स्टॉक मार्केटमधील महत्वाच्या संज्ञा (Important Terms in Stock Market in marathi)
Important terms in Stock Market म्हणजेच स्टॉक मार्केटमधील महत्वाच्या संज्ञा या बद्दल आज आम्ही सांगणार आहोत कारण शेअर मार्केट नावाच्या क्षेत्रात जे नव्याने येतात त्यांचा सुरवातीला फार गोंधळ उडतो. यामागे कारण असतं या क्षेत्रात वापरल्या जाणार्या विविध संज्ञा. अशा अनेक संज्ञा आहेत ज्या मुळात समजून घ्यायला फार सोप्या आहेत पण त्या माहीतच झाल्या नाहीत तर मग पुढील बऱ्याच संकल्पना समजून घ्यायला अडचणी येतात.
आज आपण अशाच काही महत्वाच्या संज्ञा अगदी थोडक्यात पण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. Stock Market terms explained in Marathi
बुल मार्केट (Bull Market )
शेअर मार्केट जेव्हा वर जात असतो म्हणजे तो तेजीत असतो तेव्हा त्यास बुल मार्केट म्हटलं जातं. “एखाद्या शेअर संदर्भात मी बुलीश आहे” असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा तो शेअर येत्या काळात वधारेल अर्थात त्याची किंमत वाढेल असा त्या व्यक्तीचा अंदाज आहे.
बेअर मार्केट (Bear Market )
बुल मार्केटच्या अगदी विरुद्ध. म्हणजे जेव्हा मार्केट घसरण अनुभवत असतो म्हणजे मंदीत असतो तेव्हा त्याला बेअर मार्केट असं म्हणतात. “एखाद्या शेअर संदर्भात मी बेअरीश आहे” असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा तो शेअर येत्या काळात घसरणार आहे म्हणजेच त्याची किंमत कमी होणार असा त्या व्यक्तीचा अंदाज आहे.
ब्लूचीप स्टॉक्स ( What is Blue chip Stocks )
अशा लार्ज कॅप कंपन्या ज्या आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांची विश्वासाहर्ता, गुणवत्ता आणि आर्थिक स्थैर्यासाठी ओळखल्या जातात. अशा कंपन्यां ज्यामध्ये केलेली गुंतवणूक तुलनेत सुरक्षित समजली जाते. भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस , टीसीएस सारख्या कंपन्या ब्लूचीप स्टॉक्स म्हणून ओळखल्या जातात.
बीटा व्हॅल्यु (What is Beta Value)
एखाद्या स्टॉकच्या किंमतीत चढ-उतार होण्याचा वेग आणि त्याचा स्टॉक मार्केटच्या चढ-उताराच्या वेगाशी असलेला संबंध हा बीटा व्हॅल्युने मोजला जातो. थोडक्यात त्या शेअरची अस्थिरता याद्वारे जाणून घेता येते. म्हणजे समजा एखाद्या स्टॉकची बीटा व्हॅल्यु 1 असेल तर त्याची वाटचाल आणि स्थिरता हि स्टॉकमार्केटच्या समकक्ष आहे असं मानलं जातं. आणि जर त्या स्टॉकची बीटा व्हॅल्यु 1.2 असेल तर तो शेअर स्टॉकमार्केटच्या तुलनेत 20 % जास्त अस्थिर आहे असं समजलं जातं.
एवरेज डाऊन करणे (averaging down stocks meaning )
समजा तुम्ही “अ” कंपनीचे 100 प्रत्येकी 20 रुपये दराने खरीदी केलेत आणि काही काळाने त्या शेअरची किंमत 15 रुपयांपर्यंत खाली आली मग त्यावेळी तुम्ही त्या शेअरचे आणखी 50 शेअर्स 15 दराने खरेदी केलेत. यामध्ये तुम्हाला एकूण शेअर्सची किंमत सरासरीने कमी लागू झाली. आता तुमच्या कडे 150 शेअर्स आहेत ज्यांची प्रती शेअर सरासरी किंमत आहे रु.18.33 कारण तुम्ही शेअरची किंमत खाली आली तेव्हा तुम्ही एवरेज डाऊन पद्धतीने पुन्हा खरेदी केली होती.
डेरीव्हीटीव्ज (What is derivatives market)
म्हणजेच फ्युचर एन्ड ऑप्शन ( F & O ). नेहमीच्या मार्केटमधील ट्रेडिंग प्रमाणे या प्रकारात सुद्धा ट्रेडिंग होत असते. म्हणजे मी नेहमीच्या मार्केटमधून रिलायन्सचे शेअर्स खरेदी करू शकतो तसेच मी F & O प्रकारातही रिलायन्समध्ये व्यवहार करू शकतो पण F & O मध्ये या स्टॉक्सना असलेली किंमत हि त्यांची स्वताची किंमत नसते तर त्या मूळ स्टॉक्सवरून घेतलेली ( Derived ) असते आणि म्हणूनच यांना डेरीव्हीटीव्ज असेही म्हणतात. या प्रकारालाच वायदे बाजार असेही म्हटले जाते.
लीवरेज आणि मार्जीन (what are Leverage and Margin )
शेअर्समध्ये व्यवहार करण्यासाठी ब्रोकरने तुम्हाला दिलेली पत अर्थात क्रेडीट. म्हणजे समजा तुमच्या ट्रेडिंग खात्यामध्ये 10,000 रुपये आहेत आणि ब्रोकर तुम्हाला त्या रकमेवर एक लाखापर्यंतचे शेअर्स ट्रेडिंग करण्याची सोय उपलब्ध करून देत आहे. याचा अर्थ ब्रोकर तुम्हाला रु. 90,000 लेवेरेज देतोय आणि त्या एक लाखाच्या ट्रेडिंगसाठी तुम्हाला जी 10 हजाराची रक्कम तुमच्या खात्यात बाळगावी लागते ती असते मार्जीन.
मुव्हिंग एवरेज (What is Moving average )
स्टॉकची ठराविक कालावधीतील सरासरी किंमत. म्हणजे मागील पन्नास दिवसांत रोज स्टॉक वेगवेगळ्या किंमतीवर बंद होत राहिला आहे मग त्या आधारे या पन्नास दिवसातील त्या स्टॉकची जी सरासरी किंमत काढली जाते त्याला म्हणतात मुव्हिंग एवरेज. मुव्हिंग एवरेजच्या आधारे एखादा स्टॉक अपट्रेंड कि डाऊन ट्रेंडमध्ये आहे याचा अर्थ लावला जातो. तसेच त्या विषयी काही ठोकताळे लावले जातात. साधारणता मुव्हिंग एवरेज 10 ,20 ,50 , 100 ,200 सत्रांपर्यंतचा पहिला जातो.
पोर्टफोलिओ ( Portfolio in Stock Market )
अर्थात शेअर मार्केटमधील तुमच्या गुंतवणुकीचा गोषवारा. म्हणजेच तुमच्या डीमॅट खात्यात ( गुंतवणुकीच्या उद्देशाने ) असलेले शेअर्स.
रॅली ( What is Rally in stock market )
घसरणीच्या नंतर मार्केटमध्ये काही काळासाठी आलेल्या तेजीला सामान्यपणे रॅली असे म्हणतात.
करेक्शन ( What is Correction in stock Market )
स्टॉक असो व स्टॉकमार्केट, अनेक सत्रांत असलेल्या तेजीने खरेदीचा जोर राहिल्यामुळे नंतर झालेली नफा निश्चिती तसेच त्या स्टॉक किंवा निर्देशांकाला आलेल्या अतिरिक्त मुल्यामुळे त्यात घसरण होऊन तो वाजवी मूल्याला येण्यासंदर्भात करेक्शन हि संज्ञा वापरली जाते. मार्केटमध्ये करेक्शन येणार असं कोणी म्हणत असेल तर याचा अर्थ सध्या मार्केट फुगलेलं असून त्यात घसरण संभवते असा त्या व्यक्तीचा अंदाज असतो .
शॉर्ट करणे ( what is short sell)
अर्थात शॉर्ट सेलींग. सामन्यात आपण शेअर खरेदी करतो आणि मग ते योग्य दर आल्यावर विकतो. पण याच बरोबर जेव्हा मार्केट मंदीत असतं आणि एखादा शेअर घसरत असेल तेव्हा त्याची आधी विक्री करून नंतर खालच्या दरात तो खरेदी केला जातो. म्हणजे “अ” कंपनीचे शेअर्स मी 100 रुपये दराने आधी विकले आणि नंतर त्याचा दर 80 रुपये इतका खाली आल्यावर ते खरेदी केले म्हणजे रु.20 प्रती शेअर मला नफा झाला. इक्विटी प्रकारात म्हणजे प्रत्यक्ष शेअर्समध्ये होणाऱ्या व्यवहारांत असे शॉर्टसेल फक्त इंट्राडे मध्येच करता येतात. F&O साठी वेगळे नियम आहेत.
लॉंग ( Long in stock Market )
शॉर्टच्या अगदी विरुद्ध म्हणजे नेहमीचा व्यवहार. आधी खरेदी करणे आणि नंतर विक्री करणे म्हणजे लॉंग करणे.
व्हॉल्युम ( what is Volume in stock Market )
एखाद्या स्टॉकमध्ये विशिष्ट कालावधीत किती संख्येने व्यवहार झाले. म्हणजे “अ” कंपनीच्या आज व्यवहार ( खरेदी – विक्री दोन्ही ) झालेल्या समभागांची संख्या 25 लाख आहे याचा अर्थ त्या कंपनीचा व्यवहाराचा तो व्हॉल्युम समजला जातो. व्हॉल्युमवरून एखाद्या कंपनीत असलेला गुंतवणूकदारांचं स्वारस्य जाणून घेता येतं.
ओपन इंटरेस्ट (What is Open Interest )
ओपन म्हणजे खुला आणि इंटरेस्ट म्हणजे स्वारस्य. एखाद्या स्टॉक किंवा इंडेक्समध्ये होत असलेले आणि पूर्ण झालेले व्यवहार यावरून गुंतवणूकदारांचं त्यामध्ये असलेलं स्वारस्याबद्दल अंदाज लावला जातो. उदा. तुम्ही शेअर्स खरेदी केलेत तेव्हा ओपन इंटरेस्ट आहे 1 कारण तुम्ही अजून ते विकलेले नाहीत पण जेव्हा तुम्ही ते विकत तेव्हा ओपन इंटरेस्ट १ वरून 0 होणार कारण तुमचा व्यवहार पूर्ण झालेला आहे. हेच व्यवहार लाखोंच्या संख्येत होत असतात तेव्हा ओपन इंटरेस्टची आकडेवारी फार महत्वाची ठरते.
मार्जीन कॉल (Margin Call )
तुमच्या खात्यातील किमान मार्जीन रक्कम राखली गेली नसेल तर अशा वेळी तुमच्या ब्रोकरकडून त्या रकमेची एकतर पूर्तता करावी किंवा सदर रक्कम राखण्यासाठी आपल्या खात्यातील काही शेअर्स विकून टाकावेत निरोप धाडला जातो त्यास साधारणता ‘मार्जीन कॉल’ हि संज्ञा वापरतात. या नावाचा एक अप्रतिम चित्रपट आहे तो नक्की पाहावा.
तरलता (What is Liquidity stock market)
एखाद्या माध्यमातून चलन विनिमय अर्थात खरेदी-विक्री होऊ शकण्याची क्षमता म्हणजे लिक्वीडीटी. म्हणजे तुमच्या नावावर 10 एकर जमीन आहे आणि तुम्हाला आता तत्काळ पैशाची गरज आहे अशा वेळी जमीन नक्कीच मौल्यवान संपत्ती आहे पण ती तुम्हाला तत्काळ पैसे नाही उपलब्ध करून देऊ शकत. पण जर तुमच्याकडे सोनं असेल तर मात्र तुम्ही ते तत्काळ विकू शकता. याचाच अर्थ सोन्यामध्ये तरलता आहे. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी लिक्वीडीटी असलेल्या स्टॉक्सना पसंती दिली जाते. कारण आज तुम्ही घेतलेला शेअर उद्या विकताना समोर खरेदीदार सुद्धा असायला हवा ना..
तर मित्रांनो या काही संज्ञा ज्या स्टॉकमार्केटमध्ये नेहमी वापरल्या जातात आणि या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना त्या माहित असायलाच हव्यात.
माहिती आवडली असेल तर मित्रांनो शेअर कराच.
( लिखाणासाठी लागलेला कालावधी : 2 तास 20 मिनिटे )