नुकतंच एका भारतीय स्टार्टअप कंपनीचं नाव जगभरात गाजतंय. त्याच कारणही तसंच आहे. हि कंपनी अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर सूचीबद्ध झालेय. आता तुम्ही म्हणाल कि असं होणारी हि काही पहिली भारतीय कंपन नाही आहे. तर तेही खरंच, पण सूचीबद्ध होणारी पहिलीच SAAS म्हणजेच “सॉफ्टवेअर एज ए सर्व्हीस” आधारित सेवा पुरवठादार पहिलीच कंपनी आहे. या कंपनीचं नाव आहे फ्रेशवर्क्स ( Freshworks ) आणि कशी झाली या कंपनीची सुरवात (Freshworks Story in Marathi) हे आपण आज जाणून घेणार आहोत.
कशी झाली सुरवात ( How It all started ?)
वर्ष 2010 चेन्नईतील गिरीश मातृभूतम नामक एक तरुण आयटी सेवा क्षेत्रातील एका कंपनीत स्वताच्या अंगीभूत हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर उच्चस्थानावर कार्यरत आहे. चांगल्या पगाराची नोकरी आणि कुटुंब असे चौकटीतलं सुरक्षित आयुष्य जगात असतानाच गिरीशच्या मनात स्वतःचं काही सुरु करण्याचा विचार येतो. अर्थात हा विचार काही असाच येत नाही.
वर्ष २००१ मध्ये प्री-सेल्स इंजिनीअर म्हणून रुजू झालेला गिरीश आता 2010 मध्ये व्हाइस प्रेसिडेंट – प्राॅडक्ट मॅनेजमेंट पदापर्यंत पोहोचलाय. कामाच्या ठिकाणी स्वताची चांगली टीम, कॉर्पोरेट भाषेत म्हणतात तसं ‘जॉब सॅटिस्फॅक्शन’ वगैरे सगळं आहे.
बरं मग तेव्हा असं काय निम्मित्त झालं आणि आज आपल्याला फ्रेशवर्क्स या कंपनीबद्दल वाचायला – ऐकायला मिळतंय ?
तर त्या दरम्यान म्हणजे 2010 च्या मध्यावर कधीतरी असेल, गिरीशला हॅकर न्युज नामक संकेतस्थळावरील एका लेखात त्यांच्याच क्षेत्रातील एका अमेरिकन कंपनीने आपल्या सेवांच्या किंमतीत 60 ते ३०० % वाढ केल्याचं आणि त्यामुळे ग्राहकांच्यात नाराजी असल्याचं त्याला वाचायला मिळतं. बरं इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण गिरीशला सवय आहे लेखाखाली येणाऱ्या प्रतिक्रिया वाचायची, आणि या लेखाखाली आलेल्या एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेने त्याला विचारात पाडलं. ती प्रतिक्रिया स्वैर भाषांतर करून सांगायची तर काहीशी अशी
” या अशा बातम्यांचं मी स्वतः काही करू शकत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे कि, मार्केटमध्ये ( पक्षी : ग्राहकवर्ग ) फारच वाव आहे कि कुणीतरी यावं आणि हि कंपनी देत असलेल्या सेवा उत्तम प्रकारे आणि रास्त सेवा दरांत ग्राहकांना द्याव्यात.
ठरलं ! (Freshworks founded )
बस्स .. डोक्यात घंटी वाजायला हे पुरेसं होतं. आपण स्वतः याच क्षेत्रात कार्यरत आहोत. यातील कौशल्ये आदींमध्ये निपुण आहोत आणि तरीही आपण फक्त बघ्याच्या भूमिकेत आहोत. आता गिरीशने ठरवलं कि आपण SAAS म्हणजेच सोफ्टवेअर एज ए सर्व्हीस आधारित सेवा प्रकारातून हे करायचं.
अर्थात मनात आलंय आणि बेतही पक्का झालाय, पण पुढील काही आठवडे तणावाचे होते. नवीन काही करण्याची उर्मी, उत्सुकता एका बाजूला आणि भीतीही. कारण मुलं, त्यांचे पालनपोषण, शिक्षण, गृहकर्जाचा हफ्ता या गोष्टी दुसऱ्या बाजूला. सर्वसामान्य आणि पहिल्या पिढीत उद्योगाचे प्रयत्न करणाऱ्या माणसाची हीच तर चौकट असते. जी सुरक्षित तर असते पण मर्यादितही असते. यामुळे गिरीशने आपल्या मनातील हा विचार त्यावेळी बायकोलाही सांगितला नव्हता. पण आपला अभ्यास मात्र सुरु केला होता.
टीमची जुळवणी. ( Building a Team )
बरं क्षेत्रातील सगळा आभ्यास संशोधन बऱ्यापैकी कवेत आल्यानंतर पुढील गोष्ट होती ती म्हणजे, आपल्या सोबत कोण ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची. अर्थात आपली टीम बनविण्याची. आजच्या स्टार्टअप भाषेत सांगायचं तर सर्वात आधी को-फाउंडर म्हणजे सह-संस्थापक हि पहिली गरज होती. अशा वेळी आपला भाऊ किंवा जवळचा मित्र, सहकारी हा पर्याय पहिला असतो. तेच इथे झाले. गिरीशचा सहकारी, जुना मित्र आणि हुशार तंत्रज्ञ ज्याचं नाव शान कृष्णास्वामी याला गिरीशने विचारलं. त्यालाही कल्पना आवडली आणि लगेच तयार झाला. मग ऑक्टोबर 2010 मध्ये गिरीश आणि शान या दोघांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि एका नवीन पर्वाची सुरवात झाली.
पुढील काही आठवडे मात्र दिवसरात्र कामाचे होते. सुरवातीला त्यांनी सहा जणांची टीम बनवली, ज्यात तीन डेवलपर्स, एक यु-एक्स / यु-आय डिझायनर्स , एक क्वालिटी अश्योरंस (QA ) / कस्टमर सपोर्ट इंजिनीअर आणि स्वतः प्राॅडक्ट मॅनेजर ? मुख्य कार्यकारी अधिकारी असं स्वरूप ठेवलं. आणि हो , कंपनीचं नाव काय ? तर कंपनीचं नाव ठरलं
भारतीय कंपनी कि अमेरिकन ? ( Freshworks is an indian company or american ?)
कंपनीची स्थापना भारतात चेन्नईत जरी होत असली तरी कंपनीचा ग्राहक वर्ग मात्र अगदी जगभरात विखुरलेला असणार होता. त्यातही सेवा पुरविण्यासाठी अनुकूल यंत्रणा आदी बाबी अमरिकेत सहज उपलब्ध असणार होत्या. त्याच बरोबर त्या काळात भारतात रिकरिंग पेमेंट सेवा पुरवू शकणारी पेमेंट गेटवे सेवा प्रदानकर्ती कंपनी नव्हती आणि या सेवा सर्वोत्तमरित्या पुरवणाऱ्या कंपन्या अमेरिकन बँकांसोबत काम करायच्या. त्यामुळे अशा अनेक बाबीमुळे कंपनीची नोंदणी अमेरिकेत करायचं ठरलं.
त्यानंतर पुढे यथावकाश लोगो, वेबसाईट या सर्व बाबी अगदी प्रत्येकाचं बजेट ठरवून मार्गी लावल्या. सुरवातीचं कंपनीचं ऑफिस सुद्धा 160 डॉलर्स प्रतिमहिना भाड्याने पक्कं केलं.
व्यवसाय वाढू लागला. आता हि स्टार्टअप कंपनी एक ग्लोबल कंपनी म्हणून नावारूपास यायचं स्वप्न पाहू लागली. कंपनीत पहिली मोठी गुंतवणूक आणि पहिला ग्राहक ( एटवेल कॉलेज ) एकाच वर्षी म्हणजे २०११ मध्ये आले. पुढे २०१८ मध्ये कंपनीचे ब्रँडनेम बदलून फ्रेशवर्क्स ( Freshworks ) असे करण्यात आले. आणि त्या अंतर्गत कंपनीचे इतर सॉफ्टवेअर व्यवसाय ( Freshdesk, Freshservice, Freshsales आणि Freshcaller ) असतील असं ठरलं.
आयपीओ ( Freshworks IPO Listing )
फ्रेशवर्क्सने आता पंख विस्तारण्याचं ठरवलं आणि त्यातूनच नुकताच २०२१ मध्ये अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर सूचीबद्ध होण्यासाठी आयपीओ आणला ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर इश्यू किंमतीच्या म्हणजे $36 तुलनेत $43.50 खुला होऊन नंतर 32% नी वर जाऊन $47.55 वर पोहोचलाय. आणि कंपनीचे बाजार मूल्य आज १३ बिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांत ९५,८१७ कोटी रुपयांवर पोहोचलंय.
चेन्नईत सुरु झालेल्या एका भारतीय स्टार्टअप कंपनीची हि भरारी नक्कीच कौतुकास्पद आहे. पण त्याच बरोबर या कंपनीने आपल्या कर्मचारी आणि गुंतवणूकदारांनाही भरभरून दिलंय. म्हणजे अगदी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या गिरीश मातृभूतम यांच्याच भाषेत सांगायचं तर.
कंपनीने या आयपीओ लिस्टिंगद्वारे भारतातील आपल्या जवळपास पाचशे कर्मचाऱ्यांना कोट्याधीश बनवलंय ..
मित्रांनो लेख आवडला असेल तर इतरांना नक्कीच शेअर करा . आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.