cocacola

त्याची ती उस्फुर्त कृती आणि कंपनीला 29 हजार कोटींचा फटका.
Coca Cola lost USD 4 billion after Cristiano Ronaldo act

कोरोना संकट भारतात अजूनही ठाण मांडून असलं तरी जगात बहुतांश ठिकाणी परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आहे. युरोपात तर वातावरण जवळपास सर्वसामान्य पातळीवर आल्यासारखी परीस्थिती आहे आणि त्यामुळे आता तिथे युरो कपचा उत्साह फुटबॉल प्रेमींमध्ये ओसंडून वाहताना दिसतोय.
 
तर अशा या वातावरणात एक लक्षवेधी घटना घडलेय, ती म्हणजे एका लोकप्रिय क्रीडा व्यक्तिमत्वाकडून झालेली एक उस्फुर्त कृती आणि त्यामुळे संबंधित कंपनीला पडलेला भला मोठा आर्थिक फटका.
हि व्यक्ती आहे ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), आता या व्यक्तीची खरंतर औपचारिक ओळख करू द्यायची गरज नाहीये पण तरीही क्रिकेटप्रेमी भारतात फुटबॉलचा संदर्भ असणारं काही आम्ही सांगतोय तेव्हा थोडं स्पष्ट करून सांगायला हवं. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय फुटबॉलपटू असं सांगितलं तरी (मेस्सी , नेयमार यांच्या चाहत्यांची माफी मागून ) चालेल.पोर्तुगालच्या या गुणी खेळाडूचा चाहता वर्ग अफाट आहे. त्याच्या सौजन्यशील वागण्याबाबत, जपलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल अनेक वेळेला वाचायला ऐकायला मिळतं. पण नुकतीच घडलेली घटना काहीशी वेगळी आहे.

असं काय घडलं?

तर या स्पर्धेत काल पार पडलेल्या हंगेरी आणि पोर्तुगालच्या सामन्या दरम्यानच्या पत्रकार परिषदेत रोनाल्डो आपल्या जागी येऊन बसल्यानंतर त्याचं लक्ष समोर ठेवलेल्या कोका-कोलाच्या बाटल्यांकडे ( शब्द आवडला नसेल तर “बॉटल्स” असं वाचू शकता ) गेलं. या पठ्ठ्याने त्याकडे “हे काय ठेवलंय इथे ? ” असा एक दृष्टीक्षेप टाकून त्या दोन्ही बाटल्या उचलून दूर तिकडे बाजूला ठेवल्या आणि तिथेच ठेवलेली पाण्याची बाटली उचलून समोरील सर्वांना “हे प्या ” असं सांगितलं.

Water only for Cristiano Ronaldo ⛔

(via @EURO2020) pic.twitter.com/XZBDoDnIZJ

— B/R Football (@brfootball) June 15, 2021

आता या घटनेमुळे झालं काय तर तिकडे कोका-कोलाच्या ( Coca Cola ) शेअर्समध्ये याचे पडसाद उमटले. कोका-कोलाचा शेअर 56.10 डॉलर्सवरून 1.6 % नी घसरून 55.20 डॉलर्सपर्यंत आला आणि यामुळे कंपनीच्या बाजार मूल्यात तब्बल 4 बिलियन डॉलर्सचा खड्डा पडला.
 
Coca Cola loses $4 billion
Credit: TradingView
अर्थात कंपनीच्या एकूण बाजारमूल्याचा विचार करता हि घट अगदीच “दर्या मे खसखस ” असू शकते.पण यातून दोन बाबी अधोरेखित होतात.
 
पहिली,
 
एखाद्या व्यक्तिमत्वाचा जनमानसावर असलेला सकारात्मक प्रभाव आणि त्यामुळे होऊ शकणाऱ्या परिणामांची शक्यता कशाप्रकारे आर्थिक भीती निर्माण करू शकते.
 
आणि दुसरी ,
 
एक खेळाडू जो अगदी “हे मला आवडत नाही ” असं थेट सांगणारी सहज कृती जी जवळपास कोट्यावधी लोक पाहणार आहेत आणि यामुळे कदाचित त्याचे आर्थिक परिणाम संबंधित कंपनीला, गुंतवणूकदारांना अनुभवावे लागतील त्याचा याची कल्पना असूनही उस्फुर्तपणे करू शकला.
 
का?
 
तिथे असणारी कोका-कोलाची बाटली त्याने उचलून तोंडाला लावली असती तर काय झालं असतं ? बऱ्याच जणांना ते फारच “कुल” वगैरे दिसलं असतं आणि कदाचित आधीच प्रस्थापित असलेल्या या शीतपेयाच्या कंपनीला सुद्धा आपला हा “साखरेच्या पाण्याचा धंदा” यापुढेही सुखनैव चालणार असा “रास्त” समज नेहमीप्रमाणे आणखी दृढ झाला असता.
 
रोनाल्डोने फक्त “पाणी प्या” असे सुचवले. ज्यात चुकीचं असं काहीही नाही असेल तर आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर “चाहत्यांना वर्षानुवर्षे असलेला गैरसमज दूर करून एखादी चांगली सवय लावता येईल का पाहूया” असा विचार त्याने केला असेल तर त्यात वावगं काहीच नाही.
 
हो असलाच तर व्यावसायिक औधत्याचा मुद्दा वगैरे उपस्थित होऊ शकतो कारण कोका-कोला कंपनी हि या स्पर्धेच्या अनेक प्रायोजकांपैकी एक आहे. पण या घटनेवर भाष्य करताना कंपनीकडून प्रसूत केलेल्या निवेदनातही “पेयाबाबत प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या आवडी-निवडी असू शकतात कारण व्यक्तीपरत्वे प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात” असे सांगण्यात आले आहे.
 
आता आपल्याकडील सांगायचं तर शक्य होईल तेव्हा ऑनस्क्रीन – ऑफस्क्रीन भरपूर ज्ञान वाटणाऱ्या आपल्या इकडच्या सेलेब्रिटींबाबत असा काही विचारही नाही करू शकत.
 
तर जाता-जाता स्टीव्ह जॉब्जच्या आत्मचरित्रात सांगितलेला एक प्रसंग आठवतो ज्यात स्टीव्ह पेप्सिकोच्या तत्कालीन अध्यक्ष जॉन स्कलीचे आपल्या एपल कंपनीत येण्यासाठी त्याचे मन वळविण्याच्या प्रयत्नात असतो आणि स्कलीचा या सगळ्यास थंड प्रतिसाद पाहून स्टीव्ह अखेर त्याला एक थेट आणि तिखट प्रश्न विचारतो, तो म्हणजे..
 

“तुला तुझं उर्वरित आयुष्य साखरेचं पाणी विकण्यात घालवायचंय कि माझ्यासोबत येऊन जग बदलण्यासाठी काही करायचंय ? “

 
लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.
 
धन्यवाद,
 
– शशांक एच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *