Investment return formula in marathiMarathi Stock

गुंतवणूक मोजण्याची सूत्रे. (How to Calculate returns on Investment in marathi)

प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार बचत आणि गुंतवणूक करू पाहत असतो. त्यासाठी विविध पर्याय आजमावत असतो. पण बऱ्याच वेळेला आपण केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा किंवा मिळालेला परतावा कोणत्या दराने मिळालाय, किंवा तो महागाईच्या तुलनेत खरंच उपयुक्त राहिलाय कि नाही हे ठरवणे त्याला कठीण जातं. म्हणूनच गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याचे गणित (गुंतवणूक मोजण्याची सूत्रे : How to calculate returns on investment in marathi) आपल्या मनात पक्कं असलं पाहिजे. 
 
अर्थात बऱ्यापैकी वित्तसाक्षरता असेल तर हे सहजसाध्य आहे पण आज आपण अशी काही अगदी सोपी सूत्रे पाहणार आहोत ज्यामुळे निदान आपल्या सद्या असलेल्या किंवा करू पाहत असणाऱ्या गुंतवणुकीबाबत काही अंदाज-आडाखे नक्कीच बांधता येतील.
 

पाहूया कोणती आहेत हि सूत्रे. ( Investment return Calculation formula in marathi )

 
सूत्र 72 ( Formula of 72 ) : तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज माहित आहे पण या व्याजदराने तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यास किती कालावधी लागेल हे माहती करून घेण्यासाठी सूत्र 72 चा उपयोग होतो.
 
उदाहरणाने पाहू, तुम्ही 8% वार्षिक दराने रुपये 1,00,000 मुदत ठेवीत गुंतवणूक केलीत. आता हे एक लाखाचे दोन होण्यास किती कालावधी लागेल ? तर त्यासाठी 72 ला तुमच्या ठेवीवर असणाऱ्या व्याजदराने म्हणजेच आठने भागायचं, त्यानुसार 72 / 8 = 9 म्हणजे तुमचे एक लाखाचे दोन लाख अर्थात गुंतवणूक दुप्पट होण्यास 9 वर्षांचा काळ जावा लागेल.
पुढचं सूत्र आहे ,
 
सूत्र 114 (Formula of 114) : या सूत्राच्या मदतीने तुमची गुंतवणूक कधी तिप्पट होईल हे शोधण्यासाठी सूत्र 114 चा वापर होतो.म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणेच 8 टक्के वार्षिक व्याजदराने तुमच्या एक लाखाचे तीन लाख होण्यासाठी 114 ला आठने भागायचं, त्यानुसार 114 / 8 = 14.25 म्हणजे तुमचे एक लाखाचे तीन लाख अर्थात गुंतवणूक तिप्पट होण्यास 14.25 अर्थात सव्वा चौदा वर्षांचा काळ लागेल.
 
 
आता आणखी एक पाउल पुढे जाऊ आणि सूत्र 144 म्हणजे पैसे चौपट कधी होणार हे सांगणारा नियम पाहू.

बरं चौपट म्हणजे चौपटच ! शब्दशः म्हणजेच चांगल्या अर्थाने घ्या राव.

तर पाहूया सूत्र
 
सूत्र 144 (Formula of 144) : 72 दुणे 144 म्हणून हे सूत्र. या सूत्राच्या मदतीने तुमची गुंतवणूक कधी चौपट होईल हे शोधण्यासाठी सूत्र 144 चा वापर होतो.म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणेच 8 टक्के वार्षिक व्याजदराने तुमच्या एक लाखाचे चार लाख होण्यासाठी 144 ला आठने भागायचं, त्यानुसार 144 / 8 = 18 तर तुमचे एक लाखाचे चार लाख अर्थात गुंतवणूक चौपट होण्यास 18 अर्थात वर्षांचा काळ लागेल.
 
बरं वरील सूत्रे होती गुंतवणूक विशिष्ट पटीत वाढण्यासाठी लागणारा कालावधी सांगणारी. पण समजा तुमची गुंतवणूक वाढून तुम्हाला ती किती व्हायला हवी हे तुम्ही आधीच ठरवलेय पण मग आता ती गुंतवणूक तुम्हाला हव्या त्या पटीत वाढून मिळण्यासाठी त्या गुंतवणुकीचा व्याजदर किती असावा हे त्यासाठी माहित असायला हवं ना. मग ते कसं काढता येईल ? तर इथे मदतीला येते 72 चे हे दुसरे सूत्र 72-अ . कसं वापरायचं हे सूत्र ते पाहूया.
 
सूत्र 72-अ (Formula of 72-A) : समजा तुम्हाला तुमचे एक लाख 3 वर्षात दुप्पट हवेय.मग त्यासाठी हि गुंतवणूक वार्षिक किती व्याजदराने गुंतवली जावी हे जाणून घेण्यासाठी या सूत्राचा वापर होतो. म्हणजे 72 भागीले आपल्याला हवा असणारा दुपटीचा कालावधी. तर मग त्यानुसार 72 / 3 (वर्षे ) = 24 . म्हणजे तुम्हाला तुमची गुंतवणूक तीन वर्षांत दुप्पट झालेली हवी असेल तर मग तुमची मुद्दल 24 टक्के वार्षिक व्याज दराने गुंतवली गेली पाहिजे.
 
आता तुमच्या लक्षात आलंच असेल कि याच प्रकारे आपल्याला अपेक्षित असलेल्या कालावधीत आपली गुंतवणूक तिप्पट आणि चौपट करण्यासाठी लागणारा व्याजदर माहिती करून घेण्यासाठी अनुक्रमे सूत्र 114-अ आणि 144-अ चा वापर करता येईल.
 
सूत्र 114-अ (Formula of 114-A) : गुंतवणूक तीन वर्षांत तिप्पट करण्यासाठी लागणारा व्याजदर : 114 / 3 = 38 अर्थात 38 % वार्षिक व्याजदर गरजेचा, तसंच
 
सूत्र 144-अ (Formula of 144-A) : गुंतवणूक तीन वर्षांत चौपट करण्यासाठी लागणारा व्याजदर : 144 / 3 = 48 अर्थात 48 % वार्षिक व्याजदर गरजेचा.
 
तर मित्रांनो खरं तर अगदी सोपी पण तरीही नेहमी ओठांवर असावीत अशी हि सूत्रे. जेव्हा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडून असणाऱ्या अपेक्षा पक्क्या असतील तर त्यासाठी लागणारं हे साधं सोपं गणितही तोंडपाठ असलं पाहिजे, खरं तर गुंतवणुकीची पहिली पायरी हीच जिथे तुम्हाला काय हवंय हे निश्चित करणे जमते.
माहिती आवडली असेल तर शेअर कराच !
 
धन्यवाद.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *