल याची कदाचित त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या आभासी कॉइनवर असलेल्या कुत्र्याची छबी अमेरिकेत 2000 च्या दशकात लोकप्रिय असलेली एनिमेटेड कॉमेडी वेबसिरीज होमस्टार रनरवरून प्रेरित आहे.
तर असं काय खास आहे या क्रिप्टोचलनामध्ये कि एलन मस्क, मार्क क्युबन , बीफ जर्की वगैरे सारख्या ख्यातनाम व्यक्तीही त्याचे फॅन झालेत. वेगळं असं काही नाही, इतर क्रिप्टोचलनाप्रमाणे डॉहज् सुद्धा विकेंद्रित , पिअर टू पिअर प्रणालीने व्यवहार होणारा ओपन सोर्स क्रिप्टोचलन आहे.
आणि त्याचे आता या क्षणीचे ( “आजचे” असे लिहिणे अगदीच जुनाट असेल ) बाजारमूल्य आहे 87.29 बिलिअन डॉलर्स आणि जवळपास 7 -8 वर्षांपूर्वी 2013 मध्ये सुरु झालेल्या या चलनाने 2021 मध्ये आत्तापर्यंत जवळपास 11000 % नी उसळी घेतलेय. इतकंच काय तर आजच्या दिवशी हा लेख लिहित असताना आज आतापर्यंत डॉहज् 63.49% नी वाढलाय. गेले काही दिवस तो वाढतच चाललाय. अगदी आणखी सोपं करून सांगायचं तर या जानेवारीत आपल्या भारतीय चलनाच्या हिशेबाने ( Dogecoin Price in INR ) अगदी पैशांमध्ये मिळणारा डॉहज् आज आता 58 रुपयांवर आला आहे. या वर्षीची हि वाढ किती मोठी हे आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर अमेरिकेतील एस एंड पी 500 या एक्स्चेंजने 1988 पासून लाभांशासाहित दिलेल्या परताव्याच्याही दुप्पट आहे.
View from WazirX Account
डोकं बधीर झालं नसेल तरच पुढे जाऊया…

पण सध्या या क्रिप्टोचलनाची इतकी चलती का ?

Elon musk dogecoin tweet : एलन मस्क आणि त्यांचं ट्वीट 

तर टेस्ला मॅन एलन मस्क तर याच्या अगदी प्रेमात बुडाल्यासारखा आहे. त्याचं झालं काय कि मस्क महाशयांनी जानेवारीमध्ये एक सूचक ट्वीट केलं, ते म्हणजे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणेच. काय होतं त्या ट्वीट मध्ये ? तर Dogue असं श्वानाच्या नावाचे आणि त्याचेच छायाचित्र असेलेल्या एका फ्रेंच मॅगझिनचे मुखपृष्ठ. झालं, आधीच क्रिप्टोबद्दल बऱ्यापैकी सलगी दाखवलेल्या या असामीकडून या चलनासाठी असा काहीसा संकेतच मिळाल्यासारखं झालं आणि व्हायचा तो परिणाम होऊ लागला. मस्क महाशयांनी सुद्धा आपला हे ट्वीटव्रत सुरूच ठेवलं. कधी “लायन किंग” तर कधी ‘हू लेट द डॉग शाउट” तर अगदी “No highs, no lows, only Doge.” असंही. कडी तर तेव्हा झाली जेव्हा मस्क महाशय “D for DogeCoin” असं ट्वीटले.
Elon Must dogecoin
  From Twitter
आता एका बाजूनी मस्क याचं हे सुरु असताना इतरही ब्रँड यात उतरल्या नसत्या तरच नवल कोनाग्रा , स्नीकर्स यांनीही डॉहज्बद्दल सूचकपणे व्यक्त होण्यास सुरवात केली आणि अखेर काल ट्रॅव्हला डॉटकॉम या ब्लॉकचेन आधारित टूर कंपनीने पेमेंट म्हणून DogeCoin स्वीकारणार असल्याची घोषणा केली मग आधी  मस्क आणि आता हे अशी पडत्या फळाची आज्ञा समजून गुंतवणूकदारांनी उड्या मारल्या नसत्या तरच नवल. अन् मग या चलनाने आजचा टप्पा हा गाठला.
Elon Musk DogeCoin
From Twitter
अगदी मस्करीत सुरु होणारी एखादी गोष्ट आज इतक्या वरच्या मूल्याला जातेय हे जितकं आश्चर्यचकित करणारं तितकंच काहीसं चिंता वाढवणारं सुद्धा. कारण सर्वसामान्यांची यातील गुंतवणूक वाढायला हे असं निर्माण झालेलं ( किंवा केलं गेलेलं ) वातावरणच कारणीभूत असतं. त्यामुळे उद्या याच वेगाने हे चलन खाली घसरलं तर त्यातही धक्का वगैरे काहीही नसेल.कारण क्रिप्टोचे ट्रेडिंग व्यवहार लक्षात घेता तो परत तितकाच खाली कोसळू सुद्धा शकतो हे सुद्धा अगदी शक्य.
बरं हे मस्करीत सुरु झालेलं म्हणून त्याला मिळालेलं हा प्रतिसाद अगदी अळवावरचं पाणी ठरेल या विचारांनी असेल कदाचित म्हणून या चलनाच्या निर्मात्यानीही म्हणजे मार्कुसने  त्याच्या जवळील सर्व डॉहज् कॉइन्स 2015 मध्येच विकून एक सेकण्डहँड होंडा सिविक घेतली होती असं म्हटलंय.

बाकी खरं खोटं त्यांनाच माहित. आम्हाला फक्त सध्याच्या या हॉट टॉपिकबद्दल तुम्हाला माहिती द्यावीशी वाटली म्हणून आपला हा प्रपंच.

(BitCoin, DogeCoin सह इतर क्रिप्टोचलनांची आकडेवारी, त्यांच्या किंमतीत होणारे चढउतार आपण आमच्या वेबसाईट मधील बाजारनजर विभागात पाहू शकता)  
लेख आवडला असेल तर शेअर कराच.
धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *