( share market in marathi ) एखाद्या कंपनीचा शेअर इतक्या पटीत वाढला, त्यातील अमुक-तमुक गुंतवणूक आता इतकी झाली असती.

दुसऱ्या  एका कंपनीची अवघ्या काही महिन्यात अशी वाताहत झाली, गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. शेअर डी-लिस्ट झाला.

अशा अनेक बातम्या तुम्ही पाहता,वाचता. यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते ?

पहिल्या वर्गातील कंपन्यांच्या बाबतीत “अरे वा.. पण हा अमुक शेअरवर जाणार होता हे आपल्याला  स्वप्नं थोडंच पडलं होतं ? खरच कुणी केली असेल का इतकी गुंतवणूक ? बरं केली तर केली, पण कुणी अजूनही ठेवली असेल का ? 

दुसऱ्या वर्गातील कंपन्यांबाबत ” बरं झालं आपली गुंतवणूक नाही या कंपनीत .किंवा ज्यांची गुंतवणूक असेल ते “हे असं काही होईल हे आपल्याला  स्वप्नं थोडंच पडलं होतं ? “

मुळात या वरील बातम्यांच्या बाबतीत आपण फारच चौकटीत विचार करतो.तुम्ही शेअर मार्केट नावाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं असेल तर इथे पावलो पावली ज्ञान विखुरलेलं आहे जे वेचायची इच्छाशक्ती तुमच्यात हवी.इथे अनुभव मिळण्याची वारंवारता जास्त असते.म्हणजे अगदी सोप्याभाषेत सांगायचं तर जेव्हा अशा कंपन्या आणि त्यांच्या संदर्भात अशा बातम्या तुम्हा समोर येतात तेव्हा यांच्याकडे फक्त बातमी नाही तर केस स्टडीज म्हणून पाहायला शिका.

म्हणजे अमुक एखाद्या कंपनीच्या समभागांनी काही महिन्यात चौपट परतावा दिला किंवा एखादी कंपनीचं दिवाळं निघालं, तर असं काय झालं कि एका कंपनीचं उखळ इतकं पांढरं झालं ? आणि दुसरी भिकेला लागली ?  काय कारणे असू शकतात याची ? यावर कधी तुम्ही अभ्यास केलाय का ? म्हणजे त्या – त्या कंपनीबद्दल  एखाद्या ब्रोकिंग हाउस किंवा विश्लेषकांनी त्यादरम्यान खरेदी किंवा विक्री शिफारस  केली होती का ? तसं असेल तर कोणते मुद्दे , बाजू त्यावेळी त्यांनी विचारात घेतल्या असतील. त्या क्षेत्राबाबतच सरकारी धोरण काही विशेष होतं का ? मग तसं असेल तर त्या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या बाबतीत असं का नाही झालं ? हे सगळ्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करा. मागील आकडेवारी तपासा. 

मल्टीबॅगर शेअर्स तुम्हा गुगलवर शोधून मिळणार नाहीत.तुम्ही श्रीमंत व्हावेत म्हणून कोणी रिसर्च करून कंपन्या सुचवायला बसलेलं नसतं.इथे ते आपलं आपल्यालाच करायचं असतं आणि तेच फायद्याचं आहे. चांगली-वाईट कामगिरी करणारे शेअर्स इथेच तुमच्यासमोर आहेत, ते ओळखण्याची दिव्यदृष्टी तुम्हाला इथल्या अभ्यासाचं व्यसन लागल्यावरच प्राप्त होऊ शकते.

विप्रो, इन्फोसिस, आयशर मोटर्स, पेज इंडस्ट्रीज इथलेच आणि आरकॉम , जेट एअरवेज, आर पॉवर, डीएचएफएल सुद्धा इथलेच. त्यामुळे जेव्हा-जेव्हा एखाद्या कंपनीची यशोगाथा, अनेक पटीत वाढणाऱ्या शेअरची आकडेवारीचा आलेख तसेच एखाद्या कंपनीची दिवाळखोरी, शेअरची ऐतिहासिक घसरणीची कहाणी बातमी तुमच्या समोर येईल तेव्हा तुमच्या डोळ्यांना ती फक्त बातमी म्हणून न दिसता एक नवीन केसस्टडी दिसली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *