inspirational stories in marathiinspirational stories in marathi

कष्टाचं फळ मिळतंच ! एक गैरसमज. अनेक ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ कष्टाचं महत्वं नेहमी सांगत असतात, अर्थात त्यात त्यांचं अर्थकारण आहे. कष्टाचं फळ मिळू शकतं हे खरंय, पण ते “मिळतंच” हे मात्र साफ खोटं.कष्ट महत्वाचेच यात दुमत नाही पण फक्त कष्टानेच फळ मिळतं असंही नाही. (inspirational stories in marathi)

अनेकांना पटणार नाही पण जोरावर असलेलं नशीब आणि योग्य वेळी घेतलेली जोखीम हे दोन घटक या आपल्या “कष्टाचं “फळ मिळवून देण्यात महत्वाचे असतात. यातील नशिबाचं महत्व समजून घेण्यासाठी बिल गेट्सबद्दल ‘पैशाचे मानसशास्त्र’ अर्थात ‘सायकोलॉजी ऑफ मनी’ या पुस्तकातील हा भाग वाचनीय आहे.

नक्की वाचा.

बिल गेट्स अशा शाळेत शिकला जी त्याकाळी संगणक असणारी जगातील एकमेव शाळा होती. या शाळेला हा संगणक मिळण्याची कथाही विलक्षण आहे. सिएटल शहराच्या उपनगरातील या शाळेचं नाव होतं ‘लेकसाइड स्कूल’ शाळेच्या 2005 सालच्या स्नेहसंमेलनात बिल म्हणाला,

जर लेकसाइड शाळा नसती तर आज मायक्रोसॉफ्ट नसते

लेकसाईड स्कूल

बिल डौगाल नावाचा एक दुसऱ्या महायुद्धातील यूएस नौदलाचा वैमानिक होता.तो नंतर या शाळेत गणित व शास्त्र हे विषय शिकवू लागला. मायक्रोसॉफ्टचा सहसंस्थापक पॉल एलन याने त्याच्या आठवणी सांगताना सांगितलंय, ‘नुसती पुस्तके वाचून शिक्षण होत नाही. त्याला प्रत्यक्ष अनुभवाची जोड द्यावी लागते.

असं बिल डौगालचे ठाम मत होते.’ त्यांचं हेही म्हणणं होतं, की कॉलेजमध्ये जाण्याआधी संगणक जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे 1968 साली डौगालने लेकसाइड स्कूल मदर्स क्लबला एक आवाहन केले. तो क्लब शाळेत विसरलेल्या वस्तूंचा आणि परत न नेलेल्या वस्तूंचा दरवर्षी लिलाव करत असे.

लिलावातून त्या वर्षी त्यांना जवळजवळ 3000 डॉलर मिळाले होते. त्यावेळी डौगालने त्यांना सुचवलं की ते पैसे त्यांनी एक टेलिटाइप – 30 प्रकारचा संगणक भाड्याने घेण्यासाठी शाळेला द्यावेत. हा संगणक मग ते जनरल इलेक्ट्रिकच्या मेनफ्रेम संगणकाला जोडणार होते.

या मोठ्या संगणकाचा वेळ या प्रकारे बरेच जण वाटून घेणार होते. बिल गेट्स नंतर म्हणाला, “1965 साली हा संगणक सामयिकीरणाचा शोध नुकताच लागला होता. याचाच अर्थ कोणीतरी भविष्याचा वेध घेणारी, आधुनिक विचारांची व्यक्ती त्या शाळेला लाभली होती.

त्या काळात जो संगणक बिल गेट्सला आठवीत वापरायला मिळाला त्याप्रकारचा संगणक त्यावेळी त्या कॉलेजमध्येच काय तर अगदी, कित्येक विद्यापीठांतही किंवा त्यांच्या आसपासही नव्हता. अर्थात, त्याला पाहिजे तितका वेळ तो वापरण्यास मिळत नव्हता हे हि खरं आहे,पण आयुष्याला दिशा देणारी घटना होती ती.

1968 साली बिल गेट्स 13 वर्षांचा होता तेव्हा त्याला एक मित्र भेटला. त्याचे नाव पॉल एलन. पॉललाही संगणकाचे वेड होते, बास इतकं पुरेसं होतं.त्या दोघांची चांगली जोडी जमली. लेकसाइडच्या शाळेतील संगणक हा काही अभ्यासक्रमाचा भाग नव्हता.बिल आणि पॉल फावल्या वेळात संगणकाशी खेळत बसायचे आणि आपल्या सर्जनशीलतेला वाट करून द्यायचे. शाळा संपल्यावर, रात्री उशिरापर्यंत, शनिवारी रविवारी, सुट्टीच्या दिवशी या संगणकावर काम करून करून त्यांनी लवकरच त्यात चांगलेच प्रावीण्य मिळवले. असेच एकदा ते रात्री संगणकासमोर बसलेले असताना बिल गेट्सच्या हातात ‘फॉर्च्यून 500’ हे मासिक होते.

बिल गेट्स पॉलला म्हणाला, “एखादी फॉर्म्युन 500 कंपनीचा कारभार हाकण्यास कसं वाटत असेल रे?”

“मला कल्पना नाही.’ एलनने उत्तर दिले,

“केव्हातरी आपलीही एक संगणक कंपनी असेल…” बिल म्हणाला.

आज मायक्रोसॉफ्टचे मूल्य जवळपास 2 ट्रिलियन डॉलर्स आहे.

आता खरी गंमत सांगतो..

राष्ट्रसंघाच्या आकडेवारीप्रमाणे 1968 साली जगात 303 दशलक्ष शालेय वयीन मुले होती.

ज्यातील 18 दशलक्ष अमेरिकेत राहात होती.

ज्यातील 270,000 मुले वॉशिंग्टन राज्यात होती.

ज्यातील 1 लाख मुले सिॲटलच्या भागात राहात होती.

आणि ज्यातील फक्त 300 मुले लेकसाइड शाळेत होती.

300 दशलक्ष मुलांसह आपण सुरुवात केली आणि अखेर तीनशे मुलांपर्यंत आलो. त्याकाळी लाखात एखाद दुसराच विद्यार्थी अशा हायस्कूलमध्ये शिकत होता, ज्या शाळेकडे संगणक भाड्याने घेण्यासाठी पैसे आणि इच्छा दोन्ही होते. त्यातील एक मुलगा होता बिल गेट्स. म्हणूनच त्याच शाळेच्या 2005 या वर्षी स्नेहसंमेलनात तो विद्यार्थ्यांसमोर म्हणाला, “जर लेकसाइड शाळा नसती तर आज मायक्रोसॉफ्ट नसते.”

बिल गेट्स हा एक बुद्धिमान, व्यवहारी, कष्टाळू माणूस आहे यात शंकाच नाही. शिवाय त्याला लहानपणीच संगणकाच्या शक्तीचा व उपयुक्ततेचा जेवढा अंदाज आला तेवढा मोठमोठ्या उद्योजकांनाही आला नव्हता.पण विचार करा जर तो त्या लेकसाइड शाळेत गेलाच नसता तर.. ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *