काही दिवसांपूर्वी सात -आठ वर्षाच्या लेकीसह दुचाकीवरून फेरफटका मारताना अचानक गाडीत पेट्रोल भरण्याची आठवण झाली आणि दुचाकी पेट्रोल पंपाच्या दिशेने वळवली. लहान मुलं फार बोलतात आणि त्यातही ती प्रश्न फार विचारतात.आता आपल्या सारख्या मोठ्यांना प्रश्न पडणंच बंद झालं असल्याने त्यांच्या प्रश्नांना तोंड देणं आपल्याला कठीण जातं हा भाग वेगळा.
तर माझी दुचाकी पेट्रोल पंपात आणि तिच्या प्रश्नांची गाडी इलेक्ट्रिक वाहन या विषयावर वळली. जगातील नवनवीन घटना, शोध, विषय यावर अनेकदा तिला सांगण्याचा प्रयत्न असतो माझा आणि मग ते असं आपल्यावरच बुमरँग होतं. असो.. तर यावेळी तिचा प्रश्न आला..
बाबा, तुमच्या लहानपणी इलेक्ट्रिक गाडी होती ?
नाहीगं, आमच्या लहानपणी नव्हत्या इलेक्ट्रिक गाड्या.
का ?
अगं का म्हणजे काय, त्यावेळी असा काही शोध लागला नसेल.
का नाही लागला शोध ?
एव्हाना दुचाकीत पेट्रोल भरून झालं होतं पण माझं उत्तर देण्याचं इंधन मात्र संपत आलं होतं. तिला म्हटलं,
ते मला पण माहित नाही, पण मी माहिती घेऊन तुला सांगेन.
आताची वेळ टळली आणि मी (मनातच ) हुश्श केलं.
घरी आलो पण चिमुरडीने विचारलेला ” का ?” मात्र मनात साचून राहिला होता.
इलेक्ट्रिक कार अठराव्या शतकात. (First electric car in the world in the 18th century )
आपल्या बुद्धीची मर्यादा आणि एखाद्या गोष्टीचा शोध घेण्याचा वकूब माहिती असल्याने अखेर लॅपटॉप उघडून गुगलला शरण गेलो. तर समजलं कि इलेक्ट्रिक गाडी म्हणजे कारसाठीचे प्रयत्न अगदी अठराव्या शतकापासून सुरु आहेत. १८३२ मध्ये कुणा रॉबर्ट अंडरसन नामक व्यक्तीने सर्वप्रथम क्रूड आधारित इलेक्ट्रिक गाडी बनविण्याचा काहीसा यशस्वी प्रयत्न केला. ‘काहीसा’ असं सांगण्याचं कारण म्हणजे त्याची ती गाडी रहाटगाड्यात म्हणजे प्रत्यक्षात रस्तोरस्ती चालविण्यासाठी येऊ शकली नाही. तो मान वर्ष १८८४ मध्ये एका इंग्लिश संशोधकाच्या गाडीला मिळाला.
थांबा, आजच्या लेखाचा विषय इलेक्ट्रिक गाडीचा इतिहास , प्रवास वगैरे असा नाहीच आहे. (Not about electric car history in marathi) तर विषय आहे. अठराव्या शतकात सुरु झालेल्या या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप यायला एकविसावं शतक का लागलं ?
तर हा “का?” आजच्या लेखाचा विषय आहे.
तसं पहायाला गेलं तर इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज, मोटार आणि खनिज तेल म्हणजे ज्यापासून इंधन मिळतं यांचा शोध साधारणतः अठराव्या शतकाच्या अल्याड-पल्याड अशा काळातच लागला आहे. जॉन रॉकफेलर ची कथा काहीजणांना माहीतही असेल, असो तर ते खनिज तेल मुळातच ‘निसर्ग निर्मित’ आणि म्हणूनच मर्यादित. त्यामुळे आज ना उद्या त्याचं दुर्भिक्ष निर्माण होणार ते तेव्हाव्ही माणसाच्या लक्षात आलं असलच. मोटार पूर्णतः मानव निर्मित आणि तसंच काहीसं वीजेबद्दल सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे निसर्गतःच तिचं अस्तित्व असलं तरी आपल्या वापरासाठी माणूस तिची आपल्या वापरासापेक्ष निर्मिती करू शकतो आणि त्यामुळेच ती अगदी इंधनाप्रमाणे मर्यादित प्रमाणार उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही.
पण तरीही सोयीचं आणि तत्कालीन जगरहाटीनुसार इंधनावर चालणाऱ्या मोटारी रस्त्यावर दिसणे साहजिक होतं. जग बदलत होतं पण घरातील स्टोव्हपासून नवनिर्मिती ठरलेल्या विमानांपर्यंत सगळीकडे इंधन म्हणजेच क्रूड तेलाचा बोलबाला होऊ लागला. आपल्या भूमीत तेलसाठे असलेल्या किमान तेलास असं महत्व येईपर्यंत तरी अगदी मागास असलेल्या देशांची यापुढील अर्थव्यवस्थाच तेलावर पोसली जाऊ लागली.अमेरिका – रशिया सारख्या देशांना तेलाचे महत्व आधी समजल्यामुळे गल्फ पट्ट्यातील या देशांना आपापल्या कंपूत घेण्याची त्यांच्यात अहमिका होती. त्यामुळे या अरेबियन देशातील जनतेचे नाही पण राज्यकर्त्यांचे उखळ तेवढे पांढरे झाले. त्यातही शेख अहमद झाकी यामिनी सारखी जाणती व्यक्ती तेलमंत्री म्हणून लाभल्यामुळे सौदी अरेबियासारख्या एक कुटुंब नियंत्रित देश अमेरिकेसारख्या शुद्ध भांडवलशाही देशाशी त्यातल्या-त्यात संतुलित व्यापार करू शकला. असो..
इलक्ट्रिक कार आपल्याला सत्तरीच्या दशकांत उपलब्ध झाल्या असत्या तर ..?
आता जरा विचार करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या किंवा मोटार आपल्याला एकोणिसाव्या शतकात अगदी साठ-सत्तरीच्या दशकात उपलब्ध झाल्या असत्या तर ? म्हणजे अगदी पायाभूत सुविधांसह. काय स्थिती असती आज ?
अर्थात अमेरिका तसाही आज तेल उत्पादनात स्वयंपूर्ण आहेच. पण जर वर सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने काही दशके आधी आली असती तर तेलावर पोसले गेलेले आखाती देश त्यातील अफाट संपत्ती असणारे राज्यकर्ते-राजघराणी वगैरे, महाकाय तेल कंपन्या किंवा मग अगदी तुमच्या माहितीतील आसपासच्या भागातील एखाद्या आमदार खासदाराचे पेट्रोल पंप या सगळ्यांचे आजचे चित्र काय असते ?
आखाती युद्धाचं काय झालं असतं ? किंबहुना आखाती युद्धच झालं असतं का ? हे असे असंख्य प्रश्न उभे राहतात.
लांबलेल्या (?) तेलायुगामुळे कुणाचे उखळ पांढरे ? (who has benefitted from oil)
ज्या कालखंडात अनेक तांत्रिक औद्योगिक शोध लागले त्या कालखंडात विजेवर धावणाऱ्या गाड्या, दळणवळण याबाबत ठोस संशोधन का झालं नाही ? कि अगदी गल्ली ते जागतिक स्तरावर राजकारणी, उद्योगसंस्था अशी महाकाय युतीचे आर्थिक हितसंबंध आणि त्याची पूर्ण इकोसिस्टम यामध्ये गुंतली असल्यामुळे अशा काही प्रयत्नांना बळच मिळू दिलं नाही ?
मागच्या काही दशकातील औद्योगिक इतिहासाची पाने चाळली तर यासाठी अगदी वरवर काही प्रयत्न झालेले दिसतात जे पुढे सरकलेच नाहीत. भारतात टाटा सारख्या सक्षम कंपनीकडूनही याबाबत काही प्रयत्न का झाले नाहीत ? ज्यांच्याकडून झाले ते पुढील टप्प्यावर का नाही गेले ? अगदी अमेरिकेतही खऱ्या अर्थाने हा प्रकार अगदी रोजच्या रहाटगाड्यात तेव्हाच आला जेव्हा एलन मस्कसारख्या स्वयंसिद्ध उद्योजकाने ते मनावर घेतलं तेव्हा.
यापुढे हे थांबवता येणार नाही आणि टेस्लाच्या आपल्याकडील आगमनाची आणि पुढील ना टाळता येणाऱ्या स्पर्धेची जाणीव झाल्यावरच आपल्याकडे हालचाली सुरु झाल्या.अन आता आपल्या देशांत दर दोन तासांना सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन प्रोजेक्ट बद्दलचे अपडेट्स पाहायला मिळतात.
आपल्याला फक्त दिसते होऊ घातलेली क्रांती पण नाही दिसत ते त्यामागील कुणाचीतरी गरज आणि त्यामधून साधली जाणारी संधी.
वरकरणी आपण यापुढील जग इलेक्ट्रिक वाहनांचे असेल असं भरभरून बोलतो. पण खरंतर हे दिव्यातील तेल संपत आल्यावर नाईलाजाने लाईट लावण्यासारखं झालंय असं म्हणायला वाव नक्कीच आहे. तेल युगाचा तसाही अस्त दृष्टीपथात आहे. अर्थात पुढील काही दशके तेल असेल पण त्यात मलिदा खाण्यासारखं, एखाद्या देशाची आणि राजघराण्याचीही अर्थव्यवस्था पोसली जाण्यासारखं, धनदांडग्यांच्या पिढ्यांची सोय होण्यासारखं काही त्यात नक्कीच नसेल. आणि तसंही बदलत्या जगातील महासत्ता आता ‘ऑइलोहोलिक’ नसेल कारण क्लाइव्ह हुंबी नामक ब्रिटिश गणितज्ञाने म्हटलं आहेच.
डेटा इज द न्यू ऑइल.
Data is the new Oil..
लेख आवडला असेल तर इतरांना शेअर नक्की करा, आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.